डॉ. अजित रानडे
Agriculture Development: भारतातील जवळ जवळ ७१ टक्के जनता मांसाहारी असली, तरी सुद्धा बऱ्याच प्रमाणात मांसाबद्दल जनतेच्या मनात गैरसमज आणि भीती आहे. हे सगळे गैरसमज दूर करून योग्य आणि शास्त्रीय वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचवणे, हे फार मोठे आव्हान या व्यवसायापुढे उभे आहे.
भारतात साधारण सत्तरच्या दशकात व्यावसायिक कुक्कुटपालनाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. त्याआधी परसातील लक्ष्मी या स्वरूपात थोड्या प्रमाणात पक्ष्यांचे पालन केले जात असे. जसजशी देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढायला लागली आणि पक्ष्यांपासून मिळणाऱ्या अंडी व मांस यांचे आहारातील महत्त्व लोकांना पटायला लागले तसतशी या पक्षिपालनाची झपाट्याने वाढ होत गेली.
जास्तीत जास्त आणि किफायतशीर उत्पादन देणाऱ्या नवनवीन जाती किंवा स्ट्रेन विकसित होऊ लागले. या सुधारित पक्ष्यांच्या गरजा समजून घेऊन त्या पुरवण्याकडे लोकांचा कल वाढू लागला. बघता बघता पक्षिपालन छोट्या प्रमाणावर न राहता त्याचे व्यवसायात रूपांतर होऊ लागले. आज पशुसंवर्धनाबरोबरच पक्षिसंवर्धन हे सुद्धा उत्तम उत्पादनाचे साधन बनले आहे. मुख्य म्हणजे पक्ष्यांपासून मिळणाऱ्या अंडी आणि मांसामुळे आहारातील प्रथिनांच्या कमतरतेचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
मुळात जगभरात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक जाती या ‘रेड जंगल फाउल’ या एकाच पक्ष्यापासून तयार झाल्याचे मानले जाते. संपूर्ण जगभरात विविध जातींपासून वेगवेगळी उत्पादन क्षमता असलेले स्ट्रेन तयार करून त्यांचा व्यावसायिक स्तरावर उपयोग केला जातो. सध्या जगभरात आणि आपल्या भारतात सुद्धा पक्ष्यांचे पालन हे प्रामुख्याने अंडी आणि मांस मिळवण्यासाठी केले जाते. अंडी उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या पक्ष्यांना ‘लेयर’ आणि मांस उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या पक्ष्यांना ‘ब्रॉयलर’ असे संबोधले जाते. या व्यावसायिक लेयर आणि ब्रॉयलर पक्ष्यांच्या आधीच्या पिढीला ‘ब्रीडर’ असे संबोधले जाते.
होणाऱ्या मांसाचा, कुक्कुटपालनाचा असणार आहे, असे भाकीत असल्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाची वाढ संपूर्ण जगभरातच ६ ते ७ टक्के या प्रमाणात अपेक्षित आहे संपूर्ण जगाची लोकसंख्या सुद्धा सन २०३० पर्यंत वाढवून ८.५ अब्ज इतकी होणे अपेक्षित आहे. तर भारताची लोकसंख्या १.५१५ अब्ज अपेक्षित असल्याने अंड्याच्या आणि पक्ष्यांपासून निर्माण होणाऱ्या मांसामध्ये सुद्धा वाढ अपेक्षित आहे.
जागतिक स्तरावर सन २०२३ मध्ये १,०३,४१८ हजार टन इतक्या प्रमाणावर पक्ष्यांपासून मांस उत्पादन झाले होते. भारतातील कुक्कुटपालन व्यवसायाची आर्थिक व्याप्ती सन २०२२ मध्ये १९०५.३ अब्ज रुपये इतकी होती व यामध्ये सुद्धा दरवर्षी ६.७७ टक्के इतकी वाढ होत आहे.संपूर्ण जगभरात वर्षाकाठी साधारण ५०० दशलक्ष ब्रीडर पक्षी, ३० अब्ज ब्रॉयलर पक्षी तर ८ ते ९ अब्ज लेयर पक्षी पाळले जातात.
आपल्या भारतात साधारण ४०-५० दशलक्ष ब्रॉयलर ब्रीडर पक्षी पाळले जातात. त्यांच्यापासून साधारण वर्षाला ४ ते ५ अब्ज ब्रॉयलर पक्षी तयार केले जातात आणि भारतात ३०० ते ३५० दशलक्ष इतके लेयर पक्षी पाळले जातात. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर ५ ते ७ दशलक्ष ब्रॉयलर ब्रीडर्स, २०० ते २५० दशलक्ष ब्रॉयलर आणि ५० ते ६० दशलक्ष लेयर पक्षी वर्षाला पाळले जातात.
संपूर्ण जगभरामध्ये ८५ दशलक्ष टन इतक्या प्रमाणात अंडी उत्पादन होते. भारतात दरवर्षी साधारण १४० अब्ज अंड्यांचे उत्पादन होते. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार पक्ष्यांपासून अंडी उत्पादनाच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. या १४० अब्जपैकी १० ते १२ अब्ज अंडी महाराष्ट्रात तयार होतात. कोंबड्यांपासून जगभरामध्ये वर्षाला १०४ दशलक्ष टन इतके मास तयार होते. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार कोंबड्यांपासून तयार होणाऱ्या मांसाच्या बाबतीत भारताचा जगामध्ये पाचवा क्रमांक लागतो. भारतात ४.९९५ दशलक्ष टन मांस कोंबड्यांपासून तयार होते. तर महाराष्ट्रात ०.६ ते ०.८ दशलक्ष टन इतके मांस कोंबड्यांपासून तयार होते.
जागतिक पातळीवर दरडोई अंडी खाण्याचे प्रमाण २०० अंडी आहे. तर भारतात ते १०१ अंडी आणि महाराष्ट्रात ९० अंडी असे आहे. तसेच, पक्ष्यांपासून उत्पादित होणारे मांस खाण्याचे जागतिक सरासरी प्रमाण दरडोई १४ ते १५ किलो आहे. प्रगत राष्ट्रांमध्ये हेच प्रमाण ३५ ते ४० किलो आहे. भारतात मात्र कोंबड्यांपासून तयार होणारे मांस खाण्याचे प्रमाण सरासरी ४.८ ते ५ किलो आहे. महाराष्ट्रात कोंबड्यांचे मांस खाण्याचे दरडोई प्रमाण सरासरी ६ किलो इतके आहे.
अशा प्रकारे कुक्कुटपालनात नेत्रदीपक वाढ होत असताना पक्ष्यांच्या निर्मितीबरोबरच संलग्न उद्योगधंदे वाढीस लागले आहेत. किंबहुना, पक्ष्यांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे आवश्यक सर्व घटक पुरवले गेल्यामुळे त्यांची उत्पादनक्षमता वाढीस लागली आहे.
पक्ष्यांसाठी सोईस्कर अशी घर बांधणी, योग्य उपकरणे, पक्ष्यांच्या घरातील तापमान वायुविजन आणि आर्द्रता योग्य राखण्यासाठी उपाययोजना या सर्व गोष्टींमध्ये सुद्धा संशोधन होऊन आवश्यक ते बदल संगोपनाच्या पद्धतींमध्ये केले गेले आहेत. आता तर पक्ष्यासाठी संपूर्णपणे वातावरण नियंत्रित आणि स्वयंचलित किंवा संगणकाद्वारे नियंत्रित केली जाणारी उपकरणे वापरावर भर दिला जात आहे. अशा प्रकारच्या वातावरण नियंत्रित घरांमुळे आणि आधुनिक उपकरणांमुळे पक्ष्यांची उत्पादनक्षमता सुधारत असल्याचे सिद्ध झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.