Agriculture Plastic Technology
Agriculture Plastic Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Plastic Technology : प्लॅस्टिक तंत्रज्ञानातून फळबागांचे संरक्षण

मुकुंद पिंगळे

Orchard Protection : अलीकडील वर्षांत गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आदी नैसर्गिक आपत्तींमुळे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला आणि इतर सर्वच पिकांचे नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या. तर काहींनी संरक्षित शेती (पॉलिहाउस- शेडनेट), वाण बदल, बाष्पीभवन रोखण्यासाठी सेंद्रिय आच्छादन, ठिबक सिंचनातील नवे तंत्र आदी पर्याय वापरले. यातीलच एक पर्याय म्हणजे प्लॅस्टिक आच्छादन.

प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर

नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागातील सटाणा, मालेगाव, देवळा व कळवण तालुक्यांत ‘अर्ली’ द्राक्ष हंगाम घेतला जातो. या हंगामात गोडी बहार छाटणी ते काढणी दरम्यान द्राक्ष बागेचे संरक्षण करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी बागेवर प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केला आहे. महाराष्ट्र द्राक्ष बागायदार संघाच्या नाशिक विभागानेही त्याचे क्षेत्रीय पातळीवर प्रयोग घेतले. त्यासाठी अपेक्षित अनुदान मिळण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

प्लॅस्टिक आच्छादने हे झाले फायदे

बागा फुलोऱ्यात असताना जोरदार पावसातही वेलींवरील घडांचा संपूर्ण फुलोरा धुऊन जाण्याचे प्रमाण कमी. दर्जेदार फळधारणा.

भर पावसातही आच्छादनाखाली ‘पेस्टिंग’, डीगिंग, बगल फूट काढणी अशी हंगामी कामे करणे शक्य.

बुरशीनाशक फवारणी संख्या कमी झाल्याने खर्चात बचत. मालात रासायनिक अवशेषांचे प्रमाण कमी.

बागेतील व त्याबाहेरील तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअस फरक असल्याने साखर भरण्याच्या वेळी फळांना चांगली गोडी आली.

पावसात काढणी अवस्थेत तडे जाण्याची समस्या जवळपास नाहीच. पाऊस असल्यावर व्यापाऱ्यांकडून काढणी थांबवली जाते. मात्र आच्छादनामुळे त्यात व्यत्यय आला नाही.

नामदेव भामरे ९४२१९९६७९९

डाळिंब बागेचे संरक्षण

डाळिंबात ‘सनबर्निंग’मुळे फळांना डाग पडण्याचा धोका असतो. फळे पक्वतेला येण्याच्या काळात गारा, अवकाळी पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव, फळाला एकसारखा रंग न येणे अशा समस्या भेडसावतात. त्यावर पर्याय देताना नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील प्रगतिशील डाळिंब उत्पादक रवींद्र धनसिंग पवार यांच्या डोक्यात ओढणी वस्त्रासारख्या नेटची संकल्पना आली.

अधिक अभ्यासातून आपल्याला हव्या तशा नेटची निर्मिती त्यांनी व्यावसायिकाकडून करून घेतली. त्यातून २२ मेश जाडीचे नेट तयार झाले. त्याच्या वापरातून फळाला आकर्षक रंग, एकसारखा आकार येणे, तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव कमी करणे असे फायदे झाले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (राहुरी) शास्त्रज्ञांनीही या पद्धतीचा अभ्यास केला आहे.

डाळिंबात ‘नॉन वोव्हन’ प्रकारच्या आच्छादनाचा एका हंगामापुरता तर अन्य ‘नेट’ प्रकाराचा तीन हंगामासाठी उपयोग होतो. मालेगाव, सटाणा, देवळासह धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेतकरी त्याचा वापर करू लागले आहेत. गेल्या तीन वर्षांत तापमान वाढ अधिक आहे. हस्त बहरातील बागांतील फळांच्या काढणीचा हंगाम सुरू असतो त्या काळात तापमान ४० अंशांवर गेलेले असते. अशावेळी प्रखर सूर्यप्रकाशापासून नेटमुळे बागेचे संरक्षण होते. फूलगळ समस्या कमी होते. नेटसाठी एकरी किमान दोन लाख रुपये खर्च

रवींद्र पवार ९८२३०२३६००

अन्य पिकांसाठी तंत्रज्ञानाची उपयुक्तता

‘क्रॉप कव्हर’मुळे पाणीटंचाईच्या काळात फळबागेत बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो.

डागरहित पेरू मिळविण्यासाठी फोमचे आच्छादन.

कलिंगड, खरबूज, टोमॅटो, मिरची लागवडीत तापमानवाढीमुळे पाने पिवळी पडण्यासह फळांना चट्टे पडतात. त्यामुळे प्रत घसरून व्यापाऱ्यांकडून ३० टक्के माल नाकारला जाण्याचा धोका असतो.

‘क्रॉप कव्हर’मुळे तापमान नियंत्रित होते. झाड अशक्त न होता पाने, फुले चांगली राहतात. फूलगळ होत नाही. बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची गरज कमी होते.

अन्य मिळणारे फायदे

रस शोषणाऱ्या पतंग, तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव कमी

फळांचा गुणवत्तेत वाढ होऊन रंग व चकाकी येते

गारपिटीपासूनही झाडे, फळे सुरक्षित राहू शकतात.

एकूणच व्यवस्थापनात सुधारणा होऊन डाळिंबाचे एकरी १० ते १२ टन उत्पादन घेणे शक्य होते.

निर्यातक्षम फळांची निर्मिती.

२०० ते ४०० ग्रॅमपर्यंत वजन मिळते.

मागील वर्षी पेरूची लागवड केली. त्यामध्ये फळांना ‘सनबर्निंग’चा धोका होता. मात्र आच्छादनाचा वापर केल्याने सत्तर टक्क्यांपर्यंत नुकसान कमी करता आले. त्यामुळे गुणवत्तापूर्ण फळे हाती घेऊन चांगल्या दराने विक्री करता आली.
धनंजय कारभारी थेटे ७३०४५८९२३९, गिरणारे, ता. जि. नाशिक
तापमान वाढीमुळे भाजीपाला उत्पादनात अडचणी आहेत. त्यामुळे टोमॅटो पिकाच्या रोपांची मर होते. ‘नेट’चा वापर केल्याने तापमान नियंत्रित होऊन मर कमी होते. अनुकूल वातावरण तयार होते. फवारणी खर्च कमी होऊन झाडांची वाढ चांगली होते असा अनुभव आला आहे.
प्रताप बनकर ९८९००६५६८६, दिंडोरी, जि. नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

Sugar Industry : ‘डीएसटीए’कडून आज चर्चासत्राचे आयोजन

Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

Cotton Variety : एका कापूस वाणाची जादा दराने विक्री

Hailstorm : माण तालुक्यात बिजवडी, जाधववाडी परिसरात गारपीट

SCROLL FOR NEXT