Latest Agriculture News : गिरणा धरण सलग चार वर्षे १०० टक्के भरल्यानंतर यंदा धरणात ५६.७३ टक्केच साठा आहे. त्यामुळे धरणाची सद्यःस्थिती पाहता, रब्बी हंगामाला पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी चार आवर्तने, तर पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी एक आवर्तन सुटण्याची शक्यता आहे.
गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन केव्हा सुटेल याकडे गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. यंदा मात्र गिरणेत पुरेसा पाणीसाठा नसल्याने रब्बी हंगामासाठी पाणी सुटण्याची शक्यता फार कमी आहे. गिरणा धरण सलग चार वर्षे शंभर टक्के भरल्याने धरणातून रब्बी हंगामासाठी कालव्याव्दारे चार वर्षे पाणी सोडण्यात आले.
त्यामुळे गिरणा पट्ट्यात चार वर्षे रब्बीत सर्वत्र हिरवाईचे वातावरण पहायला मिळत होते. यंदा धरणात आतापर्यंत ५६.७३ टक्के एवढाच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बीसाठी पाणी सुटण्याची फार काही शक्यता नाही.
गिरणा धरणावर एकूण ६९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यात जळगाव जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. पाटचाऱ्यांची दुरवस्था पाहता, साधारणत: २५ हजार हेक्टर क्षेत्रापर्यंतच पाणी पोहचते.
पिण्यासाठी चार आवर्तने
यंदा शेतीसाठी पाणी सुटण्याची शक्यता नाही. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी चार आवर्तने सुटू शकतात. पहिले आवर्तन नोव्हेंबरमध्ये सुटण्याची शक्यता असून त्यानंतर दर दोन महिन्यांनी आवर्तन सुटू शकतात.
गिरणेवर निम्म्या जळगाव जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा शहरासह १५६ गावांच्या पाणीपुरवठा योजनांना गिरणा नदीचा आधार आहे. लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यात आवर्तनाबाबत निर्णय होणार आहे.
पूर्व हंगामासाठी एक आवर्तन हवे
यंदा खरीप हंगाम चांगला बहरला होता. मात्र, पावसाच्या अवकृपेमुळे खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; तर कपाशीवरही ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात ५० टक्के घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
त्यामुळे पूर्व हंगाम कापूस लागवडीसाठी गिरणा धरणातून साधारणतः मेमध्ये किमान एक आवर्तन मिळायला हवे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच पूर्व हंगामी कपाशी लागवडीसाठी गिरणा पाटबंधारे विभागाने एक आवर्तनाचे नियोजन करावे, अशी अपेक्षा आहे.
गिरणा धरणात कमी पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य असेल. धरणातून आवर्तने सोडण्याबाबत कालवा सल्लागार समितीत निर्णय घेतला जाईल.- देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.