Bogus Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Crop Insurance : सव्वा तीन लाख बोगस विमा प्रस्ताव रद्द

Cancelled Insurance Proposals : पंतप्रधान पीकविमा योजनेतील घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत. त्यामुळे भरपाई लाटण्यासाठी आलेले सव्वातीन लाख संशयास्पद प्रस्ताव थेट रद्द करण्यात आले आहेत.

मनोज कापडे

Pune News : पंतप्रधान पीकविमा योजनेतील घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत. त्यामुळे भरपाई लाटण्यासाठी आलेले सव्वातीन लाख संशयास्पद प्रस्ताव थेट रद्द करण्यात आले आहेत.

सार्वजनिक सुविधा केंद्रांतून (सीएससी) बनावट माहितीच्या आधारे मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जात आहेत. त्यामुळे कृषी विभागाने निवडक जिल्ह्यांमध्ये तपासणीची प्रक्रिया आणखी व्यापक केली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, २०२४-२५ मधील पीक वर्षात विम्यासाठी एकूण दोन कोटी ११ लाख अर्ज आले होते.

आतापर्यंत त्यातील तीन लाख ३२ हजार बोगस प्रस्ताव शोधण्यात यश मिळाले आहे. शासनाने सर्व संशयास्पद प्रस्ताव रद्द केले आहेत. सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना २०१८ पासून लागू झाली होती. तेव्हापासूनच दरवर्षी संशयास्पद प्रस्ताव आढळून येत होते. परंतु अशा प्रस्तावांची संख्या ३० हजार ते ५० हजारांच्या दरम्यान होती. एक रुपयात पीकविमा मिळण्याची सुविधा मिळताच २०२३-२४ पासून संशयास्पद प्रस्तावांमध्ये एकदम पाच-सहा पटीने वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीपासून एक रुपयात विमा सवलत मिळताच दोन कोटी ४२ लाख प्रस्ताव दाखल झाले होते. त्यात तीन लाख ८० हजार प्रस्ताव बोगस असल्याचे लक्षात येताच कृषी विभाग हादरून गेला. बोगस प्रस्ताव तयार करणारे जाळे राज्यभर तयार झाल्याचे यातून निदर्शनास आले.

शेतकऱ्यांच्या नावे अनेक सीएससी चालक परस्पर प्रस्ताव तयार करून विमा योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे प्रकार राज्याच्या अनेक भागांत होत आहेत. एक प्रस्ताव अपलोड केल्यानंतर सीएससी चालकाला ४० रुपये शुल्क मिळते. त्यामुळे शेतकऱ्याच्या नावे परस्पर एक रुपया भरून प्रस्ताव अपलोड करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

शेतकऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर विमा प्रस्ताव अपलोड होत असल्याची बाब राज्य शासनाने केंद्राच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळेच रब्बी २०२४ मधील हंगामात विमा प्रस्ताव अपलोड करताना ‘ओटीपी’ (वन टाइम पासवर्ड) प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याच्या भ्रमणध्वनीवर ओटीपी जात आहेत.

यामुळे शेतकरी सावध होऊ लागले आहेत. केंद्र शासनाने ओटीपी पद्धत सक्तीची केल्यामुळे सीएससी चालकांची कोंडी झाली आहे. परिणामी, यंदा रब्बी हंगामात विमा अर्ज अपलोड होण्याची संख्या तब्बल १६ लाखांनी घटली आहे. गेल्या हंगामात ७१ लाख अर्ज अपलोड झाले होते; तर चालू रब्बी हंगामात ओटीपी पद्धतीमुळे केवळ ५५ लाख अर्ज अपलोड झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

शासकीय जमिनींचाही विमा काढण्याचे प्रकार

विमा भरपाई लाटण्यासाठी शेतकऱ्यांना पुढे करीत वेगवेगळ्या युक्त्या वापरून अर्ज दाखल केले जात आहेत. मृत शेतकरी किंवा परगावच्या शेतकऱ्यांच्या नावे सर्रास विमा काढला जातो. शासकीय व एमआयडीसीच्या जमिनीवर तसेच बिगरशेती (एनए) भूखंडावर पीक असल्याचे भासवून विमा उतरवण्याचे प्रकार वाढले आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT