Muskmelon Cultivation
Muskmelon Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Muskmelon Cultivation : खरबुजाची बारमाही शेती साधली उल्लेखनीय प्रगती

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

संदीप नवले

Farmer Success Story : पुणे जिल्ह्यात बोरीबेल (ता. दौंड) येथील बाळकृष्ण व दीपक या पाचपुते बंधूंनी वीस वर्षांपासून खरबूज शेतीत सातत्य ठेवून त्यात कौशल्य संपादन केले आहे. बाजारातील मागणीचा अभ्यास करून वर्षातील विविध हंगामांत बारमाही पद्धतीचे लागवडीचे नियोजन त्यांनी यशस्वी केले आहे. पुण्यासह दिल्लीपर्यंत खरबूज पाठवून या पिकासह अन्य फळांच्या जोडीने शेतीचे अर्थकारण भक्कम केले आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात बोरीबेल गाव आहे. येथील बाळकृष्ण आणि दीपक या पाचपुते
बंधूंची एकत्रित २० एकर शेती आहे. नऊ सदस्यांचे त्यांचे संयुक्त कुटुंब आहे. पूर्वी त्यांची पारंपरिक पीकपद्धती होती. खडकवासला धरणाचा ‘कॅनॉल’ शेताजवळून गेल्याने त्यांना बऱ्यापैकी पाण्याची सुविधा उपलब्ध झाली. मग व्यावसायिक शेती पद्धतीची कास त्यांनी धरली. आपल्या जमिनीची प्रत, पुण्यातील मार्केटला वर्षभर मागणी असलेली फळपिके व त्यांचे अर्थकारण या सर्वांचा अभ्यास त्यांनी केला. त्यानंतर खरबूज पिकाची निवड केली. बाजारपेठेत खरबुजाला वर्षभरात कोणकोणत्या काळात मागणी असते ते पाहिले. त्यानुसार वर्षभरातील लागवडीचे हंगाम त्यांनी निश्‍चित केले. सुधारित तंत्रज्ञानावर भर दिला. या पिकात सुमारे २० वर्षांचा गाढा अनुभव निर्माण करून त्यात कौशल्य संपादन केले आहे.

खरबूज शेतात बारमाही

जानेवारी- फेब्रुवारी हा लागवडीचा मुख्य हंगाम असतोच. शिवाय ऊस तुटून गेल्यानंतर एप्रिलमध्येही
लागवडीचे नियोजन असते. पाचपुते यांच्या शेतीचा काही भाग डोंगरउतारा नजीक आहे. येथे डिसेंबरमध्ये तुलनेने थंडी कमी राहते. हा फायदा घेऊन या महिन्यातही लागवडीचे नियोजन असते.
शिवाय नोव्हेंबरच्या दरम्यान खरबूज मार्केटला येईल या पद्धतीनेही लागवडीचा खरिपातील महिना निवडला जातो. या प्रमाणे वर्षातील चार ते पाच वेळा प्रत्येकी दोन ते तीन एकरांत लागवड होत असल्याने बारमाही खरबूज शेतात असते.


जातींची निवड

पाचपुते दोन जातींची लागवड करतात. यातील एकाची पुणे मार्केटला असलेली मागणी पाहून निवड होते. आतून केशरी रंग, फळ रसाळ, चवीला गोड, जास्त गर अशी ही जात आहे. मात्र टिकाऊपणा कमी आहे. तर दिल्ली मार्केटसाठी दुसरी जात निवडली आहे. टिकाऊपणा जास्त, आतून पांढरा रंग, चवीला जास्त गोड, गरही जास्त, मागणी चांगली अशी ही जात आहे.
दोन गादीवाफ्यांत (बेड) आठ फूट अंतर व दोन रोपांत सुमार दीड फूट अंतर
लागवडीसाठी ठेवले जाते. झिगझॅग पद्धतीचा वापर होतो. एकरी सुमारे सात हजार रोपे असतात. काही वेळा नर्सरीतून ती आणली जातात. काही वेळा रोपे घरीही तयार केली जातात.

सेंद्रिय पद्धतीवर भर

खरबुजाच्या उत्पादनासाठी शेणखत, कोंबडीखताच्या वापरावर अधिक भर असतो.
घरच्या १० गीर गायी आहेत. शेतीसाठीच त्यांचे मुख्यतः संगोपन केले आहे. गोबरगॅसचे युनिट
आहे. वीस हजार लिटरच्या टाकीत स्लरी संकलित केली जाते. त्यावर प्रक्रिया करून त्याचा शेतीत वापर केला जातो. या शिवाय दशपर्णी
अर्क, गांडूळ खत, व्हर्मिवॉश, भूसुधारक स्लरी, जिवामृत व वेस्ट डी कंपोजर आदींचाही वापर होतो. पीक फुलोऱ्यात आल्यानंतर मधपेट्या शेतात ठेवण्याचाही
प्रयोग केला आहे.

‘क्रॉप कव्हर’चा वापर

लागवडीनंतर सात- आठ दिवसांनी रोपांवर ‘क्रॉप कव्हर’ अंथरले जाते. त्यामुळे त्यांची वाढ चांगली होऊन किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. उत्पादन वाढण्यास मोठी मदत होते. एकरी सुमारे चार बंडल्स
लागतात. प्रति बंडल ४०० मीटरचे असते. असे एकूण १६०० मीटर ‘क्रॉप कव्हर’ एकरी लागते.
ते सुमारे १६ ते २२ दिवस ठेवले जाते. तणाचा त्रास कमी होतो. पाचपुते यांना ‘आत्मा’ प्रकल्पाचे
महेश रूपनवर यांचे मार्गदर्शन लाभते.

उत्पादन व विक्री

पाचपुते सांगतात, की उन्हाळ्यात सुमारे ६५ दिवसांत पीक काढणीस येते. थंडीत हा कालावधी
८० दिवसांपर्यंत जातो. एकरी सरासरी १० टनांपासून ते १५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. काही वेळा
त्यापुढेही उत्पादन घेतले आहे. काढणी केल्यानंतर बॉक्समध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी खरबूज रवाना केले जाते. वर्षभराचा विचार केल्यास किलोला १८ ते २० रुपये दर मिळतो. उन्हाळ्यात तो थोडा जास्त व रमजान काळात तो त्याहून अधिक असल्याचे पाचपुते म्हणाले.

शेतीमुळेच आर्थिक प्रगती झाली

पाचपुते बंधू पूर्णवेळ शेतीत राबतात. खरबुजाव्यतिरिक्त अलीकडील वर्षांत केळी, पपई, उन्हाळी कांदादेखील घेण्यात येतो. शेतीतील उत्पन्नातूनच कुटुंबाने घरचा सारा आर्थिक डोलारा सांभाळला आहे. पूर्वी सात एकर शेती होती. टप्प्याटप्प्याने विकत घेत आता ती २० एकर झाली आहे. ट्रॅक्टर, दोन फोर व्हीलर्स, एक टू व्हीलर आहे. पाइपलाइन, विहीर घेतली आहे. दोन्ही भावांच्या दोघा मुलांना शिक्षणासाठी पाचगणी येथे ठेवले आहे.



ज्याप्रमाणे नोकरीत आठ तास राबून काम केले जाते. त्याच पद्धतीने शेतीतही रोजच्या रोज राबले
तर यश नक्की मिळते. दिवसभर राबून शेतकरी थकून जातो. त्याला पुढील आर्थिक नियोजन करणे, त्यासाठी विचार करणे, स्वतंत्र वेळ देणे अनेक वेळा शक्य होत नाही. परंतु त्यातूनही वेळेचे नियोजन करून त्याने प्रभावी अर्थनियोजन जरूर करावे. कष्टाला त्याची जोड आवश्‍यक आहे.

बाळकृष्ण पाचपुते, ९९२२२८९२३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT