डॉ. सखेचंद अनारसे
शेवगा लागवडीनंतर आवश्यक महत्त्वाच्या बाबी म्हणजे आंतरमशागत, प्रमाणित खतांचा वापर, झाडांची योग्य छाटणी या बाबींचा समावेश होतो. शेवग्याची झाडे झपाट्याने वाढणारी असल्यामुळे आकार देणे आवश्यक आहे. व्यवस्थित आकार दिला नाही तर झाड उंच वाढते, त्यामुळे शेंगा काढणे अवघड जाते.हे लक्षात घेऊन योग्य वेळी, योग्य प्रकारे छाटणी करावी.
कोरडवाहू क्षेत्रात तसेच ज्या जमिनी हलक्या बरड आहेत, अशा ठिकाणी शेवगा लागवड निश्चितच फायदेशीर ठरू शकते. शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तामिळनाडू राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही व्यापारी तत्त्वावर शेवग्याची लागवड सुरू झालेली आहे.
बाजारपेठेत शेवगा पाठवताना इतर भाजीपाल्याप्रमाणे विशेष खर्चीक पॅकिंग लागत नाही. तसेच बाजारपेठेत पोहोचेपर्यंत शेंगा खराब होत नाहीत. शेवगा शेंगा आणि पानामध्ये अ आणि क जीवनसत्त्वे तसेच चुना व लोह मुबलक प्रमाणात आहे. वाळलेल्या शेंगांच्या बियांपासून तेल काढतात. या तेलाचा उपयोग सांधेदुखीवर होतो. शेवग्याचे मूळ, फुल, पाने व साल यांचा वापर आयुर्वेदिक औषधात केला जातो.
जाती
तामिळनाडू कृषी विद्यापीठाने पीकेएम-१, पीकेएम-२ हे लवकर शेंगा येणारी व भरपूर प्रथिने असलेली जात आहे.
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण रुचिरा ही जात प्रसारित केली आहे.
महाराष्ट्रामध्ये ओडिसी या जातीची मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे. या जातीच्या शेंगांची लांबी ५५ ते ६० सेंटिमीटर आहे. रंग पोपटी असून भरपूर उत्पादन मिळते. त्यामुळे या शेंगांना स्थानिक बाजारपेठेत तसेच निर्यातीसाठी मागणी आहे.
शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत केली जाते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे, अशा ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्या जमिनीमध्ये शेवगा पीक चांगल्या प्रकारे येते. अत्यंत भारी व पाणी धरून ठेवणाऱ्या दलदलीच्या जमिनी या पिकासाठी टाळाव्यात.
व्यापारी तत्त्वावर शेवग्याची लागवड करावयाची असल्यास पावसाच्या पूर्वी ६० सेंटिमीटर लांब, रुंद आणि खोल खड्डे घ्यावेत. खड्ड्यांमध्ये चांगली माती, एक घमेले कुजलेले शेणखत, २५० ग्रॅम १५:१५:१५ आणि ट्रायकोडर्मा प्लस ५० ग्रॅम मिसळावी.अशाप्रकारे खड्डा भरून घ्यावा. लागवड करताना दोन ओळीतील अंतर दहा फूट आणि दोन झाडांतील अंतर आठ फूट ठेवावे.
ठिबक सिंचनाची उपलब्धता असल्यास लागवड करताना जास्त खोल खड्डे घेण्याची आवश्यकता भासत नाही. यासाठी योग्य अंतरावर सऱ्या पाडून किंवा गादीवाफा तयार करून त्यामध्ये शेणखत आणि रासायनिक खतांचा व्यवस्थितपणे वापर करून लागवड केल्यास खड्डे करण्याचा खर्च वाचवू शकतो.
खरीप हंगामात जून, जुलैमध्ये पहिल्या पावसानंतर वातावरणात अनुकूल असते. हवेतील आर्द्रता वाढते. असे वातावरण रोपे किंवा बी रुजण्यास अत्यंत अनुकूल असते. या काळात शेवग्याची लागवड करणे फायदेशीर ठरते.
आंबा, चिकू,जांभूळ, चिंच, आवळा, या फळबागांमध्ये लागवडीनंतर पहिले चार ते पाच वर्ष आंतरपीक म्हणून शेवगा अत्यंत फायदेशीर ठरतो.
शेवगा लागवडीनंतर आवश्यक महत्त्वाच्या बाबी म्हणजे आंतरमशागत, प्रमाणित खतांचा वापर, झाडांची योग्य छाटणी या बाबींचा समावेश होतो.
प्रतिवर्षी प्रत्येक झाडास पावसाच्या सुरुवातीस १० किलो चांगले कुजलेले शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद (३१२ ग्रॅम सुपर फॉस्फेट) आणि ७५ ग्रॅम पालाश (१२० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे.
शेवग्याची छाटणी
शेवग्याची झाडे झपाट्याने वाढणारी असल्यामुळे आकार देणे आवश्यक आहे. व्यवस्थित आकार दिला नाही तर झाड उंच वाढते, त्यामुळे शेंगा काढणे अवघड जाते.
लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यांनी किंवा मुख्य खोड तीन ते चार फूट झाल्यानंतर पहिली छाटणी करावी, यावेळी खोड जमिनीपासून एक मीटर अंतरावर छाटावे आणि चारही दिशांना फांद्या वाढू द्याव्यात. यामुळे झाडांची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाते, उत्पादनातही वाढ होते.
सुधारित जातींना लागवडीपासून सुमारे ५ ते ६ महिन्यांनी शेंगा तोडणीस येतात. पूर्णवाढीच्या आणि ज्यांचा पीळ पूर्ण उलगडला आहे अशा शेंगा लांबीनुसार जुळवून घ्याव्यात. प्लॅस्टिक कागद, गोणपाटात गुंडाळल्यास शेगांचा ताजेपणा जास्त काळ टिकून राहतो. अशाप्रकारे ५ ते ६ महिन्यानंतर प्रत्येक हंगामात एका चांगल्या झाडापासून सुमारे २५ ते ३० किलो शेंगा सहज मिळतात.
- डॉ. सखेचंद अनारसे, ७५८८६०४१३०
(साहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.