गंगा बाकले
Conservation of Trees : गोष्ट थोडीशी जुनीच आहे, १९९५ सालची. मी आमच्या गावच्या-कासारखेड्याच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होते. त्या वेळी चौथीला नवोदय व स्कॉलरशिप परीक्षा असायची. मी अभ्यासात थोडीशी बरी असल्यामुळे आमच्या बाईंनी मला स्कॉलरशिप परीक्षेला बसायला सांगितले. बाई रोज दुपारच्या सत्रात स्कॉलरशिपचा मराठीचा तास घ्यायच्या. एक दिवस विषय-घटक होता जोडशब्द. बाईंनी आम्हाला जोडशब्द म्हणजे काय? ते कसे ओळखायचे? ते कसे लिहायचे? याविषयी माहिती सांगितली. जोडशब्द म्हणजे नेहमी जोडून सोबत येणारे शब्द. त्यांनी आम्हाला जोडशब्दांची काही उदाहरणे सांगितली. थोडावेळ त्यांचा सराव केला व त्यानंतर बाईंनी आम्हाला जोडशब्दांची आणखी उदाहरणे सांगण्यासाठी विचारले.
अनेक मुले जोडशब्दांची उदाहरणे सांगू लागली. त्यामध्ये कोणी सांगितले की, केरकचरा; कोणी सांगितले की, घरदार. त्यानंतर मीही हात वर केला व बाईंनी मला उठवले. मी सांगितलेला जोडशब्द होता, बहीणभाऊ. हा शब्द जोडशब्द आहे का नाही? हे मला माहीत नव्हते. पण अचानक तो माझ्या मनात आला आणि मी सांगितला. बाई थोडावेळ माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या. सर्व वर्ग शांत होता. मला वाटले माझे उत्तर चुकले. मी खाली मान घालून उभी राहिले. बाईंनी मग स्मितहास्य केले व माझ्याजवळ येऊन माझ्याशी बोलू लागल्या. तो शब्द अचानक माझ्या मनात कसा आला? याचाच मी विचार करत होते. त्यानंतर माझ्या मनात या शब्दाविषयी अनेक विचार घोळू लागले. रक्ताच्या नात्याचा विचार केला, तर बहीणभावाचं नातं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. आपण जगाच्या पाठीवर कोठेही असलो तरी आपल्या मागे असणारा आधाराचा खंबीर हात म्हणजे आपला भाऊ.
लहानपणी सर्वच भावाबहिणींमध्ये छोटी-मोठी भांडणे होत असतात. या लटुपुटुच्या भांडणातूनच त्यांच्यातील प्रेम वाढत जाते. भाऊ कितीही गरीब असला किंवा श्रीमंत असला तरी त्याचे बहिणीवरचे प्रेम मात्र सारखेच राहते. भाऊ आपल्यापेक्षा लहान जरी असला, तरी अनेक प्रसंगी तो आपल्यापेक्षा मोठा होऊन आपले रक्षण करतो. माझ्या मैत्रिणीचे जेव्हा लग्न जमले होते, तेव्हा तिचा भाऊ तिच्यापेक्षा लहान असताना सुद्धा वडिलांप्रमाणे मोठा होऊन सर्व जबाबदारीची कामे करत होता. म्हणजेच गरज पडली तेव्हा लहान किंवा मोठा होऊन आपला भाऊ सदैव
आपल्या मदतीला धावून येतो. या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजते. मला तीन भाऊ आहेत. माझे भाऊ माझ्यापेक्षा मोठे आहेत. पण कधीच ते स्वतःला माझ्यापेक्षा मोठे समजत नाहीत, उलट मलाच एकुलती एक बहीण म्हणून माझे सर्व हट्ट पूर्ण करतात. ‘एकुलती एक लाडाची लेक’, असे म्हणून चिडवतात सुद्धा! प्रत्येक मामाला आपल्या बहिणीची मुले म्हणजेच भाचा, भाची आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रिय वाटतो.
