Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Management : पावसाचा खंड पडल्यास पिकांचे नियोजन कसे कराल?

Team Agrowon

डॉ.आनंद गोरे, डॉ. वासुदेव नारखेडे

Kharif Season : यावर्षी काही भागात पावसाला वेळेवर तर काही भागात उशिरा सुरुवात झाली. काही क्षेत्रात अजूनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. जेथे पाऊस उशिरा सुरु झाला तेथे वितरणामध्ये तफावत आहे. जेथे पाऊस झाला अशा ठिकाणी गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून पावसाचा खंड आहे किंवा पावसाचे प्रमाण कमी आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पिकांना पाण्याचा ताण बसू नये यासाठी हलकी कोळपणी करावी.

यामुळे जमिनीला पडलेल्या भेगा बुजतात. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे शक्य होते. खुरपणी, कोळपणीद्वारे तण नियंत्रण करावे. जमिनीतील ओलावा नसल्याने पिकांना फवारणीद्वारे अन्नद्रव्य द्यावेत .‍पोटॅशिअमच्या फवारणीमुळे पर्णरंध्रातून उडून जाणारे पाणी कमी करता येते. हलकी कोळपणी, आच्छादनाचा वापर, तुषार, ठिबक सिंचनाचा वापर, एक आड एक सरी वाटे संरक्षित सिंचनाचा अवलंब करावा.

पेरणी झाली आहे, परंतु पावसाने ओढ दिली आहे अशा ठिकाणचे नियोजन

तुषार सिंचन, ठिबक सिंचन, मडका सिंचन, एक आड एक सरी वाटे संरक्षित सिंचनाचा अवलंब करावा. सुरुवातीच्या पीकवाढीच्या अवस्थेत तसेच संवेदनशील अवस्थेत पाणी देण्याची व्यवस्था करावी. उदा. पीक वाढीची अवस्था, फुलोरा, दाणे भरण्याची व पोसण्याची अवस्था या अवस्थेत पिकांना पाणी द्यावे.

बऱ्याच वेळा सुरुवातीस पावसाच्या आगमनानंतर पावसाचे एक ते दोन खंड विशेष करून जुलै-ऑगस्ट महिन्यात आढळून येतात. अशावेळी जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकांना पाण्याचा ताण बसतो. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. (उदा. सुबाभूळ, गिरिपुष्पाचा पाला, सोयाबीन, भात, काड/भुसा, मातीची भर इत्यादी)

पीक २१ दिवसांचे झाले असल्यास परिस्थितीनुसार हलकी कोळपणी करावी, मातीची भर द्यावी. पावसाचा खंड आढळून आल्यास पिकांच्या अवस्थेनुसार वरचेवर हलक्या कोळपण्या करून जमिनीच्या भेगा बुजविण्यात याव्यात. यामुळे ओलावा टिकवून ठेवता येतो, जमिनीतील ओलावा उडून जाण्याचे प्रमाण कमी होते.

वेळेवर तण नियंत्रण करावे. आंतर मशागतीमध्ये वाढीच्या अवस्थेनुसार पाळी मारून /वेळेवर खुरपणी/कोळपणी करून तण नियंत्रण करावे. तणांमुळे पिकांना अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश, जागा इत्यादीसाठी स्पर्धा निर्माण होणार नाही. आंतरमशागतीमध्ये पिकांना मातीची भर दिल्यास ओलावा टिकून राहतो, हवा खेळती राहते, तणांचे नियंत्रण होते. पिकांना वाढीसाठी फायदा होतो.

जमिनीत ओलावा नसल्याने पिकांना फवारणीव्दारे अन्नद्रव्य द्यावीत. ओलावा कमी असल्यास किंवा इतर परिस्थितीमुळे पिकांची वाढ समाधानकारक नसल्यास पिके ३० दिवसाच्या आत असल्यास पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) ०.५ टक्का (५० ग्रॅम दहा लिटर पाणी), ३० ते ६० दिवसाच्या पिकांवर पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) १ टक्का (१०० ग्रॅम दहा लिटर पाणी) आणि ६० दिवसाच्या पुढे पावसाचा खंड आल्यास पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) २ टक्के (२०० ग्रॅम दहा लिटर पाणी) फवारावे.

केओलीन या बाष्परोधकाची ६ ते ७ टक्के फवारणी करावी.

ठरावीक अंतरावर जलसंधारण सऱ्या काढाव्यात. कापूस, तूर सारख्या पिकांमध्ये एक किंवा दोन ओळीनंतर, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन यांसारख्या कमी अंतरावरील पिकामध्ये प्रत्येक ४ ते ६ ओळींनंतर सुरुवातीची खुरपणी/कोळपणी झाल्यानंतर ३० ते ३५ दिवसांनी बळिराम नांगराने सऱ्या पाडाव्यात (१५ सेंमी खोल) त्यामुळे पावसाचे पाणी मुरण्यास आणि त्याचा लाभ पिकाला पुढील कालावधीसाठी किंवा पुढील रब्बी पिकासाठी होतो. अधिक पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी सरीवाटे शेताबाहेर जाते.

फळबागासाठी बोर्डो पेस्टचा वापर करावा.

फळझाडांमध्ये आच्छादनाचा वापर करावा. वाळलेले गवत, सोयाबीन भुसा, भात भुसा किंवा गिरिपुष्प किंवा सुबाभूळ पाला आच्छादनासाठी वापरावा.

वेळेवर तण, कीड व रोग व्यवस्थापनावर भर द्यावा. पावसाच्या खंड काळात रस शोषण करणाऱ्या किडी, खोड कीड, चक्री भुंगा, नागअळीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी योग्य ते सर्वेक्षण व कीड नियंत्रण उपाययोजना करावी. सततचे ढगाळ हवामान असल्यास योग्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.

बळिराम किंवा सरीच्या नांगराने किंवा कोळप्याने पेरणीपूर्वी पिकानुसार ५० ते ६० सेंमी अंतरावर सरी वरंबा तयार करून वरंब्यावर लागवड करावी. आंतर मशागतीची सुरवातीची कामे झाल्यानंतर सरी वरंबे तयार करून उताराच्या जमिनीमध्ये सरीच्या लांबीवर ५ ते ७ मीटर अंतरावर सऱ्यांमध्ये आडवे वरंबे तयार केल्यास सरीमध्ये जमा झालेले पाणी उताराच्या दिशेने न वाहता जमिनीत मुरण्यास मदत होते.

डॉ.आनंद गोरे, ९५८८६४८२४२

(अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT