श्रीमती स्वाती शिंदे, डॉ. विक्रम कड, डॉ. गणेश शेळके
Onion Storage Solutions : कांद्याचे उत्पादन- भारतात १७.४० लाख हेक्टर क्षेत्रफळावर कांदा लागवड होते. कांद्याचे उत्पादन ३०२ लाख मेट्रिक टन होते. महाराष्ट्रात ६.६० लाख हेक्टर क्षेत्रफळावर कांदा लागवड होते. त्याचे उत्पादन ८९.०५ लाख मेट्रिक टन इतके होते. कांदा पीक लागवडीनंतर ३ ते ४.५ महिन्यांत तयार होतो. कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो आणि पात आडवी पडते, यालाच ‘मान मोडणे’ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे ६० टक्के माना पडल्या की कांदा काढणीस तयार झाल्याचे समजले जाते.
काढण्याच्या पद्धती
कुदळीच्या साह्याने आजूबाजूची जमीन सैल करून किंवा इतर अवजारे वापरून कांदे सैल करून कांदे उपटून घ्यावेत. काढणीनंतर ४-५ दिवसांनी कांदा पातीसह शेतात लहान लहान ढिगामध्ये ठेवावा. नंतर कांद्याची पात कापावी. पात कापताना ३ ते ४ सेमी लांबीचा देठ ठेवून कापावी. यानंतर कांदा ४ ते ५ दिवस सावलीत सुकवावा.
परिपक्व झालेला कांदा उपटून पातीसकट ४ ते ५ दिवस शेतात पसरून चांगला सुकवावा. कांद्याच्या ओळी लावताना पहिल्या ओळीतील कांद्यावर दुसऱ्या ओळीतील पात येऊन तो झाकला जावा. अशा प्रकारे पातीच्या सावलीखाली कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. त्यानंतर ४ सेंमी लांब मान ठेवून पात कापावी. चिंगळी, जोडकांदे खराब झालेले कांदे वेगळे काढावेत.
काही ठिकाणी कांदा १५ दिवस पातीसकट उपटून सुकविला जातो व त्यानंतर माना पिरगळून पात वेगळी करतात. कांदा त्याच्या पातीने काही काळ झाकून ठेवतात. कांदा पानासहित वाळवला तर पानातील अॅबसेसिक अॅसिड पानातून कांद्यामध्ये उतरते. त्यामुळे कांद्याची गुणवत्ता सुधारते. त्याचा साठवण कालावधी वाढतो.
कांदा काढणीसाठी हल्ली कांदा काढणी यंत्राचा उपयोग केला जातो.
कांदा साठवणूक
सामान्यत चाळीमध्ये कांदा साठवला जातो. साठवणुकीत उद्भवणारे रोग पुढीलप्रमाणे...
बुरशीजन्य रोग - १. काळी बुरशी २. मानकुज ३. निळी बुरशी ४. काजळी
जिवाणूजन्य रोग - कांद्याचा आतला विटकरी भाग सडून तपकिरी होतो. सड आतून सुरू होऊन बाहेरच्या आवरणापर्यंत पोहोचते.
ते टाळण्यासाठी चाळीत करावयाची फवारणी ः साठवणुकीपुर्वी कांदा चाळीमध्ये कार्बेन्डाझिम २ ग्रॅम अधिक क्लोरपायरिफॉस ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे द्रावणाची फवारणी करावी. म्हणजे कांदा चाळ निर्जंतुक होऊन साठवणुकीतील कांदा सडण्याचे प्रमाण कमी होते.
कांदा साठवणुकीवर परिणाम करणारे घटक
जातीची निवड ः कांद्याच्या सगळ्याच प्रकारच्या जाती साठवण करताना एकसारख्या टिकत नाहीत. खरीप हंगामाचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकू शकत नाही. त्या तुलनेने रब्बी हंगामात तयार होणारा कांदा चार ते सहा महिने टिकतो. मात्र त्यातही जातीनुसार फरक पडतो.
खत व पाणी नियोजन ः सेंद्रिय खतांचा वापर केलेला व योग्य प्रमाणात खतांची पूर्तता केलेला कांदा अधिक टिकतो. सर्व नत्रांच्या मात्रा लागवडीनंतर ६० दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. कांदा पोसण्याच्या स्थितीत पाणी देऊ नये. पाणी दिल्यास जोड कांद्याचे प्रमाण वाढते.
काढणीनंतर कांदा सुकवण्याची स्थिती ः कांदा काढणीनंतर शेतात पातीसह सुकू द्यावा. चार-पाच दिवस वाळू द्यावा.
नंतर चार सेंमी लांब मान ठेवून पात कापावी.
कांद्याचे आकारमान ः कांद्याचे आकारमान साठवणुकीवर परिणाम करते. ५५ ते ७५ सेंमी जाडीचे कांदे साठवणुकीसाठी चांगले असतात.
साठवलेल्या कांद्याच्या थरांची उंची व रुंदी ः कांदा चाळीची उंची चार ते पाच फुटांपेक्षा जास्त असू नये. जास्त उंची असल्यास अगदी तळाशी असलेल्या कांद्यावर वजन पडून सड होऊ शकते. रुंदी ५ फुटांपेक्षा कमी ठेवावी.
कांदा साठवणुकीत खराब होऊ नये, याकरिता उपाय
साठवणीआधी एक दिवस अगोदर चाळीत बुरशीनाशकाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
चाळीसाठी पाणथळ किंवा खोलगट ठिकाणची जमीन टाळावी.
हवा खेळती राहण्यासाठी कांदा चाळीच्या आजूबाजूला असलेले अडथळे दूर करावेत.
चाळीलगत कोणतेही उंच बांधकाम असू नये.
पावसाचा जोर ज्या बाजूला असेल किंवा वाऱ्याचा जोर अधिक असल्यास, त्या बाजू बंद करण्याची व्यवस्था करावी.
कांद्याची साठवण क्षमता वाढण्यासाठी शेणखत व सेंद्रिय खतांचा मात्रा वाढवावी. रासायनिक खतांचा शिफारशीप्रमाणे मर्यादित वापर करावा.
कांदा काढणीवेळी पाऊस झाल्यास बूरशी, जिवाणूंचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. त्यासाठी शिफारशीत बुरशीनाशक, जिवाणूनाशकांची फवारणी करावी.
पिकाला पाणी योग्य प्रमाणातच द्यावे. अधिक पाणी देण्यामुळे साठवण क्षमता घटते.
सर्व नत्र खतांची मात्रा लागवडीनंतर ६० दिवसांच्या आत द्याव्यात. त्यानंतर नत्र खत देणे टाळावे.
साठवणीआधी कांदा चांगला वाळवावा. सर्वसाधारणपणे कांद्याच्या बाहेरील दोन आवरणे सुकणे आवश्यक आहे.
प्रतवारी करून रोगग्रस्त व इजा
असलेला कांदा साठवणुकीआधीच बाजूला काढावा.
साठवणीची जागा स्वच्छ ठेवावी. साठवणुकीदरम्यान कांद्याची वेळोवेळी तपासणी करावी.
साठवणगृहाची स्थिती
राज्यातील एकूण कांदा उत्पादनांपैकी खरिपात ४० टक्के, तर रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये ६० टक्के उत्पादन होते. अजूनही अनेक कांदा साठवण्याच्या सोई किंवा चाळी नाहीत. परिणामी कांदा
सडणे, खराब होणे यांचे प्रमाण मोठे वाढते. त्यामुळे दरांत घट सोसूनही कांदा विक्री करण्याशिवाय पर्याय राहत नाही. आपल्या लागवडीच्या
प्रमाणात कांदा साठवणीची सोय करण्यास प्राधान्य द्यावे. साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता व तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. साठवणुकीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे मे ते जुलै महिन्यांत काही काळ अधिक तापमान आणि काही काळ अधिक
आर्द्रता असते. या काळात वजनातील घट व सडण्याची क्रिया संभवते. साठवणुकीनंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यांत तापमान खाली येते व आर्द्रता वाढते. या काळात कांद्यांना कोंब फुटण्याचे प्रमाण वाढते. आपल्या कांद्याला योग्य दर येईपर्यंत साठवण्याची क्षमता तयार करावी. त्यासाठी आधुनिक किंवा सुधारीत कांदा चाळी तयार करण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे.
पारंपरिक कांदा साठवण संरचना
अ - मातीची किंवा बांबूची शेड्स
या पद्धतीमध्ये माती किंवा बांबूद्वारे चारही बाजूने हवा खेळती राहील असे साठवणगृह तयार केले जाते. त्यासाठी शेडमध्ये छोट्या जाळीमध्ये किंवा पोत्यामध्ये भरून कांदा साठवला जातो. यात खेळती हवा व सकाळ संध्याकाळचा सूर्यप्रकाश आत येत असल्याने आर्द्रतेचे प्रमाण कमी राहते.
ब - खोलीतील साठवणूक
शेतकऱ्याकडे शिल्लक रिकाम्या खोलीतील मोकळ्या जागेत जाळी किंवा ढीग स्वरूपात कांदा साठवता येतो. किंवा कांदा पोत्यामध्ये भरून पोती एकावर एक ठेवली जातात. मात्र दोन ओळींमध्ये योग्य अंतर ठेवले जाते. त्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते. फक्त यात पोती जमिनीवर न रचता लाकडी पट्ट्या किंवा लोखंडी पट्ट्यावर ठेवावीत.
