
Poultry Industry : पुणे- सोलापूर महामार्गावर पुण्यापासून सुमारे ३५ किलोमीटरवर तरडे गाव आहे. लोकसंख्या दीड हजाराच्या आसपास असून, कुटुंब संख्या ३०० च्या दरम्यान आहे. पैकी वीस कुटुंबे कुक्कुटपालन व्यवसायात गुंतली आहेत. गावाजवळून कालवा जात असल्याने परिसर बागायती आहे.
काही वर्षांपूर्वी गावातील ८० ते ९० टक्के शेतकरी उस, कांद्याचे पीक घेत होते. परंतु रोग- किडीचा वाढता प्रादुर्भाव, वाढलेला खर्च, त्या तुलनेत मिळणारे उत्पादन यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली.
त्यातील गावातील चंद्रकांत काळे यांना पोल्ट्री व्यवसायाचा मार्ग सापडला. त्यांचा प्रयोग, त्यांना मिळणारे उत्पन्न व अर्थकारण समाधानकारक वाटून गावातील अमर काळे, मंगेश गवते, सुभाष शेलार, खंडेराव चौधरी आदींनाही प्रेरणा मिळाली.
व्यवसायाचे स्वरूप
तरडे गावची एक बाजू डोंगराळ असून, पोल्ट्री व्यवसायासाठी येथील वातावरण पोषक आहे. सुरुवातीला व्यवसायाची निवड केल्यानंतर अधिक माहिती घेण्यासाठी अनेक ठिकाणी येथील शेतकऱ्यांनी भेटी दिल्या.
ब्रॉयलर आणि लेयर अशा दोन्ही प्रकारच्या पक्षी संगोपनाची माहिती घेतली. व्यवसाय सुरू करताना आर्थिक अडचणी आल्या होत्या. मात्र शेतीच्या उत्पन्नातून रकमेची तजवीज केली. बँकांकडूनही शेतकऱ्यांनी दहा लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत घेतली.
हार न मानता,जिद्द कायम मनाशी बाळगत व्यवसायात वाटचाल केली. सध्या वीस शेतकऱ्यांपैकी मोजके शेतकरी ‘लेअर’ पक्ष्यांचे तर बहुतांश शेतकरी ब्रॉयलर व्यवसायात गुंतले आहेत. खासगी कंपन्यांसोबत त्यांनी करार केले आहेत.
व्यवस्थापनातील बाबी
अनेक शेतकरी सुरुवातीच्या अवस्थेत कंपनीचे खाद्य वापरतात. काहींनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून स्वतः खाद्य तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी दहा लाख रुपये किमतींची फीडमिल व कच्चा मालही खरेदी केला आहे.
खाद्यात स्वयंपूर्णतः मिळवल्याने प्रति किलोमागे ५० पैसे ते एक रुपयांपर्यंत बचत होत आहे. पाण्याचा स्रोत राहण्यासाठी विहिरीची व्यवस्था केली आहे. प्रयोगशाळेत पाण्याचे घटक तपासून त्याची गुणवत्ता जपली आहे. शेडमध्ये पाण्याच्या टाक्या बसवून त्याद्वारे स्वयंचलित पद्धतीने (निप्पल सिस्टीम) पक्ष्यांना जागेवरच पाणी पिण्याची सोय उपलब्ध केली आहे.
विक्री व अर्थकारण
अनुभवातून टप्प्याटप्प्याने पोल्ट्री उत्पादकांनी व्यवसायाचा विस्तार केला आहे. प्रति शेतकऱ्याकडे किमान दोन शेड्स असून, वार्षिक पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. वाहतूक, खाद्य, मजूर, वीज असा मोठा खर्च होतो. काही वेळा नुकसान होऊन उत्पन्नात घटही होते. काही शेतकऱ्यांनी अंडे विक्रेत्यांसोबत करार करून विक्री व्यवस्था उभारली आहे. त्यातून वाहतूक खर्च आणि वेळ यात बचत होत आहे.
पुणे येथील मॉललाही पॅकिगद्वारे अंड्यांची विक्री केली जाते. व्यवसायात पोल्ट्रीखतही उत्तम प्रतीचे मिळत असल्याने शेतीसाठीही त्याचा फायदा होत आहे. परिसरातील अनेक शेतकरी दरवर्षी त्याची मोठ्या प्रमाणात मागणी करतात. पूर्ण वर्षभराच्या कालावधीत ३० हजार ते ४० हजार रुपयांपर्यंत खतविक्री होऊन अतिरिक्त उत्पन्न मिळते. गावातील दामोदर सोपानराव जगताप यांची पाच एकर शेती आहे.
तीस वर्षांपासून ते पोल्ट्री व्यवसायात आहेत. सध्या त्यांच्याकडे १५ हजारांपर्यंत पक्षी आहेत. वर्षाला चार ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न त्यांना मिळते. चंद्रकांत दामू काळे ३५ वर्षांपासून या व्यवसायात आहेत. पाच एकरांत त्यांचा हा व्यवसाय आहे. सुरुवातीपासून ते ब्रॉयलर पक्ष्यांचे संगोपन करतात. व्यवसाय अधिकाधिक फायदेशीर होण्याच्या दृष्टीने पोल्ट्री उत्पादकांनी काही मागण्या देखील केल्या आहेत. सौर ऊर्जेचा वापर होण्याच्या दृष्टीने ९० टक्के अनुदान द्यावे. करपट्टी माफ करावी अशा काही त्यांच्या अपेक्षा आहेत.
दामोदर जगताप ९६८९००२५९६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.