Crop Management : पावसाच्या आगमनानुसार पिकांचे नियोजन

Agriculture Climate Change : हवामान बदलामुळे पावसाचे आगमन, वितरणामध्ये बराचसा बदल दिसत आहे. याचा परिणाम कोरडवाहू शेतीवर दिसून येत आहे. हे लक्षात घेऊन पावसाच्या पावसाचे जास्तीत जास्त मूलस्थानी जलसंधारण करावे.
Crop Management
Crop Management Agrowon

डॉ. आनंद गोरे, डॉ. वासुदेव नारखेडे

Indian Agriculture : या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तसेच ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक असेल, अशी शक्यता आहे. या वर्षी बहुतेक ठिकाणी आजपर्यंत पेरणी योग्य पाऊस झाला आहे. काही ठिकाणी सुरुवातीच्या पावसानंतर काही दिवसाचा खंड दिसून आला आहे. काही ठिकाणी मात्र अजूनही पेरणीयोग्य पावसाची अपेक्षा आहे.

काही भागात मात्र चांगला पाऊस असल्याने पेरणी आणि अत्यंत तुरळक ठिकाणी आंतरमशागतीच्या अडचणी आहेत. याबाबत शास्त्रीय पद्धतीने जमीन व पावसाचा विचार करून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पीक पद्धतीचा अवलंब कसा करावा यावर विविध शिफारशी केल्या आहेत.

विद्यापीठाच्या शिफारशी

पावसाचे आगमन वेळेवर किंवा ७ जून ते ३० जून दरम्यान झाल्यास मराठवाडा विभागात घेतली जाणारी नियमित पिके उदा. मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस, मका, खरीप ज्वारी, पेरसाळ, बाजरी, खरीप भुईमूग आणि संबंधित आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

उशिरात उशिरा ७ जुलैपर्यंत मूग, उडीद, भुईमूग पिकांची पेरणी करता येते. त्यापेक्षा उशीर झाल्यास पिकांच्या उत्पादनात घट येते. शिफारशीत जातींची निवड करावी.

पाऊस ३० जूनपर्यंत किंवा ७ जुलैपर्यंत आला नाही तर पीक नियोजनात बदल करावेत. ८ जुलैपर्यंत पाऊस लांबला तर मूग, उडीद, भुईमूग पिकांऐवजी कापूस, सोयाबीन, तूर, संकरित बाजरी, तीळ, सूर्यफूल, संकरित ज्वारी या पिकांना प्राधान्य द्यावे.

Crop Management
Crop Management : हिरवळीच्या खतांसाठी विविध पिकांचे नियोजन

पावसाचे आगमन ८ ते १५ जुलैदरम्यान झाल्यास कापूस, सोयाबीन, तूर, संकरित बाजरी, तीळ, सूर्यफूल, संकरित ज्वारी ही पिके घ्यावीत. मूग, उडीद, भुईमूग लागवड करू नये.

पावसाचे आगमन १६ जुलै ते ३१ जुलैदरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग व कापूस या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, या पिकांबरोबरच सोयाबीन अधिक तूर (४:२), बाजरी अधिक तूर (३:३), एरंडी अधिक धने, एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. संकरित ज्वारी, भुईमूग, कापूस लागवड करू नये.

पावसाचे आगमन १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, कापूस या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, तीळ या पिकाबरोबर एरंडी अधिक धने (१:१), एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, कापूस लागवड करू नये.

पावसाचे आगमन १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, कापूस, रागी, तीळ या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, या पिकांबरोबर एरंडी अधिक धने (१:१), एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, कापूस, रागी, तीळ ही पिके घेऊ नयेत.

सोयाबीन आणि कापूस लागवडीशिवाय इतर पर्याय उपलब्ध नसल्यास उशिरात उशिरा २२ जुलैपर्यंत लागवड करावी. त्यानंतर लागवड करू नये, कारण उत्पादनात मोठी घट येते.

Crop Management
Crop Management : हिरवळीच्या खतांसाठी विविध पिकांचे नियोजन

महत्त्वाचे मुद्दे

सर्वसाधारणपणे १५ जुलैपर्यंत सर्व पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते. अद्यापही ही वेळ गेलेली नाही. जून शेवटच्या आठवडा किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यास पेरणी वेळेवर करता येते.

मराठवाडा विभागात सर्वसाधारणपणे १५ जुलैपर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते. केवळ मूग, उडीद व भुईमूग पिकांची पेरणी ७ जुलै पर्यंत करावी. उशिरा पेरणीमुळे उत्पादनात होणारी घट आणि काढणीच्या वेळी पीक पावसात सापडण्याची शक्यता लक्षात घेणे गरजेचे आहे. १६ जुलैनंतर सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, एरंडी, कारळा आणि तीळ या पिकांची लागवड करावी. सोयाबीन आणि तूर (४:२), बाजरी अधिक तूर (३:३), एरंडी अधिक धने, एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

बऱ्याच वेळा पाऊस उशिरा सुरू होत असून, उशिरा संपत असल्यामुळे सोयाबीन, कापूस लागवड १५ जुलैपर्यंत करता येईल. सोयाबीन लागवड ३१ जुलैपर्यंत आंतरपीक पद्धतीमध्ये करावी. उदा. सोयाबीन अधिक तूर (४:२).

योग्य नियोजन महत्त्वाचे

अद्याप अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाल्या नसल्याने घाबरून न जाता पेरणीयोग्य पाऊस होण्याची (७५ ते १०० मिलिमीटर) वाट पाहावी. प्रत्येक पिकासाठी दिलेल्या कालावधीनुसार पिकाची पेरणी करावी. सर्वसाधारण परिस्थिती तसेच उशिरा पेरणीसाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी.

कापसाची पेरणी खोल व मध्यम खोल काळ्या जमिनीत करावी. हलक्या जमिनीत लागवड करू नये.

कपाशी अधिक तूर (१०:२ किंवा ६:१), सोयाबीन अधिक तूर (४:२) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

सोयाबीन पिकांची पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी.

तूर लागवडीसाठी शिफारसीत जाती निवडाव्यात. योग्य अंतरावर लागवड करावी.

मध्यम ते भारी जमिनीत कापसासोबत तूर, खरीप ज्वारी आणि सोयाबीन लागवड करावी.

हमखास पावसाच्या क्षेत्रात मध्यम ते भारी जमिनीकरिता दुबार पीक पद्धतीचा अवलंब करावा. (मूग, रब्बी ज्वारी, संकरित ज्वारी-करडई/हरभरा, सोयाबीन- हरभरा)

मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी लागवड करावी.

हलक्या जमिनीत बाजरी, तीळ, कारळा, एरंडी लागवड करावी.

कापसामध्ये तूर (६:१ किंवा १०:२), सोयाबीन (१:१), मूग (१:१) किंवा उडीद (१:१) याप्रमाणे आंतरपिके घ्यावीत.

भारी जमीन व एक ते दोन सिंचन असल्यास तुरीच्या बीएसएमआर ७३६, गोदावरी, बीएसएमआर ८५३, बीडीएन ७१६ या जातींची निवड करावी. बीडीएन ७११ ही जात कमी कालावधीची आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी या जातीची निवड करावी.

मशागत, पेरणी उताराला आडवी केल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरेल, त्याचा पिकांना लाभ होतो.

प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. सोयाबीनचे घरचे बियाणे वापरता येते. पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून तयार होणारे बियाणे दोन ते तीन वर्षे पेरणीसाठी वापरता येते, परंतु यासाठी घरच्या घरी उगवण क्षमता तपासावी (कमीत कमी ७० टक्के असावी). बुरशीनाशक, जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी.

योग्य अंतर आणि खोलीवर पेरणी करावी (उदा. सोयाबीनची ४ ते ५ सेंमीपेक्षा जास्त खोलीवर पेरणी करू नये) योग्य बियाणे पेरणीसाठी वापरावे. हेक्टरी योग्य रोपांची संख्या ठेवावी. वेळेवर आंतरमशागत करून तण नियंत्रण करावे.

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. रासायनिक खतांच्या शिफारस मात्रेसोबतच शिफारस केलेली सेंद्रिय खतांची मात्रा द्यावी किंवा ५० ते ७५ टक्के रासायनिक खतासोबत २५ ते ५० टक्के सेंद्रिय खतांचा वापर करावा. यामुळे जमिनीचे जैविक, भौतिक व जैविक गुणधर्म राखण्यास मदत होते.

एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा. यामुळे खर्चात बचत होते. उदा. सापळा पिके, जैविक कीटकनाशके, आंतर पीक पद्धती, पक्षी थांबे, विविध प्रकारचे सापळे इत्यादी.

डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२

(अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com