२) आधुनिक कांदा साठवण संरचना
नैसर्गिक हवा खेळती राहणाऱ्या कांदयामध्ये साठवणुकीसाठी पोषक वातावरण नियंत्रित करण्यास मोठया प्रमाणावर अडचणी येतात. वादळ, वारा अति जास्त पाऊस यांमुळे पारंपरिक कांदा चाळीमध्ये कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी नियंत्रित वातावरणात कांदा साठवण्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. या साठवणगृहात बंदिस्त आणि नियंत्रित वातावरणात कांदे साठविले जातात. यामध्ये २५ ते ३० अंश सेल्यिअस तापमान व ६०-६५ टक्के आर्द्रता आणि हवा खेळती राहण्यासाठी व्यवस्था केली आहे. या कांदा चाळीमध्ये कांदा सडण्याचे, कांद्याला कोंब येण्याचे प्रमाण कमी आहे.
अ) साठवण शेड्स (गृह)
ही सामान्यतः स्टील, लोखंड, सिमेंट आणि टीन याद्वारे तयार केली जातात. त्यांची उंची साधारण १२ ते १५ फूट आणि रुंदी २० ते २५ फूट असते. त्याच्या चारही बाजूंनी हवा खेळती राहण्यासाठी व्यवस्था केलेली असते. अशा शेड्समध्ये कांदा साठवणुकीसाठी चाळी बनवून किंवा पोती योग्य उंचीपर्यंत एकावर एक रचून साठवली जातात. त्यात कांदा दीर्घकाळ टिकतो.
ब) वायुविजनयुक्त शेड्स -
साठवणुकीत हवा खेळती नसेल तर कांदा खराब होण्याचे प्रमाण जास्त असते. शेड्समध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी चोहोबाजूंनी खिडक्या आणि छतावर वायुविजनासाठी पाइप्स असतात. त्यामुळे अंतर्गत तापमान व आर्द्रतेचे प्रमाण नियंत्रणात ठेवले जाते.
३) शीतगृहातील साठवण
शीतगृहात कांदा साठवणे ही आधुनिक काळातील एक प्रभावी पद्धत आहे. शीतगृहामध्ये कांदा कमी तापमानाला व योग्य आर्द्रतेला दीर्घकाळ साठवता येतो.
अ) शीतगृहातील साठवण
शीतगृहामध्ये कांदा साठवणीसाठी साधारणपणे ० ते ५ अंश सेल्सिअस तापमान आणि ६०-६५ टक्के आर्द्रता राखली जाते. यात ६ महिन्यांपेक्षाही जास्त काळ कांदा चांगला राहू शकतो. कांद्याची गुणवत्ता आणि पौष्टिक घटक जास्त कालावधीसाठी टिकून राहत असल्याने निर्यातीसाठीच्या कांदा साठवणीसाठी त्याचा वापर होतो.
ब) नियंत्रित वातावरणातील शीतगृह साठवण
या पद्धतीमध्ये तापमान, आर्द्रतेसोबत अंतर्गत प्राणवायूचे प्रमाण नियंत्रित केले जाते. त्याच वेळी नायट्रोजन व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढविले जाते. यामुळे कांदा दीर्घकाळ ताज्या स्थितीत राहतो. सडण्याचे प्रमाणही खूपच कमी होते.
क - पारंपरिक चाळ
नैसर्गिक वायूवर आधारित चाळ ही एकपाखी चाळीची उभारणी दक्षिण उत्तर करावी. दोन पाखी चाळीची उभारणी पूर्व-पश्चिम करावी. चाळीची लांबी ही पन्नास फुटांपेक्षा आणि रुंदी ५ फुटांपेक्षा कमी असावी. चाळीतील कांद्याच्या ढिगांची उंची ५ फटुांपेक्षा जास्त असू नये. अधिक उंचीमुळे तळातील कांद्यावर वजन वाढते, हवा खेळती राहत नाही. परिणामी, खालील थरातील कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
तळाशी हवा खेळती राहील अशी रचना करावी. चाळीच्या बाजूच्या भिंती या लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात. त्यास फटी असाव्यात. चाळीसाठी उंचावरील पाणी साठणार नाही अशी मोकळी जागा निवडावी. पत्र्यांना पुरेसा ढाळ देऊन पत्रे १ ते २.५ मीटरपर्यंत बाहेर काढावेत. पावसाळ्यात ओसाड्यांपासून बचाव होतो. चाळीवर सिमेंटचे पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते. चाळीचे छप्पर उतरते असावे.
- डॉ. विक्रम कड, ७५८८०२४६९७
(कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.