Fruit Farming : फळबागकेंद्रित शेतीतून उल्लेखनीय प्रगती

Fruit Production : परभणी जिल्ह्यातील ऊस पट्टा असलेल्या कासापुरी (ता. पाथरी) येथील सुदाम व मदन या कोल्हे बंधूंनी उसापेक्षा फळबागकेंद्रित पीकपद्धती निवडली. एकत्रित कुटुंबाचा एकोपा व शेतीतील सहभाग, शेतीत पूर्णवेळ झोकून देणे आणि सातत्य ठेवणे यातून त्यांनी शेतीत व कौटुंबिक उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
Fruit Farming
Fruit FarmingAgrowon

माणिक रासवे

Crop Pattern : परभणी जिल्ह्यातील ऊस पट्टा असलेल्या कासापुरी (ता. पाथरी) येथील सुदाम व मदन या कोल्हे बंधूंनी उसापेक्षा फळबागकेंद्रित पीकपद्धती निवडली. एकत्रित कुटुंबाचा एकोपा व शेतीतील सहभाग, शेतीत पूर्णवेळ झोकून देणे आणि सातत्य ठेवणे यातून त्यांनी शेतीत व कौटुंबिक उल्लेखनीय प्रगती साधली आहे.

परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील गोदावरी काठच्या गावांना पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या क्षेत्राचा लाभ झाला आहे. प्रमुख ऊस पट्टा म्हणून या भागाची ओळख आहे. तालुक्यातील कासापुरी गावशिवारात काळी कसदार, मध्यम, हलक्या प्रकारची जमीन आहे. पाण्याची मुबलकता असल्याने ऊस, केळी ही प्रमुख नगदी पिके आहेत. गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधाऱ्याचाही काही प्रमाणात फायदा होतो.

फळबाग शेतीचे कोल्हे यांचे नियोजन

कासापुरीतील सुदाम व मदन या कोल्हे बंधूंचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांची वडिलोपार्जित अडीच एकर हलकी ते मध्यम प्रकारची जमीन होती. ऊसपट्ट्यात त्यांनी फळपिकांद्वारे शेतीत बदल साधला आहे.
पपई हे त्यांचे मुख्य पीक असून, सुमारे सात वर्षांपासून त्यात सातत्य आहे. पूर्वी हंगामी सिंचन असल्याने खरिपात बाजरी, कापूस तर रब्बीत गहू असे. बोअर घेतल्यानंतर पाण्याची उपलब्धता वाढली. त्यानंतर केळी पीक घेण्यास सुरुवात झाली. सन २००५ च्या दरम्यान अर्धापुरी जातीची लागवड असे.
आता ग्रॅंड नैन वाण असते. एकरी ३० ते ३५ टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे. कोरोना काळात
दरांचा मोठा फटका व नुकसान झाल्यानंतर हे पीक तात्पुरते थांबवले. पुढील वर्षापासून ते पुन्हा घेण्याचा विचार आहे.

Fruit Farming
Pomogranate, Grape Farming : फळबाग केंद्रित नियोजित शेतीतून उल्लेखनीय प्रगती

पपईची फायदेशीर शेती

पपईची शेती सुरू केली त्यावेळी तैवान ७८६ वाण असे. मात्र विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने १५ क्रमांक व ग्रीन बेरी वाणांची लागवड सुरू केली. मध्य प्रदेशातील इंदूर येथील रोपवाटिकेतून रोपांची खरेदी होते. दोन्ही वाणांना विषाणूजन्य रोगाची समस्या कमी आहे. एकरी ५० ते कमाल ६० टनांपर्यंत उत्पादन मिळते. अलीकडील काळात दर किलोला १८ पासून ३० रुपयांपर्यंत मिळत आहेत.

यंदा मार्च मध्ये सहा रुपये दर मिळाला. सध्या २५ रुपये दर मिळत आहे. हे पीक सात वर्षांपासून टिकवल्याच्या कारणांबद्दल सुदाम सांगतात, की हार्वेस्टिंग सुरू झाले की पुढे काही महिने ठरावीक दिवसांच्या अंतराने उत्पादन घेत राहता येते. म्हणजेच खेळत्या भांडवलाची गरज हे पीक पूर्ण करू शकते असा माझा अनुभव आहे. वर्षाला एक लाख उत्पादन खर्च वजा जाता काही लाख रुपयांचे उत्पन्न हे पीक देते. नागपूर, अकोला, अमरावती भागांतील व्यापारी जागेवर येऊन माल घेऊन जातात. गरजेनुसार स्वतःही मार्केट करतो असे सुदाम सांगतात.

पपई कलिंगड

कोल्हे पपईची लागवड मार्चच्या पंधरवड्यात करतात. त्याच दरम्यान बागेत आंतरपीक म्हणून कलिंगड
घेतात. पपईच्या दोन गादीवाफ्यांतील (बेड) अंतर आठ फूट असते. त्याची रुंदी सुमारे दोन फूट
असते. बेडवरील मल्चिंग पेपरवर दोन्ही बाजूंना कलिंगडाची रोपे लावली जातात.
कलिंगडाचा हंगाम सुमारे ७० दिवसांचा असतो. एकरी सुमारे १५ ते २५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
प्रति किलो ८ ते १६ रुपये दर मिळतो. पपईचा हंगाम संपल्यानंतर त्या ठिकाणी कापूस, सोयाबीन आदींची लागवड करून फेरपालट साधली जाते. तीन विहिरीद्वारे पाण्याची शाश्‍वती मिळवली आहे. दहा एकरांवर ठिबक आहे. वर्षाला सुमारे १०० बॅग्ज एवढे गांडूळ खत तयार केले जाते. फळबागांना एकरी १० ते १५ बॅग्ज त्याचा वापर केला जातो. दशपर्णी अर्क तसेच लसूण, मिरची, आले यापासून तयार केलेल्या अर्काची फवारणी किडींच्या प्रतिबंधक नियंत्रणासाठी केली जाते.
लॉकडाउनमध्ये विक्री व्यवस्था कोलमडल्याने अडीच एकर पपई व पाच हजार केळी झाडांचे मोठे नुकसान झाले. मात्र पुन्हा एकदा मोठ्या हिमतीने व धैर्याने शक्ती एकवटून कोल्हे यांनी नुकसान सावरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Fruit Farming
फळबागकेंद्रित शेतीतून अर्थकारण केले सक्षम

मजुरांशिवाय शेती

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोल्हे कुटुंबाने आपल्या शेतीत एकही गडी ठेवलेला नाही. आई सुनंदा, वडील
बाबूराव, सुदाम, त्यांची पत्नी सुरेखा, मदन, त्यांची पत्नी मंगल व शाळेत जाणारी मुले असे सर्वांचे मिळून नऊ सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. सर्वजण शेतीत राबतात. शेतीतील उत्पन्नातूनच वडिलोपार्जित अडीच एकरांत टप्प्याटप्प्याने वाढ करीत एकूण १० एकर शेती घेतली. गावात पक्के घर बांधले. दोन मुलींचे विवाह केले. मुले उत्तम शिक्षण घेत आहेत.

शेतीला पूर्णवेळ द्यायला हवा

सुदाम यांचा गावातील सामाजिक कार्यात सहभाग असतो. गावातील रस्ते स्वच्छता असो की
नालेसफाई, ते स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन कामाला सुरुवात करतात. त्यांची तत्परता पाहून मग इतरही कामांत सहभागी होतात. सुदाम यांनी योग प्रशिक्षकाचे प्रशिक्षण घेतले आहे. पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून त्यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून सन्मान झाला आहे.


शेती परवडत नाही हे म्हणणे रास्त नाही. पूर्णवेळ शेतीलाच वेळ द्यायला हवा. राजकारणापासून लांब राहायला हवे. लोक राजकारण्यांच्या मागे पळतात. पण माझ्याबाबत उलट स्थिती आहे. स्थानिक आमदार वा नेते माझी शेती पाहण्यासाठी आवर्जून आमच्याकडे येत असतात.
सुदाम कोल्हे, ९३०९९६४८९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com