Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Water Pollution : घरगुती सांडपाण्यातून होणारे प्रदूषण

Team Agrowon

सतीश खाडे

Pollution problem : पाणी तुटवड्याची समस्या आपण जितकी गांभीर्याने घेतो, तितक्या गांभीर्याने पाणी प्रदूषणाची समस्या घेताना दिसत नाही. खरेतर उपलब्ध असलेल्या पाण्याचे जतन करणे, त्याची शुद्धता टिकवणे सर्वांत महत्त्वाचे काम आहे. नाहीतर ‘हातचे सोडून पळत्यापाठी...’ ही म्हण आपल्यासाठीच तयार झाली असे म्हणावे लागते.

पाणीटंचाई किंवा तुटवड्यामध्ये आपण दूरवरून पाणी वाहून आणणे, निगुतीने वापरणे, एकेक रोप, झाड जगविण्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटेकोर वापर करणाऱ्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करणे, यासारख्या विविध उपाययोजना आपण कष्टपूर्वक अवलंबतो, पण आपल्याकडूनच कळत नकळत होणाऱ्या पाणी प्रदूषणाकडे मात्र आपण पूर्ण दुर्लक्ष करतो.

खरेतर सुरुवातीला एखाद्या अळीप्रमाणे लहान दिसणारी ही समस्या कधी अजगराप्रमाणे अकराळविकराळ स्वरूप धारण करते, हे कळतच नाही. पाणी प्रदूषणाचा विषय आला की तो ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका किंवा सरकारांनी सोडवायचा असतो, अशी आपली परावलंबी समजूत झालेली आहे.

अर्थात, प्रदूषणाबाबत या साऱ्या संस्थांची व तेथील नेतृत्व आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असली तरी आपणही त्यातील महत्त्वाचे शिलेदार होऊ शकतो. कारण अंतिमतः प्रदूषणाच्या या समस्येचा सर्वात पहिला फटका किंवा विळखा आपल्यालाच बसणार आहे. या प्रदूषणरूपी अजगराने आपल्याला विळख्यात आवळून, गुदमरून टाकून गिळेपर्यंत वाट पाहणे कुणालाच परवडणारे नाही.

प्रदूषणाला आपणही तितकेच जबाबदार...

आपण नेहमी प्रदूषण हा शब्द उद्योग, कारखाने यांच्याशी जोडतो. या उद्योगांमुळे होणाऱ्या वेगवेगळ्या प्रदूषणाची चर्चा बातम्या, पुस्तके, समाज, न्यायालये येथे जोरजोरात आणि तावातावाने सुरू असते. कारखान्यांमुळे प्रदूषण होते, हे खरेतर अर्धसत्य आहे.

कारण जगातील कोणत्याही ठिकाणी निदान आजतरी सर्व कारखाने हे माणसांद्वारेच चालवले जातात. म्हणजेच अंतिमतः पाणीच नव्हे तर सर्व प्रकारच्या प्रदूषणाला माणूसच जबाबदार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ही जबाबदारी जेव्हा आपल्या लक्षात येईल, तो सुदिन!

कारखान्यांवर दोष देताना (तो दिलाच पाहिजे!) आपण आपल्या घरात वापरलेल्या पाण्याचे किती प्रदूषण करतो, हेही पाहिले पाहिजे. वाढत्या नागरीकरणामुळे घरगुती पाणी वापर व त्यामुळे निर्माण होणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण ही सर्वांत मोठी समस्या मानावी लागणार आहे.

आपण आपल्या शेतांमुळे होणाऱ्या पाणी प्रदूषणाबाबत पुढे कधीतरी नक्कीच माहिती घेऊ. अशा प्रदूषणामुळे गावचा ओढा असो की सह्याद्री आणि हिमालयातील प्रवाह सारेच प्रदूषित होत आहेत. आणि त्यात प्रमुख वाटा आहे, तो मानवी मलमूत्राचा आणि दैनंदिन वापरात असलेल्या वेगवेगळ्या रसायनांचा!

प्रदूषण सेंद्रिय घटकांचे...

वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील घरगुती सांडपाणी आणि घनकचऱ्याची समस्या बिकट होत चालली आहे. छोट्या मोठ्या नगरांचे किंवा शहरांचे सांडपाणी नदी व ओढ्यात सोडण्याची पद्धत सुमारे शंभर वर्षांपूर्वी सुरू झाली.

