Sangli News : यंदा राज्यात कमी पावसामुळे आतापासूनच पाण्याची कमतरता जाणवण्यास सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढत असून याचा फटका हस्त बहरातील डाळिंबालाही बसला आहे.
पिकाला पुरेसे पाणी नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी बहर धरण्यासाठी पुढे आले नसल्याचे चित्र आहे. डाळिंबाच्या हस्त बहराला पाणी टंचाईचा फटका बसला असल्याने या बहराखालील डाळिंबाच्या क्षेत्रात २० हजार हेक्टरने कमी झाले असल्याचा अंदाज डाळिंब उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, नाशिक जिल्ह्यासह अनेक भागांत हस्त बहर धरला जातो. मृग बहर सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत धरला जातो. मुळात हा बहर ज्या भागात शाश्वत पाणी उपलब्ध असते, त्याच ठिकाणी धरला जातो.
मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांत अतिवृष्टीचा फटका मृग बहरातील डाळिंबाला बसल्याने डाळिंबाचे कोट्यवधीचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले होते. परिणामी शेतकरी हस्त बहराकडे वळाले. गतवर्षी राज्यात सुमारे ३० हजार हेक्टरवर हस्त बहर धरला होता. साधारणपणे सप्टेंबर ते ऑक्टोबरमधील बहरातील डाळिंबाची विक्री एप्रिलपासून सुरू होते. दरही चांगले मिळतात.
यंदा राज्यात उशिरा पाऊस सुरू झाला. परंतु अनेक भागात पावसाने सरासरीही गाठली नाही. त्यामुळे विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. त्यातच परतीचा पाऊसही कमीअधिक झाला. त्यामुळे धरणे, बंधारे, तलावांत पुरेसा पाणीसाठा झाला नाही. यंदाचा हस्त बहर १० हजार हेक्टर क्षेत्रावर धरला आहे.
परंतु सिंचन योजनांचे आवर्तनही सोडण्यातही अडथळे निर्माण होत आहेत. मात्र, अनेक भागांत पाण्याची कमतरता असल्याने हस्त बहर धरण्यासाठी शेतकरी पुढे आले नाहीत. सध्या डाळिंब बागा गाठीच्या अवस्थेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाला पोषक वातावरण असल्याने डाळिंबावर रोगाचा प्रादुर्भाव नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
ऐन फुलोरावस्थेत असतानाच पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली. परंतु त्यातूनही शेतकऱ्यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करत बागा साधल्या. मात्र, दिवसेंदिवस पाण्याची टंचाई तीव्र होऊ लागल्याने डाळिंबाच्या बागेला ताण बसू लागला आहे. बहुतांश ठिकाणी पाण्याची एक ते दोन आवर्तन झाली आहेत.
धरणात पाणी कमी असल्याने सिंचन योजनांचे कालव्यांना पाणी सोडले जात नाही. त्यामुळे येत्या काळात कालव्यांना पाणी सोडणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पुरेसे पाणी नसल्याने त्याचा फटका फळ वाढीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या हस्त बहराखालील डाळिंबाचे क्षेत्र २० हजार हेक्टरने कमी झाले असल्याचा दावा डाळिंब संघाने व्यक्त केला आहे.
आता टँकरचाच आधार
दिवसेंदिवस पाणी टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना डाळिंबाच्या बागा जगवण्यासाठी टॅंकरचा आधार घ्यावा लागणार आहे. जवळपास असणारे तलाव, विहिरी, बंधाऱ्यांत पाणीसाठा अत्यल्प आहे. तसेच आवर्तन नसल्याने कालव्यांनाही पाणी नाही. परंतु टॅंकरने विकत घेऊन पाणी देण्यासाठी पाणी कोठून उपलब्ध करायचे, असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे आहे.
यंदा पाऊसकाळ कमी असल्याने हस्त बहरातील डाळिंबाला पाणी कमी पडत आहे. परिमाणी हस्त बहराखालील डाळिंबाचे क्षेत्र कमी झाले आहे. पाणी टंचाईमुळे डाळिंब उत्पादकांच्या समस्या वाढल्या आहेत.प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ
आमच्या भागात उजनीचे पाणी येते. पण उजनी धरण भरले नाही. यापूर्वी उजनीचे पाणी सोडले होते. परंतु आता धरणातून पाणी सोडले जाणार का याबाबत शाशंकता आहे.बाळासाहेब देशमुख, डाळिंब उत्पादक शेतकरी, कासेगाव, ता. पंढरपूर जि. सोलापूर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.