Jagjit Singh Dallewal Agrowon
ॲग्रो विशेष

Jagjit Singh Dallewal : डल्लेवाल यांचे हमीभाव कायद्यासाठी २२ व्या दिवशी उपोषण सुरूच; उपचार घेण्यास नकार

Jagjit Singh Dallewal's hunger strike : शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचे खनौरी सीमेवर २२ व्या दिवशी उपोषण सुरूच आहे. दरम्यान त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी खनौरी सीमेवर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज २२ व्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. यामुळे डल्लेवाल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यावरून शंभू सीमेवर आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी शंभू सीमेवर आंदोलनावर ठाम बसले असून केंद्र सरकार कोणताच तोडगा काढत नाही. यामुळे ७० वर्षीय डल्लेवाल यांनी २६ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. ते कर्करोगाचे रूग्ण आहेत. उपोषणाच्या २१ व्या दिवशी (सोमवारी) त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. यावेळी त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमीका घेतली आहे. तर प्रकृती खालावल्याने डल्लेवाल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यावरून काँग्रेस खासदारासह अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाना साधत टीका केली आहे.

यावेळी डल्लेवाल यांच्या आरोग्याविषयी माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, डल्लेवाल यांनी काहीही खाल्ले नाही. ते फक्त पाणी पीत आहे. त्यांच्या चाचणी अहवालांनुसार, क्रिएटिनिनची पातळी वाढत असून किडनी देखील व्यवस्थित काम करत नाही. जीएफआर (ग्लोमेरुलर फिल्टरेशन रेट) कमी होत आहे. केटोन्स देखील उच्च पातळीवर आहेत. डल्लेवाल इतके कमकुवत झाले आहेत की ते स्वबळावर उभे राहू शकत नाहीत. त्यांचा रक्तदाब ८० ते ५० दरम्यान नोंदवला गेला असून जे चांगले लक्षण नाही. यामुळे हृदयविकारही उद्भवू शकतो. यामुळे त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे.

पंजाबचे पोलिस प्रमुख गौरव यादव आणि गृह मंत्रालयाचे संचालक मयंक मिश्रा यांनी रविवारी डल्लेवाल यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत उपोषण सोडण्याची मागणी केली. मात्र डल्लेवाल यांनी, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनापेक्षा स्वतःच्या जीवनाला महत्त्व नसल्याचे म्हटले आहे. तर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यावरच उपोषण सोडू, असेही ते म्हणाले.

या मागण्यांवर ठाम आहेत

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मी आपल्या प्राणाची आहुती देण्यास मानसिकदृष्ट्या तयार असल्याचे डल्लेवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून इशारा दिला आहे. तसेच त्यांनी, प्रत्येक शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत देणे हा जगण्याच्या मूलभूत अधिकाराप्रमाणे आहे. शेतकऱ्यांचे मृत्यू थांबवण्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देण्याचा निर्णय घेतला असून माझ्या मृत्यूनंतर केंद्र सरकार झोपेतून जागे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर एमएसपी कायद्यासह विविध १३ मागण्याही केंद्र सरकार पूर्ण करण्यासाठी काम करेल, असाही आशावाद व्यक्त केला आहे.

डल्लेवाल यांच्या प्रकृतीचा मुद्दा

दरम्यान सोमवारी (ता.१६) संसदेत खासदार हरसिमरत कौर बादल यांनी ज्येष्ठ शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच किमान आधारभूत किमतीला कायदेशीर हमी देण्यासह शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले. बादल म्हणाल्या की, हे दुर्दैवी आहे की राज्य आणि केंद्र या दोघांनाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाकडे कानाडोळा केला. न्यायालायाने डल्लेवाल यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी त्यांचे मन वळवण्याचे निर्देश दिले होते. मात्र केंद्राने केलं काय तर एका खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. जो कोणतीच आश्वासने देऊ शकत नव्हता.

पण आता डल्लेवाल यांचे प्राण वाचवण्यासाठी तातडीची कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राने एमएसपी, कर्जमाफी आणि शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, शेती क्षेत्रासाठी वीज दर वाढवले ​​जाणार नाही, असे आश्वासन द्यावे. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. २०२१ च्या लखीमपूर खेरी हिंसाचारातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि पोलिसांवर खटले दाखल करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

अण्णा हजारेंचा विक्रम मोडला

डल्लेवाल गेले २२ दिवस आमरण उपोषण करत असून त्यांनी अण्णा हजारेंचा विक्रम मोडला आहे. २०११ मध्ये भ्रष्टाचारविरोधात हजारेंनी २०११ मध्ये १३ दिवसांचे उपोषण केले होते. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी डल्लेवाल यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. याच्याआधी त्यांनी, मार्च २०१८, जानेवारी २०१९, नोव्हेंबर २०२२ आणि जून २०२३ मध्येही उपोषण केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT