Pune News : पावसाळ्यात पुणे, नाशिक विभाग आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. भूजल पातळी फार वाढलेली नसल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शासनामार्फत ऑक्टोबरमध्ये राज्यातील ३१४ गावे व ९९२ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठ्यासाठी ३२४ टॅंकर धावत आहेत. गेल्या पाच ते दहा वर्षांत पहिल्यांदाच इतक्या संख्येने टॅंकर सुरू आहेत. त्यामुळे येत्या काळात पाण्याची मोठी टंचाई भासण्याचे संकेत आहेत.
कृषी विभागाच्या सूत्रांनुसार, नाशिक, नंदुरबार, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, अकोला, अमरावती जिल्ह्यांत ८० टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तेथील विहिरींच्या आणि बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यात आता ऑक्टोबर हिटमुळे जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे.
चालू वर्षी राज्यात २१ जानेवारीच्या दरम्यान पाणी टंचाईस सुरवात झाली होती. जूनमध्ये ही संख्या जवळपास ४८४ टॅंकरपर्यंत पोहचली होती. त्यानंतर पाऊस झाल्यानंतर टॅंकरच्या संख्येत घट झाली. परंतु ऑगस्ट संपूर्ण आणि अर्धा सप्टेंबर पावसाचा खंड राहिला. या काळात टॅंकरची संख्या पुन्हा ४९४ पर्यंत पोहचली होती.
सप्टेंबरअखेरीस काही जिल्ह्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे टॅंकरच्या संख्येत १२८ ने घट झाली. गेल्या आठवड्यापर्यंत राज्यातील ३२२ गावे व १ हजार ५३ वाड्या-वस्त्यांवर ३६६ टॅंकरनी पाणीपुरवठा सुरू होता.
चालू आठवड्यात त्यात आणखी घट झाली आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांत टॅंकर सुरू आहेत. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ८७ टॅंकर, पुणे विभागात सातारा जिल्ह्यात ८६, सांगलीत ३५, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५९, तर जालना जिल्ह्यात २८ टॅंकरनी पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्हानिहाय सुरू टॅंकरची संख्या
जिल्हा---गावे ---वाड्या-वस्त्या---टँकरची संख्या
नाशिक---९८---१४१---८७
धुळे---१---०---१
जळगाव---११---०---११
पुणे---१०---६१---११
सातारा---७९---३५७---८६
सांगली---३०---२९१---३५
सोलापूर---१४---१२७---६
छत्रपती संभाजीनगर---५५---२---५९
जालना---१६---१३---२८
एकूण---३१४---९९२---३२४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.