Tree Conservation : सातारा जिल्ह्यातील वाई हे टुमदार गाव. निसर्गरम्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले हे गाव महाबळेश्वरपासून जवळ आहे. गेल्या काही दिवसांपासून इथले जनजीवन ढवळून निघाले आहे. वाई- सुरूर रस्ता रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात स्थानिक लोक एकत्र आले.
त्यांनी समूहशक्तीचा प्रत्यय दिला. परिणामी, रस्त्याच्या आराखड्यात बदल करण्याचे राज्यकर्त्यांनी मान्य केले. आता एकाही झाडाला हात न लावता रस्ता रुंद होणार आहे. वाई तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी अत्यंत संयतपणे चिकाटीने आणि शांततेच्या मार्गाने चालविलेल्या चळवळीचे हे फलित.
वाई-सुरूर हा अंदाजे १२ किमी लांबीचा रस्ता. पूर्वी त्याच्या दुतर्फा जुनी वडाची, आंब्याची, करंजेची झाडे. शेंडे एकमेकांना जवळ जवळ चिकटलेले. त्यामुळे रस्त्यावर गर्द, थंडगार सावली. कालौघात झाडे कमी झाली. तरी सुद्धा आजही ५०च्या आसपास मोठे वड आहेत. पाचशे माणसे सहज उभी राहू शकतील इतकी सावली आहे. धनेश, तांबट आणि इतरही अनेक पक्षी, सरपटणारे प्राणी, खारी या सगळ्यांचे हे गोकूळ.
सुरूर ते पोलादपूर रस्ता रुंदीकरणाची टूम निघाली. त्या अनुषंगाने सुरूर- वाई रस्त्याचे काम सुरू झाले. कारण दिले गेले वाहनांची वाढती वर्दळ. सुरुवातीला या रस्त्यावरची सगळीच म्हणजे पाचशेच्या आसपास झाडे जाणार होती. पण नंतरच्या सर्व्हेक्षणात ५४ मोठी झाडे तिथून हलवून पुनर्रोपित करायचे ठरले. पण जागा वगैरे ठरली नाही. तिथून कित्येक किलोमीटर अंतरावर दूर ही झाडे हलवायची असे ठरले.
झाडे हलवून रस्ता मोठा करायचा, हे लोकांना पटले नाही. झाडांसाठी माणसे, लहान मुले, तरुण, स्त्रिया, वयस्क सगळे रस्त्यावर उतरले. फलक रंगवले, रिल्स केल्या, माहिती गोळा केली, अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, शक्य तसा वेळ दिला. पदयात्रा निघाल्या. तरुण मुले- मुली सुरूर ते वाई भर उन्हात धावली. सायकल रॅली निघाली. गावागावांतून बैठका झाल्या. लोकांचे संघटन उभे राहिले. हजारो लोक एकत्र आले. विशेष म्हणजे हे संघटन संपूर्ण अराजकीय आहे. कोणतेही खास नेतृत्व नसलेले. लोक वर्गणीतून उभे राहिलेले. हरित लवादाकडेही लोक गेले. स्थानिक वकिलांनी विना मोबदला काम केले.
पर्याय असूनही रुंदीकरणाचा घाट ः
प्रश्न फक्त झाडांचा नव्हता. प्रश्न रस्ता वापरणाऱ्या सामान्य नागरिकांच्या गरजांचा होता. वाई- सुरूर रस्त्याचे रुंदीकरण महाबळेश्वरला जाणाऱ्या खासगी गाड्यांची सोय केंद्रस्थानी ठेवून करण्यात येत होते. वास्तविक पुणे-बंगळूर मार्गाने महाबळेश्वरला जाण्यास चार पर्यायी रस्ते आहेत. सुरूर वरून, जोशी विहीर मार्गे, पाचवड वरून वाई असे हे तीन मार्ग आहेत.
शिवाय मेढा मार्गे केळघर घाटातून थेट महाबळेश्वरला जाणारा मार्ग आहे. मेढा मार्गे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण काही वर्षांपूर्वी झाले आहे. या रस्त्याचा म्हणावा तेवढा वापर होत नाही. जोशी विहीर मार्गे वाईतून महाबळेश्वरला जाणारा रस्ता हा राज्य महामार्ग आहे. त्याचेही रुंदीकरण काही वर्षांपूर्वी झाले आहे.
महाबळेश्वरकडे जायला चार पर्यायी मार्ग आहेत. पण वाई- सुरूर,जोशी विहीर ते वाई. पाचवड ते वाई या रस्त्यांचा वापर फक्त महाबळेश्वरला जाणारे चारचाकी वाले करतात, असे नाही. या रस्त्यांचा वापर करणारे बहुसंख्य लोक स्थानिक असतात. कामासाठी किंवा इतर कारणांसाठी एका गावातून दुसऱ्या गावात दुचाकी वरून, पायी, जाणारे लोक आहेत.
एसटीतून प्रवास करणारे लोक आहेत. आता एसटीची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनातून जाणारे लोक आहेत. रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे, घोंगडी विकणारे, उसाचा रस विकणारे हे सगळे रस्त्याचे वापरकर्ते आहेत. शिवाय शेळ्या- मेंढ्या घेऊन चालणारे पशुपालक आहेत.
