डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील
Fodder Crop : आपल्या जनावरांना कमीत कमी दोन ते तीन प्रकारचा चारा मिळेल अशी व्यवस्था करावी. द्विदल चाऱ्याचा पुरवठा केल्यामुळे पशुखाद्याचे आहारातील प्रमाण कमी करता येते. पशुपालन उत्पादन खर्च कमी होऊन पशुपालन व्यवसाय किफायतशीर होण्यास मदत होते.
सद्यःस्थितीत बरेचशे पशुपालक शेतातील दुय्यम पदार्थ किंवा जे काही उपलब्ध आहे त्याचा चारा म्हणून जनावरांच्या आहारात वापर करतात. असा चारा एकतर निकृष्ट असू शकतो, त्यास चव कमी असू शकते, किंवा त्याची पचनीयता कमी असू शकते. यामुळे जनावरांना त्याच्या वजनांनुसार शारीरिक अवस्थेनुसार, उत्पादनानुसार आवश्यक सर्व पोषणमूल्यांचा त्यातून पुरवठा होत नाही. अशी जनावरे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन आजारी पडतात, अशक्त होतात, प्लॅस्टिक किंवा इतर अखाद्य वस्तू खातात, कमतरतेचे आजार उद्भवतात, उत्पादनात घट होते, लोकर, मांस, दूध यांची प्रत कमी होते, माजावर वेळेवर येत नाहीत. गर्भधारणा होत नाही, उपचारावर जास्त खर्च होऊन पशुपालन व्यवसाय तोट्यात जातो किंवा हवा तेवढा नफा मिळत नाही.
१) दैनंदिन आहारात कडबा, सोयाबीन गुळी/भुसकट किंवा वाळलेल्या गवत किंवा ऊस वाड्याचा वापर करतात. हिरव्या चाऱ्याचा वापर कमी प्रमाणात करतात किंवा काही शेतकरी तर केवळ वाळलेल्या चाऱ्यावर पशू संगोपन करतात. काही शेतकरी हिरव्या चाऱ्यामध्ये हायब्रीड नेपिअरवर्गीय चाऱ्याचा जास्त वापर करतात. द्विदल चाऱ्याचा पशू आहारात वापर करीतच नाहीत. यामुळे जनावरांच्या शरीरातील पोषणमूल्यांचे असंतुलन होते, यामुळे विविध समस्या दिसून येतात.
२) जनावरांसाठी केवळ हायब्रीड नेपिअर चारा उत्पादन न करता त्यासोबत ज्वारी, मका यांसारख्या सकस चारापिकांचे उत्पादन घ्यावे. जेणेकरून हायब्रीड नेपिअर चाऱ्यासोबत या चाऱ्याचे पशुआहारात वापर झाल्यास उत्पादन वाढ, योग्य शरीरपोषण होण्यास मदत होईल.
३) केवळ एकदलीय चारा उत्पादन करून चालणार नाही. पशुआहारात द्विदल चाऱ्याचा वापर करण्यासाठी मेथीघास, बरसीम, दशरथ, शेवरी यांसारख्या द्विदल चाऱ्याचे उत्पादन घेणेही आवश्यक आहे. पशुआहारात द्विदल चाऱ्याचा वापर न केल्यास पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे लागते. द्विदल चाऱ्याचा पुरवठा केल्यामुळे पशुखाद्याचे आहारातील प्रमाण कमी करता येते. पशुपालन उत्पादन खर्च कमी होऊन पशुपालन व्यवसाय किफायतशीर होण्यास मदत होते.
४) चारा उत्पादन घेताना केवळ लागवड करून चालणार नाही तर चाऱ्याचे जास्त उत्पादन मिळवण्यासाठी वार्षिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यामध्ये वेळेवर आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन आणि वेळेवर कापणी या बाबी महत्त्वाच्या आहेत.
५) आपल्या जनावरांना कमीत कमी दोन ते तीन प्रकारचा चारा मिळेल अशी व्यवस्था करावी. काही पशुपालक दिवसभर आपल्या जनावरांना बांधावरील गवत किंवा रस्त्याकडेला चारत राहतात, अशा चाऱ्यातून जनावरांना किती प्रमाणात पोषणमूल्य मिळतात हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. जनावरांच्या आहाराकडे जेवढे दुर्लक्ष तेवढ्या पशुपालनातील समस्या जास्त दिसतात. समस्या जास्त तिथे खर्चही जास्त व उत्पादन कमी अशी परिस्थिती होते. अशावेळी पशुपालन व्यवसाय किफायतशीर होण्याची शक्यता कमी असते.
६) पोषक चारा उत्पादन केल्यामुळे बऱ्याच अंशी पशुधनाची पोषणमूल्यांची गरज ही चाऱ्यामधून पूर्ण होईल, काही प्रमाणात पशुखाद्य देऊन आहारावरील खर्च कमी करता येईल. नगदी पिकांची लागवड वाढल्याने चारा पिकांच्या लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. चारा उत्पादनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पशुखाद्य जास्त प्रमाणात द्यावे लागते, त्यामुळे खर्च वाढतो. पशुपालन किफायतशीर करायचा असेल, तर पोषक चारा उत्पादनाशिवाय पर्याय नाही. उत्पादित चारा हा कमी खर्चात तयार होऊन कमी खर्चात जनावरांना पोषणमूल्यांचा पुरवठा होतो.
चारा पिकांचे नियोजन ः
खरीप हंगाम ः हायब्रीड नेपिअर, चवळी, ज्वारी, मका, स्टायलो, दशरथ, इत्यादी
रब्बी हंगाम ः मेथी घास, ओट, बरसीम, इत्यादी
उन्हाळा ः बाजरी, मल्टिकट ज्वारी, चवळी इत्यादी
पोषक चारा उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी :
- जास्त उत्पादनशील, पोषक चारा पिकांची लागवड करावी.
- कमीत कमी दोन एकदल व एक द्विदल चाऱ्याची लागवड करावी.
- चारा लागवडीसाठी चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची निवड करावी.
- आवश्यक असल्यास योग्य ती बीज प्रक्रिया करावी.
- चांगल्या प्रकारे शेत जमीन तयार करून घ्यावी.
- पिकांच्या आवश्यकतेनुसार खत मात्रा घ्यावी.
- चाऱ्याच्या प्रकारानुसार योग्य वेळी व योग्य हंगामामध्ये निवडक चारा पिकांची लागवड करावी.
- आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन आणि वेळेवर कापणीकडे लक्ष द्यावे.
- जमिनीच्या प्रतीनुसार सेंद्रिय/रासायनिक खत मात्रा द्याव्यात.
- चारा प्रकारानुसार कापणीचे योग्य तंत्र अवलंबावे.
- पाणी व्यवस्थापनाची सुविधा लक्षात घेऊन चारापिके लागवड करावी.
संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.