Pune News : शेतकरी अनेक अडचणींना तोंड देत द्राक्षशेतीला चिकाटीने पुढे नेत आहेत. मात्र, सरकारी मदत करताना इतर पिकांच्या यादीत द्राक्षाचा विचार झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे द्राक्षशेतीमधील समस्यांचा आढावा व मदतीसाठी येत्या ३० ऑगस्टला राज्य शासनाकडून स्वतंत्र बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या द्राक्ष परिषदेच्या सोमवारी झालेल्या सांगता सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर बागाईतदार संघाचे मावळते अध्यक्ष शिवाजीराव पवार, खजिनदार सुनील पवार, माजी अध्यक्ष सुभाष आर्वे व डॉ. ज. म. खिलारी, अखिल भारतीय फलोत्पादन संघाचे अध्यक्ष सोपान कांचन व्यासपीठावर होते. संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास भोसले व द्राक्षवाणाचे पेटंट मिळवणारे प्रयोगशील शेतकरी जयकर माने यांचा सत्कार उपमुख्यमंत्र्यांनी केला.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांची नवी पिढी आता द्राक्षशेतीला वेगाने पुढे नेते आहे. द्राक्ष संघाची वार्षिक मेळाव्याची परंपरा कौतुकास्पद आहे. त्यातून शेतकरी व तज्ज्ञांमध्ये अभ्यासपूर्ण संवाद होतो. द्राक्षशेतीमधील समस्यांची माहिती नाशिक दौऱ्यात मी घेतली होती. याबाबत विविध खात्यांशी एकत्रित चर्चा करावी लागेल. एरवी इतर पिकांसाठी सतत मदत जाहीर होत असते. परंतु, द्राक्ष शेतीबाबत क्वचितच मदत झाल्याचे दिसते. द्राक्ष उत्पादकदेखील कर्ज काढतात. तेही समस्येत असतात व स्वतः मार्ग काढीत असतात. परंतु, त्यामुळे सरकारने त्यांच्याकडे बघायचेच नाही का, अशी भावना शेतकरी बोलून दाखवतात. शासन तुमच्या समस्या सोडविण्यासाठी व्यवहारिक मार्गदेखील काढेल.’’
द्राक्षशेतीमधील अडचणी सोडविण्यासाठी संघाचे नेतृत्व अजितदादांनी करावे, निर्यातीसाठी अमेरिकेची दारे खुली होण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच २०१० मधील द्राक्ष निर्यातीत उत्पादकांना झालेल्या तोट्याची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी प्रास्ताविकात केली होती. तोच धागा पकडत उपमुख्यमंत्री म्हणाले, की ९० टक्के द्राक्षनिर्यात एकट्या महाराष्ट्रातून होते आहे. निर्यात वाढली पाहिजे. त्यासाठी अमेरिकेची बाजारपेठ हवी असल्यास केंद्राशी पत्रव्यवहार केला जाईल. २०१० मधील निर्यातीत झालेल्या नुकसानीबाबत मी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची भेट घेईल. मुख्यमंत्री व आम्ही दोघे उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असताना या मुद्द्याचा पाठपुरावा करू.’’
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...
दहा अश्वशक्तीचे सौरपंप देणार
नारपार वळण योजनेच्या निविदा लवकरच, वैनगंगा-पैनगंगा योजनेबाबत निर्णय घेऊ
आधीच्या कर्जमाफी योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही
बेदाण्याला जीसीटी सवलतीसाठी प्रयत्न
द्राक्षाला किफायतशीर फळपीकविमा देण्यासाठी कंपन्यांशी बोलू
द्राक्षासाठी प्लॅस्टिक कव्हर योजना ५०० हेक्टरपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.