पाश्चिमात्य मॉडेलचे अंधानुकरण ः
दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपले रस्ता नियोजनाचे मॉडेल नको तितके पाश्चात्त्य मॉडेलवर आधारित आहे. तिथे रस्त्याचा वापर फक्त खासगी गाडीवाले करतात. सार्वजनिक वाहतूकसुद्धा मर्यादित आहे. पादचारी, उभे आडवे जाणारे दुचाकी स्वार, रस्त्याच्या बाजूला अगदी छोटे धंदे लावणारे व्यावसायिक हे तिथे नसतात.
पादचारी, पशुपालक हे तिथल्या रस्त्याचे वापरकर्ते नसतात. आपल्याकडे तसे नाही. रस्ता शेअर करणारे अनेक ‘स्टेक होल्डर’ आपल्याकडे असतात. पण पाश्चिमात्य मॉडेलचा विचार करून रस्त्याचे नियोजन केले तर मग या सगळ्या इतर वापर कर्त्यांकडे दुर्लक्ष होते.
अशी मॉडेल्स सहसा फसतात. मध्यंतरी शहरामध्ये सायकल ट्रॅक काढायची टूम सुरू झाली होती. ही पण अशीच ‘इंपोर्टेड’ कल्पना. रस्त्यावरील सायकलस्वारांची सुरक्षा महत्त्वाची. परदेशात यासाठी रस्त्याच्या कडेला राखीव लेन असते. बाकी रस्ता गाड्यांसाठी असतो. वाहतूक एकसाची असते.
गाड्या आणि मग राखीव लेन मध्ये सायकली. आपल्याकडे पादचारी, दुचाकी स्वार, धंदेवाले, सगळेच रस्त्याचा, विशेषतः रस्त्याच्या कडेचा उपयोग करतात. शहरात झोपायला, रात्री रिक्षा पार्किंगसाठी वगैरे वापर केला जातो. भाजी, कपडे वगैरेंचे व्यावसायिक रस्त्याचा वापर करतात. हे वेगळे संदर्भ लक्षात न घेता सायकलिंग ट्रॅक बनली की ती वाया जाते. पैसे बुडतात.
आपल्याकडे रस्त्यावरची वाहतूक मोजताना रस्त्यावर सेन्सर लावतात. चाक पास झाले की गाडी मोजली जाते. मग त्या गाडीत एक माणूस असो की पन्नास, प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी असो नगास नग मोजला जातो. पादचारी कोणी मोजतच नाही. पशुपालक, शेळ्या-मेंढ्यांची तर बातच सोडून द्या. त्यामुळे आपल्याकडे रस्ता नक्की वापरतो कोण याची आकडेवारीच नाही. मग नियोजन कसले करणार?
सुरूर- वाई रस्त्याची नेमकी ही परिस्थिती आहे. रस्ता सुधारू नये, असे कोणीच म्हणत नाहीये. पण जी सुधारणा होईल ती सगळ्यांच्या सोयीची अशी व्हावी. हे तापमान वाढीचे युग आहे. गेल्या वर्षीचा उन्हाळा कडक होता, या वर्षीचा त्यापेक्षा अधिक आहे.
रस्त्यावरील तापमान वेधशाळेने जाहीर केलेल्या तापमाना पेक्षा ५ ते १० अंश जास्त असते. कारण रस्ता तापतो. वाहने उष्णता सोडतात. १५ एप्रिलला आम्ही तापमापक घेऊन रस्त्यावरचे तापमान मोजले. सकाळी ११.३० वाजता रस्त्यावर तापमान ४८ अंश भरले. ऊन वाढले की ते ५० अंश सुद्धा जाऊ शकते.
त्यामुळे सामान्य वापरकर्ता, जसे की दुचाकी स्वार, पादचारी, सार्वजनिक वाहनातून प्रवास करणारे लोक, त्यांना रस्त्याच्या रुंदीइतकीच रस्त्यावरची सावली महत्त्वाची आहे. उष्णता हा आता खूप मोठा प्रश्न आहे. शहरे, रस्ते हे उष्णतेची बेटे होत आहेत. उष्णतेने लोक मरतात, आजारी पडतात. पण त्याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. मृत्यूची नोंद करताना हृदय विकाराचा झटका, श्वास घ्यायला अडचण वगैरे कारणे नोंदली जातात.
पण मूळ कारण उष्मा असते. उष्णतेची लाट असताना झालेले मृत्यू आणि लाट नसताना त्याच महिन्यात साधारणपणे होणारे मृत्यू यातील फरक हा उष्णतेने झालेले मृत्यू असे मानले तर भारतात उष्णतेने वर्षाला दीड लाख लोक मरण पावतात, असे दिसते. आजारी पडणारे पण त्यातून जीव वाचलेले तर अगणित. यातील बहुतेक सगळे गरीब. उन्हात काम केल्याशिवाय पोट न भरणारे. किंवा पत्र्याच्या कोंदट झोपडपट्टीतील राहणारे. त्यांच्या मृत्यूचे रेकॉर्ड नसते. फार आकडेवारी गोळा होत नाही. पण आकडेवारीत नाही म्हणून वास्तव बदलत नाही.
म्हणून सुरूर- वाई रस्ता रुंदीकरणाविरुद्ध स्थानिक आंदोलन हे फक्त झाडे वाचविण्यासाठी नव्हते. म्हणून झाडे काढून दुसरीकडे लावणे मान्य नव्हते. हे आंदोलन रस्त्याचे नियोजन लोकाभिमुख असावे या मागणीसाठी होते. या न्याय्य मागणीसाठी लोक एकत्र आले आणि त्यांच्या लढ्याला यश आले हे आश्वासक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.