मोठ्या शहरापासून सुरू झालेले हे लोण आता गावागावांपर्यंत पोहोचले आहे. पूर्वी घरातले सांडपाणी व सेप्टिक टॅंकमधील पाणी मोकळ्या जागेत शोष खड्डा घेऊन त्यात जिरवले जाई किंवा अगदीच जागा नसेल, तर गटारीमार्फत दूरवर नेले जाई. पण गेल्या काही दशकात शहरातच काय, पण गावातही जागेला खूप मोल आले आहे.

त्यामुळे सांडपाणी वा मलमूत्रांसाठी सेप्टिक टॅंक किंवा शोषखड्डा बांधण्याऐवजी पाइपमध्ये एकत्रित सोडले जाते. हे पाइप किंवा गटारी गावाच्या शेवटी ओढ्यात वा नदीत आणून सोडलेल्या असतात. आता या नद्या किंवा ओढ पूर्वीसारखे वर्षभर वाहते राहिलेले नाहीत. त्यात दर दिवशी दर माणशी २०० ग्रॅम प्रमाणे मैला सोडला जातो.

आता आपल्या गाव किंवा शहराच्या लोकसंख्येने आकडेमोड केली तर या प्रदूषणाचे अवाढव्य स्वरूप आपल्या लक्षात येईल. अगदी छोट्या दोन हजार लोकसंख्येच्या गावातही रोज चारशे किलो मैला तयार होतो आणि तो सरळ नदी नाल्यात सोडला जातो. पुण्यासारखे मोठे शहर घेतले तर त्याची लोकसंख्या सत्तर लाखांपेक्षा अधिक आहे.

प्रदूषण असेंद्रिय घटकांचे

आपण प्रति दिन किती असेंद्रिय (रासायनिक) घटकांचा वापर करत असतो, हे लक्षपूर्वक पाहिल्यास आपल्याला आश्‍चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आता रसायने म्हणजे टूथपेस्ट, अंगाचा साबण, कपड्याचा साबण, डिटर्जंट, फरशी स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे फिनाइल, टॉयलेट क्लीनर म्हणून वापरले जाणारे ॲसिड, भांड्यांचा डिटर्जंट, शाम्पू इ.

अनेक घटक शेवटी रासायनिक आहेत. आपल्या घरगुती सांडपाण्यामधून दररोज माणशी सरासरी २२ ते ४० ग्रॅम असेंद्रिय रसायने बाहेर सोडली जात असतात. यातील अनेक रसायनांचा निसर्गात विघटन होण्याचा कालावधी मोठा (काही महिन्यांपासून काही दशकांपर्यंत) लागू शकतो. उदाहरण म्हणून पुण्यातून (७० लाख लोकसंख्या गृहीत धरून) रोज तीनशे टन असेंद्रिय प्रदूषके सांडपाण्यातून नदीमध्ये मिसळली जातात.

तरी यात कार्यालये, कारखाने व अन्य मोठ्या संस्थांतून येणाऱ्या अशा रसायनांचा हिशेब धरलेला नाही. तो धरला तर हाच आकडा जाईल १७०० टनांपर्यंत... म्हणजे १७० मोठे ट्रक इतकी रसायने नदीत सोडली जातात. या जिल्ह्यातील वाहणाऱ्या १६ नद्यांतील प्रदूषणाचा हिशेब कारखान्याच्या सांडपाण्यासह केला, तर अंतिमतः भीमा नदीत किती प्रदूषण जाते याचा हिशेब आपल्याला लावता येईल.

केवळ पुण्याचेच कशाला जवळपास प्रत्येक शहर आणि तेथील नद्या नाल्यांबाबतही हेच लागू आहे. आपल्या छोट्या गावात नाही हो प्रदूषण असे म्हणायचीही सोय राहिलेली नाही. कारण आता ग्रामीण भागातली जवळपास हीच रसायने वापरली जात आहेत. फक्त आपल्या गावाच्या लोकसंख्येवरून थोडी आकडेमोड केली, तर आपल्या गावामुळे होणारे प्रदूषण काढता येईल. वर्षभर हेच सांडपाणी नद्यांच्या पात्रात वाहत राहते.

