
New Delhi: मतदार यादीतील बनावट नावे आणि गुपचूप घडणारी फेरफार ही मतांची चोरी असून ती देशद्रोहासारखीच आहे," असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी भाजप व निवडणूक आयोग यांच्यावर संगनमत करून निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा ठपका ठेवला आहे. महाराष्ट्रात ४० लाख बनावट मतदारांची नोंद, बिहार व कर्नाटकमध्येही अशाच प्रकारच्या अनियमितता आढळल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी म्हणाले, "ही अघोषित एनआरसी असून, लोकशाहीला मारण्याचा डाव आहे
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (ता.७) पत्रकार परिषदेत मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा दावा करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी काही कागदपत्रे आणि छायाचित्रे सादर करत प्रझंटेशन दिल. महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये ४० लाख मतदार गूढरित्या जोडले गेल्याचा आणि निवडणूक आयोगाने भाजपच्या फायद्यासाठी मतदार यादीत हेराफेरी केल्याचा त्यांचा आरोप आहे.
मतदार यादीतील गैरप्रकारांचा गौप्यस्फोट
राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत सादरीकरण करत निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार यादीत हेराफेरी झाली. "आम्ही महाराष्ट्रात निवडणुका हरलो, कारण मतदार यादीत ४० लाख नवीन मतदार गूढरित्या जोडले गेले.
हे मतदार कुठून आले? निवडणूक आयोगाने याचे स्पष्टीकरण द्यावे," असे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी निवडणूक आयोगाकडे मतदार यादींच्या डिजिटल प्रती मागवल्या होत्या., पण आयोगाने त्याला नकार दिला."आम्ही वारंवार डेटा मागितला, पण आयोगाने तो दिला नाही. मतदार यादी बरोबर आहे की चूक, याचे उत्तर आयोगाने द्यावे," असे त्यांनी आव्हान दिले.
मतदार यादीतील पाच प्रकारच्या अनियमितता
राहुल गांधी यांनी आपल्या सादरीकरणात मतदार यादीतील पाच प्रकारच्या अनियमिततांचा उल्लेख केला:
डुप्लिकेट मतदार: एकाच व्यक्तीची नावे अनेकदा समाविष्ट केली गेली.
बनावट आणि चुकीचे पत्ते: मतदार यादीत ४०,००० घरांचे पत्ते 'शून्य' (0) असे नोंदवले गेले.
एकाच पत्त्यावर अनेक मतदार: काही ठिकाणी एकाच पत्त्यावर ४६ मतदार नोंदवले गेले.
चुकीचे फोटो: मतदार यादीत चुकीच्या व्यक्तींचे फोटो वापरले गेले.
फॉर्म ६ चा गैरवापर: नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म ६ चा गैरप्रकाराने वापर झाला.
राहुल गांधी यांनी दावा केला की, त्यांच्या पक्षाने सहा महिन्यांच्या सखोल तपासानंतर या गैरप्रकारांचा पर्दाफाश केला आहे. "आम्हाला मतदार यादींची कागदी प्रती दिल्या गेल्या, ज्या स्कॅन करता येत नाहीत. आम्ही एका मतदारसंघाची यादी डिजिटल स्वरूपात रूपांतरित केली आणि यातून अनेक गैरप्रकार उघड झाले," असे त्यांनी सांगितले. त्यांनी याला "ॲटम बॉम्ब" संबोधत, याचे पुरावे लवकरच देशासमोर आणणार असल्याचे म्हटले आहे.
निवडणूक आयोग आणि भाजपचे संगनमत?
राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर भाजपशी संगनमत केल्याचा आरोप केला. "ही मतदार यादीतील हेराफेरी निवडणूक आयोग आणि भाजपच्या सहकार्याने झाली आहे. यातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये १५-२० जागा हेराफेरी करून जिंकल्या गेल्या," असा दावा त्यांनी केला. त्यांनी एका मतदारसंघात ६.५ लाख मतदारांपैकी १.५ लाख बनावट असल्याचे सांगितले. "ही मतांची चोरी आहे आणि याला देशद्रोहापेक्षा कमी नाही," असे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी निवडणूक आयोगातील दोषी अधिकाऱ्यांना इशारा दिला की, "तुम्ही कितीही लपण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही."
निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना "निराधार" म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. आयोगाने सांगितले की, त्यांनी १२ जून रोजी राहुल गांधींना ईमेल आणि पत्राद्वारे पुरावे सादर करण्याचे आवाहन केले होते, पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. "राहुल गांधी यांनी आजपर्यंत कोणतीही औपचारिक तक्रार किंवा पत्र आयोगाला पाठवले नाही," असे आयोगाने स्पष्ट केले. आयोगाने आपली प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक असल्याचा दावा केला आहे.
बिहारमधील मतदार यादी गोंधळ
राहुल गांधी यांनी बिहारमधील मतदार पुनरावृत्ती प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. "बिहारमध्ये ५१ लाख मतदारांची नावे यादीतून काढली गेली. यामुळे अनेक गरीब आणि कामगारांचे मतदानाचे हक्क हिरावले गेले," असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यांनी याला "अघोषित एनआरसी" संबोधत, यामुळे देशात नागरिकत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सोबतच राहुल गांधी यांनी कर्नाटकातील एका लोकसभा मतदारसंघात ६०,००० बनावट मतदार आढळल्याचा दावा केला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या आरोपांना पाठिंबा देत, निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरील आरोपांचे पुरावे लवकरच जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. "हे पुरावे जाहीर झाल्यावर देशाला निवडणूक आयोगाचे खरे स्वरूप कळेल," असे त्यांनी ठामपणे सांगितले. या प्रकरणाने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप राजकीयदृष्ट्या अधिक संवेदनशील बनले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.