Politics Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Politics: राजकारण अस्मितेचे; डोळे दिल्लीकडे...

Delhi Influence: इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सत्तर आणि ऐंशीच्या दशकापासून काही अपवाद वगळता महाराष्ट्राचे राजकारण सदैव दिल्लीतील श्रेष्ठींवरच अवलंबून राहिलेले आहे. इंदिरा गांधींची जागा आता पंतप्रधान मोदींनी घेतली आहे.

Team Agrowon

Political History: देशाच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीचे नेते राज्याच्या राजकारणात भविष्यात मोठे बदल घडण्याचे संकेत शोधत आहेत. त्यानुसार दिल्लीमध्ये मोर्चेबांधणी करीत आहेत. या संभाव्य घडामोडींमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असेल या जाणिवेने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही महाविकास आघाडीतील नेत्यांशी सौहार्द वाढविला आहे. त्याचे प्रत्यंतर राजधानी दिल्लीमध्ये एकाचवेळी सहकुटुंब दाखल झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीतून दिसून आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीचे उद्देश वेगवेगळे होते. शिंदे आधीच्या आठवड्यातही दिल्लीत आले. महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळे घडण्याची शक्यता असेल, तर त्याचे सर्वाधिक लाभ दिल्लीतील महाशक्तीच्या सौजन्याने शिवसेनेला मिळावे, अशी शिंदे यांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. कुठलाही राजकीय अजेंडा नसताना राहुल गांधींच्या आग्रहावरून आलोच आहे, तर महत्त्वाच्या भेटीगाठी घेऊन दिल्ली दौरा सत्कारणी लावावा, असे उद्धव ठाकरेंना वाटणे स्वाभाविक होते.

दिल्लीतल्या भेटीगाठी

एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण होते, तर उद्धव ठाकरे यांना ‘इंडिया आघाडी’च्या नेत्यांसोबत होणाऱ्या राहुल गांधींच्या प्रीतिभोजनाचे. एकनाथ शिंदे यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर असलेले नरेंद्र मोदी आणि सर्वाधिक काळ गृहमंत्रिपद भूषविणारे अमित शहा या त्यांच्या पक्षाच्या सदैव पाठीशी असलेल्या दोन महाशक्तींच्या भेटी घेतल्या. त्यांनी पंतप्रधान मोदींची ७, लोककल्याण मार्ग निवासस्थानी सहकुटुंब भेट घेतली, तर गृहमंत्री अमित शहांना ते संसद भवनात पक्षाच्या खासदारांसोबत भेटले.

उद्धव ठाकरेंनीही राज्यातील विरोधी महाविकास आघाडीचे दिल्लीतील श्रेष्ठी शरद पवार आणि त्यापाठोपाठ राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. शिवसेनेच्या दोन गटांतील या दोन नेत्यांच्या दिल्लीतील भेटींमधील फरक एवढाच, की मोदी आणि शहा हे एकनाथ शिंदे यांचे अप्रत्यक्षपणाने का होईना पक्षश्रेष्ठी ठरले आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी महाविकास आघाडीतील ज्येष्ठ सहकारी आहेत. दिल्लीत आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानांनी हा फरक नेमकेपणाने स्पष्ट झाला.

अमित शहांसोबत झालेल्या शिंदे यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी सत्ताधारी महायुतीने संयुक्तपणे लढवायच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय होता. दुसरीकडे महाविकास आघाडीत असलो, तरी मुंबई महापालिकेसह काही शहरांतील निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यास राज ठाकरे आणि आपण समर्थ आहोत, असा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसजनांना उद्देशून केलेले वक्तव्य होते. उद्धव आणि राज यांच्या हातमिळवणीविषयी काँग्रेसला आक्षेप नाही.

उलट त्यामुळे मुंबई महापालिका तसेच शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांचा प्रभाव असलेल्या राज्यातील सात ते आठ महापालिकांमध्ये वेगळे लढण्याची संधी काँग्रेसला मिळणार आहे. शिंदे यांना आपला पक्ष एकजूट ठेवून भक्कम करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांचे पाठबळ हवे आहे, तर मराठीच्या मुद्यावरून राज ठाकरे यांच्याशी केलेल्या हातमिळवणीवर आक्षेप न घेता उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीबाहेर जाऊ न देणे राहुल गांधींसाठी महत्त्वाचे आहे.

महाशक्तीची आस्था

महाराष्ट्रात तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाट्यमय सत्तांतर झाले. तेव्हापासून राज्यात पुन्हा सत्ता मिळविल्यानंतरच्या काळात मोदी-शहांच्या महाशक्तीची एकनाथ शिंदेवरील आस्था कायम आहे. राज्याच्या राजकारणातील सुप्त सत्तासंघर्षातून उद्‍भवणाऱ्या त्यांच्या तक्रारी-गाऱ्हाणी-सूचना भाजपच्या सर्वोच्च स्तरावर ऐकल्या जाऊन त्यांचे समाधान केले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७, लोककल्याण मार्ग निवासस्थानी एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता, डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली यांच्यासह सहकुटुंब भेटून श्रावण महिन्यानिमित्त महादेवाची प्रतिमा भेट दिली आणि राज्यातील राजकारणावर विस्तृत चर्चाही केली. मोदी आणि शहांवरील या विश्वासापोटी उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरविण्याचा सर्वाधिकार शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांना दिले आहे.

मोदी-शहा-शिंदे यांच्यासारखा व्यक्तिगत सौहार्द गेल्या सहा वर्षांपासून महाविकास आघाडीत आणि दोन वर्षांपासून ‘इंडिया आघाडी’मध्ये असलेल्या उद्धव ठाकरेंशी राहुल गांधींना साधता आला नव्हता. पण लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून ‘५, सुनहरी बाग’ बंगल्यात मुक्काम हलविल्यानंतर आपल्या वाढलेल्या राजकीय जबाबदाऱ्या आणि अपेक्षांची राहुल गांधी यांना जाणीव झालेली दिसते. त्यामुळेच त्यांनी नव्या निवासस्थानी आयोजित केलेल्या प्रीतिभोजनानिमित्ताने ‘इंडिया आघाडी’तील सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करताना उद्धव ठाकरे यांना आवर्जून सहकुटुंब येण्याचा आग्रह केल्यामुळे रश्मी आणि आदित्य ठाकरे दिल्लीत आले होते.

या वेळी बंगल्याच्या हिरवळीवर इलेक्ट्रिक स्क्रीनवर सादर करण्यात आलेले प्रेझेंटेशन बघताना डोळ्यांना त्रास होऊ नये, म्हणून दूर बसल्याचा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या आसनव्यवस्थेवरून मुख्यमंत्री फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांना टीका करण्याची संधी मिळाली. पण या प्रीतिभोजनाच्या निमित्ताने ठाकरे आणि गांधी कुटुंबीय कधी नव्हे इतके निकट आले हेही तेवढेच खरे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांनी उद्धव, रश्मी आणि आदित्य ठाकरेंना संपूर्ण बंगला दाखविताना त्यात लावलेले पेंटिंग्ज तसेच प्रियांकांचे पुत्र रेहान वाड्रा यांनी टिपलेल्या छायाचित्रांवर आणि वन्यजीवांवर चर्चा केली.

भोजनानंतर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची बंद दारामागे उद्धव ठाकरेंंशी स्वतंत्रपणे चर्चाही केली. सोमवारी, ‘इंडिया आघाडी’कडून मतांच्या चोरीच्या आरोपावरून निवडणूक आयोगावर काढण्यात येत असलेल्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय या बैठकीत झाला. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सत्तर आणि ऐंशीच्या दशकापासून काही अपवाद वगळता महाराष्ट्राचे राजकारण सदैव दिल्लीतील श्रेष्ठींवरच अवलंबून राहिलेले आहे. इंदिरा गांधींची जागा आता पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. काँग्रेस आणि भाजपपाठोपाठ आता मराठी अस्मितेवरून संघर्ष शिवसेनेच्या दोन्ही गटांचे डोळे दिल्लीकडेच लागलेले असतात, हेच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या सहकुटुंब दिल्ली भेटीने दाखवून दिले आहे.

(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Disease : ऊस पिकावर तांबेरा, करपा रोग

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

Crop Insurance Scheme Reforms : जुन्या पीकविमा योजनेतील त्रुटी नव्या योजनेतही कायम

Agriculture Research : कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे देशातील १४२ कोटी लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य

Agriculture Scheme: शेततळ्यासाठी २ लाखांपर्यंत मिळणार अनुदान; शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना

SCROLL FOR NEXT