त्याच पाण्याचा वापर आपल्या पुढील गाव हे पिण्यासाठी, शेतीसाठी करत राहते. त्यातून शेतात, शेतातून पिकात आणि पिकातून पुन्हा आपल्या ताटात प्रदूषके येऊन कधी पडतात, हे कळतही नाही. अगदी धरणामध्ये जाऊन पोहोचलेले पाणीही पुन्हा कॅनॉलमार्फत आपल्या शेतामध्ये येते. यातून जमिनी, भूजल, पिके या सर्वांवर प्रचंड नकारात्मक परिणाम झाला आहे.

घरातील रसायनांबरोबरच रस्त्यावर सांडलेली विविध रसायने, पदार्थ, तसेच सांडलेले पेट्रोल, डिझेल, ऑइल वॉशिंग सेंटर व पेट्रोल पंपावर सांडलेले पेट्रोल, डिझेल हे काही जमिनीत मुरून व काही पावसामुळे वाहून येऊन नदीच्या पाण्यात मिसळतात.

त्यातील शिसे, क्रोमियम, पारा, आर्सेनिक अशी अनेक विषारी रसायने पाण्यात येतात. वैद्यकीय कचरा आणि सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी कडक नियम असले, तरी अपवाद वगळता सर्व हॉस्पिटल्स व क्लिनिक येथून बाहेर येणारे सांडपाणी हाही धोक्याचाच विषय आहे. त्याला जोड मिळते, ती शाळा, कॉलेजमधील प्रयोगशाळांतून बाहेर पडणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्याची.

कारण या दोन्ही ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची अपवादानेच सोय असते. हे प्रदूषण वेगवेगळ्या मार्गाने माणसांच्या शरीरात पोहोचत असून, त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. दवाखाने, हॉस्पिटल यांची वाढती संख्या, औषधांचा मोठा खप, आरोग्यावरचा वैयक्तिक व शासनाचा खर्च आणि त्याहीपेक्षा अनेक अनाकलनीय आजार या सर्वांची आकडेवारीच आपल्याला प्रदूषणाची प्रचिती देत आहे.

तोकडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे...

मोठ्या शहरांच्या महापालिका हद्दीमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र दिसत असली तरी नगरपालिका किंवा अन्य स्थानिक संस्थांच्या पातळीवर ती अजिबात दिसत नाही. असलीच तर एकूण सांडपाण्याच्या तुलनेत अत्यंत तोकड्या क्षमतेची आहेत. त्यामुळे प्रदूषित पाणी प्रक्रिया न होताच नदीपात्रांमध्ये सोडले जाते.

सांडपाणी प्रक्रिया केंद्रे व तेथील तंत्रज्ञान हे कालबाह्य ठरत आहे. अगदी काही ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने सांडपाणी प्रक्रिया केंद्रे चालवायची ठरवली तरी त्यातून सांडपाणी शुद्धी व प्रदूषण मुक्तता हा केवळ भ्रम ठरू शकतो. याविषयी एखाद्या लेखात नक्कीच भाष्य करता येईल.

स्थानिक प्रदूषणकारक उत्पादने

-डॉ. प्रमोद मोघे यांचा अभ्यास

स्थानिक उत्पादने रसायने प्रमाण

टूथपेस्ट फॉस्फेट्‌स, कार्बोनेट्‌स,

सुगंधी द्रव्ये, डिटर्जंट ४ ग्रॅम

शेव्हिंग क्रिम फेसकारक रसायने,

सल्फेट्‌स, कार्बोनेट्‌स ५ ग्रॅम

अंघोळीची उत्पादने फिनॉल, खाद्यतेल, सुगंधी द्रव्ये, रंग, सल्फेट्‌स, कार्बोनेट्‌स, कार्बनी संयुगे, डिटर्जंट. ५ ते ८ ग्रॅम

फरशी, बाथरुम स्वच्छता कार्बोनेट्‌स, वेगवेगळी आम्ले, फिनेल १० ग्रॅम

युटेन्सिल स्वच्छता सिलाका, कार्बोनट्‌स,

सोडिअम संयुगे १० ग्रॅम

डिटर्जंट फॉस्फेट्‌स, कार्बोनेट्‌स, ट्रायक्लोसॅन, मोनोइथेनो अलअमाईन १० ग्रॅम

सौंदर्य प्रसाधने ट्रायइथेनो अलअमाईन ५ ग्रॅम

प्रति व्यक्ती प्रति दिन ४० ग्रॅम

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT