निखिल देवरे
Agriculture Home Style Refrigerator : वाढत्या तापमानामुळे भाजीपाला, फले लवकर खराब होतात. तसेच बाजारामध्ये आवक जास्त असल्यामुळे दर कमी राहतात. अशा वेळी काढणीपश्चात साठवण सुविधेच्या अभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
हे टाळण्यासाठी घरगुती पद्धतीने कोणत्याही ऊर्जेशिवाय चालणाऱ्या आणि कमी खर्चात बनवता येणाऱ्या शीतकक्षाची उभारणी कशी करावी, याची माहिती घेऊ.
लागणारे साहित्य
विटा, नदी पात्रातील बारीक वाळू, कोरडे गवत किंवा नारळाच्या झावळ्या, सिमेंट, ठिबक संचाच्या नळ्या.
शीतकक्षाचा आराखडा आणि उभारणी
एखाद्या शेडमध्ये किंवा कायम सावली साहणाऱ्या ठिकाणी सपाट अशा जमिनीवर विटांचे एक ते दोन थर देऊन शीतकक्षाच्या तळाचा भाग तयार करावा. या दोन विटांमधील रिकाम्या जागी बारीक वाळू भरावी. त्यानंतर विटांच्या दोन भिंती रचून त्यात दोन भिंतीतील अंतर ७.५ सेंमी ठेवावे. हे दोन भिंतीमधील अंतरसुद्धा वाळूने भरून घ्यावे. अशा रीतीने वाळू आणि विटांच्या साह्याने हौद तयार करून घ्यावा.
हा कक्ष प्रथम भरपूर पाण्याने चांगला ओला करून घ्यावा. या तयार झालेल्या कक्षावर झाकण्यासाठी नारळाच्या झावळ्या किंवा कोरड्या गवताचे छप्पर तयार करावे. त्याने शीतकक्ष झाकून घ्यावा. नियमितपणे दिवसातून दोन वेळा शीतकक्षावर पाणी मारावे. जिथे पाण्याची कमतरता आहे,
अशा ठिकाणी शीतकक्षाच्या वरील बाजूस असलेल्या वाळूमध्ये पाइप व ठिबक संचाच्या लॅटरल जोडाव्यात. म्हणजे त्यातून पाणी ठिपकत राहील. वाळू आणि विटांमध्ये सतत ओलावा व गारवा राहील. या शीतकक्षातील तापमान बाह्य तापमानापेक्षा १० ते १२ अंश सेल्सिअस कमी राहते.
शीतकक्षाचे फायदे
या घरगुती शीतकक्षामुळे भाजीपाल्यांचा साठवण कालावधी वाढतो. सर्व फळे व पालेभाज्या टवटवीत, आकर्षक राहतात. फळांची पिकण्याची प्रक्रिया मंद गतीने होते. त्यांच्या वजनात घट येत नाही.
आपल्याला किती शेतीमाल साठवायचा आहे, त्यानुसार या शीतकक्षाचा आकार कमी जास्त करता येऊ शकते. यामध्य शेतकऱ्यांकडे सामान्यतः उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर केलेला असल्यामुळे कमी खर्चात तयार होतो.
घ्यावयाची काळजी
वारे खेळते राहील, अशी जागा निवडावी.
पाणी साचू नये म्हणून उंच जागा निवडावी.
विटा स्वच्छ आणि चांगल्या छिद्र असलेल्या असाव्यात.
वाळू सेंद्रिय पदार्थ, सैल माती इ. पासून मुक्त आणि स्वच्छ असावी.
शीतकक्षावर कोणत्याही बाजूने उन्हे पडू नयेत, याची काळजी घ्यावी.
फळे व भाजीपाला साठवणुकीसाठी प्लॅस्टिक क्रेट वापरा, बांबूच्या टोपल्या, लाकडी/फायबर बॉक्स किंवा पोते वापरू नये.
साठवलेल्या फळे व भाजीपालाच्या संपर्कात पाणी येऊ देऊ नका.
निखिल देवरे, ९५२७५८०९८८
(सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.