Mumbai News : मुंबई येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेने (सिरकॉट) जिनिंग उद्योगासाठी उपयुक्त ठरेल, असे ‘वन-टाइम डीप ग्रूव्ह रोलर’ (एकदाच खोल खाचे आकारलेला जिनिंग रोलर) तंत्रज्ञान विकसित केले आहे. ३ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई येथे आयोजित सिरकॉटच्या १०० व्या स्थापना दिनी कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक आणि कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ. हिमांशू पाठक यांच्या हस्ते हे तंत्रज्ञान जारी करण्यात आले होते.
सिरकॉटचे संचालक डॉ. एस. के. शुक्ला यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. शेषराव काऊतकर, डॉ. एस. के. शुक्ला, डॉ. व्ही. जी. अरुडे आणि डी. यू. पाटील यांनी हे संशोधन केले. या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी नवी दिल्ली येथे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ९६ व्या स्थापना आणि तंत्रज्ञान दिवसानिमित्त मंगळवारी (ता. १६) केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते शास्त्रज्ञांचा तंत्रज्ञान प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
...असे आहे तंत्रज्ञान
जिनिंग उद्योगामध्ये येणाऱ्या कापसातील सरकी (कापूस बी) वेगळी करावी लागते. त्यासाठी सध्या दोन रोलर असलेली जिनिंग मशिनचा वापर केला जातो. या यंत्रामध्ये दोन रोलरवर २ मि.मी. खोलीच्या नागमोडी आणि खडबडीत खाचे केलेले असतात. ते फिरत असताना या खाच्यामुळे रुईपासून सरकी वेगळी करतात. मात्र सततच्या घर्षणामुळे रोलर्सवरील खाचे घासले जाऊन पृष्ठभाग गुळगुळीत होतो.
परिणामी रुईपासून सरकी वेगळी होण्यामध्ये अडचणी येतात. त्याचा जिनिंग कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी दर ६० तासांनी किंवा दर २-३ दिवसांनी रोलर्सवर घासून खाचे (री-ग्रूव) पुन्हा खडबडीत करावे लागते. हे रोलर्स चामड्याच्या लगद्यापासून बनवलेले व कठीण असतात. त्यावर हस्तचलित अशा रोलर कापणी यंत्राने खाचे करण्यासाठी २ ते ३ मजूर आणि २० ते ३० मिनिटांचा कालावधी लागतो. या प्रक्रियेदरम्यान जिनिंग मशीन बंद राहते. परिणामी, कारखान्याच्या एकूण उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
ही समस्या दूर करण्यासाठी मुंबई येथील सिरकॉट संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. शेषराव काऊतकर, डॉ. एस. के. शुक्ला, डॉ. व्ही. जी. अरुडे आणि डी. यू. पाटील यांनी संशोधन केले. त्यांनी २५ मि. मी. खोलीचे खाचे असलेला रोलर तयार केले. हे रोलर्स आधीच खोलवर खाचेयुक्त असल्याने दर २-३ दिवसांनी खडबडीत खाचे करण्याची गरज पडत नाही. त्यासाठी जिनिंग मशिन बंद राहत नाही. खाचे करण्यासाठी लागणारे मजूरही कमी होतात. संस्थेने या संशोधनाच्या पेटंटसाठी अर्ज दाखल केला आहे.
तंत्रज्ञानाचे फायदे ...
जिनिंग प्रक्रियेमध्ये कापसाच्या रुई उत्पादकतेत सुधारणा होते.
री-ग्रूव्हिंग लागणारे मनुष्यबळ व वेळ वाचतो. मानवी कष्ट कमी होतात.
रोलर्स री-ग्रूव्हिंगसाठी मशीन बंद ठेवण्याची गरज कमी होते.
क्रोम सूक्ष्म कणांमुळे पर्यावरण प्रदूषणाची शक्यता कमी होते
एकसारख्या २ मि.मी. रुंदीच्या खाचेमुळे (ग्रुव्हमुळे) कपाशीतील रुईची गुणवत्ता चांगली मिळते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.