बदलत्या काळानुसार या नात्यातही अनेक बदल झालेले दिसून येत आहेत. अनेक नवनवीन कायदे निर्माण झाले आहेत. पण मला वाटते, हे बहीणभावाचे नाते या सर्व कायद्याच्या पलीकडचे आहे. कोणत्याही प्रकारच्या कायद्याने हे नाते तोडता येत नाही व जोडताही येत नाही. हे नाते अखंड आणि अभंग आहे. तुम्हाला माहीतच आहे, की मी एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. ‘रक्षाबंधनाच्या’ निमित्ताने मी आमच्या शाळेतील मुलांना मार्गदर्शन करत राहते. अनेक वर्षांपासून आम्ही या दिवशी झाडाला राख्या बांधून ‘रक्षाबंधन’ सण साजरा करत आहोत. भाऊ ज्या प्रमाणे आपणाला साथ देतो त्याचप्रमाणे दुसरा भाऊ म्हणजे वृक्ष आहे. तो सदैव आपणाला साथ देतो. ऊन-पाऊस यापासून आपले रक्षण करतो. आपण त्याला जरी इजा पोहोचवली किंवा तोडायचा प्रयत्न केला, तरी तो बदल्यामध्ये आपणाला फक्त प्रेम देतो. असा निःस्वार्थी प्रेम करणारा आपला एक भाऊ म्हणजेच वृक्ष होय.
वृक्ष सर्वार्थाने सर्वकाही मानवाला देतो. थोड्याच दिवसांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली होती, की परभणी जिल्ह्यातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांना रिसर्च ॲण्ड रिसर्च सेंटर, दिल्लीच्या वतीने ‘सेवागौरव पुरस्कार-२०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल म्हणजेच, झाडे लावून त्यांचे गाव रामपुरी (ता. मानवत, जि. परभणी) हिरवेगार केल्यामुळे म्हणजेच, ग्रीन ग्राम ही संकल्पना राबवली म्हणून देण्यात आला आहे. त्यांनी मांडलेला विचार खूप महत्त्वाचा वाटला. ते म्हणाले, की प्रत्येकाने कमीत कमी तीन झाडे लावावीत. एक आपणाला ऑक्सिजन देण्यासाठी, दुसरे झाड सावली-फळे देण्यासाठी आणि तिसरे झाड आपल्या सरणासाठी आपणच लावले पाहिजे. हा विचार ऐकून माझ्या मनात असा विचार आला की आपला रक्ताचा भाऊ हा आपण जिवंत असेपर्यंतच आपली साथ देतो, पण वृक्ष आपण मेल्यानंतरही आपणाला जाण्यासाठी आपली साथ देतात.
या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपणही जास्तीत जास्त वृक्ष लावून व संवर्धन करून हा सण साजरा केला, तर रक्ताचे नाते जपत असतानाच एक निसर्गाचं नातंही आपल्याकडून जपलं जाईल. सध्या श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात अनेक प्रकारचे सणवार येत असतात. अनेक सणाला झाडाची पाने, फुले, फळे तोडून ते देवाला वाहून व बाया उपवास धरून तो सण साजरा करतात. काही बाया दररोज महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतात. पण बेलफळाची कॅंडी चविष्ट आणि पोषक असते. प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाव आहे. पण फक्त बेलाची पाने वाहूनच नाही, तर बेलाची झाडे लावूनही आपण देवाची भक्ती करू शकतो. बेल ही एक चांगली औषधी वनस्पती आहे. याची झाडे जास्तीत जास्त प्रमाणात लावली तर ते आरोग्यदायी ठरेल. आपले कोळी बांधवसुद्धा या दिवशी नारळी पौर्णिमा साजरी करतात. ज्या समुद्रावर त्यांचे जीवन अवलंबून असते; त्याला भाऊ म्हणून नारळ अर्पण करतात. अशा अनेक वेगवेगळ्या परंपरा आपणाला या संबंधी दिसून येतात. या रक्षाबंधनाच्या दिवशी फक्त भावालाच नाही तर झाडालाही राखी बांधून त्या वृक्षांचे जतन करण्याचे वचन आपणाला द्यायचे आहे.
बदलत्या काळानुसार बहिणीसुद्धा आता पूर्णपणे सक्षम झाल्या आहेत. त्या स्वतःचे रक्षण सुद्धा करू शकतात व वृक्षांना सुद्धा जपून संरक्षण देऊ शकतात. या निमित्ताने मी सर्व माझ्या भगिनींना विनंती करू इच्छिते, की आपणही याप्रमाणे वेगळा विचार करूयात व बदलत्या काळानुसार निर्णय घेऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी छोटासा का होईना प्रयत्न नक्कीच करूयात.
(लेखिका प्राथमिक पदवीधर शिक्षिका आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.