Maharashtra Monsoon Session LIVE : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कापसाला समाधानकारक दर मिळेल, अशा आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. मात्र, आता जुलै अर्धा उलटून गेलेला असतांना भाववाढीची कोणतीही चिन्हे दिसत नाही. तुम्हाला जे करायचं ते करा, शेतकऱ्यांची थट्टा करून नका, अशा शब्दात आमदार नाना पटोले यांनी हल्ला चढवला.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे दिसले. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत कापसाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं
पटोले म्हणाले, कापसाची दरवाढ होईल. या आशेने शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला आहे. मात्र दरवाढ होत नाही. याशिवाय घरात साठवून ठेवलेले कापसात कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक ठिकाणी आग लागल्याच्याही घटना घडल्या आहेत. पण तरीही कापसाचा दरवाढीची प्रतीक्षा लागली आहे. कापसाला भाव मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करणारे गुलाबराव पाटील तुमच्यासारखा वाघ माणूस शांत पडलायं, असा सवाल केला.
पटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा केली होती. पण जुलै २०२२ पासून राज्यात एका वर्षात १ हजार २३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे. पूर्वी सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात होत होत्या. पण आता हे लोणं मराठवाड्यात पोहोचले आहे. त्यातही कृषीमंत्र्याच्या बीड जिल्ह्यात ३१९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
एकीकडे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्याचवेळी बहुतेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बॅंकेकडून पुरेसे पीक कर्ज वाटप केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकारांच्या दारात जावे लागते. त्यामुळे भविष्यात कर्जबाजारीपणातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुलभ कसं होईल. महागाईच्या आधारावर कर्जाचे वाटप केले पाहिजे, अशी मागणी केली.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा योजना जाहीर केली. राज्याच्या तिजोरीतून विमा कंपन्यांना पैसे देणार आहात. पण शेतकऱ्याचे जे नुकसान होतंय त्याची भरपाई मिळणार नसेल, तर तिचा काय उपाय?, ही योजना कोणासाठी राबवता?, तुम्हाला जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्यासाठी बसवले नाही. पीक विमा योजनेत बीड पॅटर्न राबवण्याची अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. नुकसान झालंत तर नुसती घोषणा नको, त्याची अमंलबजावणी व्हावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.