Soil Fertility  Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Fertility : जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय

प्रताप चिपळूणकर

Measures to Increase Soil Fertility : पारंपरिक पद्धतीत चांगली पूर्वमशागत म्हणजे उभी आडवी हिवाळी नांगरणी, ५-७ महिने जमीन उन्हात तापविणे, ढेकळे फोडणे, कुळवाच्या पाळ्या देणे, शेवटच्या कुळवाच्या पाळीत एकरी २० ते २५ गाड्या शेणखत, कंपोस्ट विसकटणे आणि मेलपट मारून पेरणीसाठी जमीन तयार करणे. आता ही पूर्वमशागत चांगली झाली हे कसे समजावे;

शेवटच्या मेलपटाच्या पाळी मारणेवेळी हवेत धुरळा उडाला पाहिजे म्हणजे उत्तम मशागत पार पडली.हे पारंपरिक शेतीचे चित्र होते. हरितक्रांतीनंतर बागायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आठमाही वार्षिक, बहुवार्षिक शेतीच्या प्रमाणात वाढ झाली. तोपर्यंत बहुतांशी जमिनीवर पावसाळी एकच पीक घेतले जात होते. अगदी थोड्या क्षेत्रावर रब्बी पीक घेण्याची प्रथा होती.

शेतकरी उन्हाळाभर उन्हातान्हात पारंपरिक मशागतीच्या कामात गुंतलेला असे. शेवटची मेलपटाची पाळी मारल्यानंतर एकसारखे सुंदर रानाची रचना पाहिल्यानंतर उन्हाळाभर कष्ट केल्याचे सार्थक झाल्याचे मानसिक समाधानात केलेले प्रचंड कष्ट विसरून जाऊन उत्तम खरीपाच्या पिकाची स्वप्ने पाहण्यात दंग होऊन जात असे. हजारो वर्षे ही मशागतीची कामे चालू आहेत.

मशागत उत्तम होण्यासाठी उत्तमोत्तम बैल पाळणे हा एक छंदाचा भाग होता. गावात आपली बैलजोडी सर्वांत देखणी व कामाला हलकी पाहिजे. यासाठी कितीही पैसे गुंतवणुकीची तयारी शेतकऱ्यांची असे. गावात शेतकऱ्यात याबाबत एक प्रकारची ईर्षा असे. हे वैभव आम्हाला शेतीच्या सुरुवातीला प्रत्यक्ष पाहायला मिळाले आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत मी देखील सहभागी झालो होतो.

कालांतराने दोन- चार गावात मिळून मोठे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू लागले होते. ट्रॅक्टरवाला शेतकरी कितीही मोठा असला तरी स्वतःचे काम झाल्यानंतर इतरांचे काम भाडेतत्वावर करून देणे हा शेतीला जोडधंदा केला जात असे. पुढे बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. या राष्ट्रीयीकृत बँकांना शेतीला कर्ज देणे बंधनकारक झाले, तोपर्यंत शेतकरी समाज वित्तपुरवठ्यासाठी दलाल आणि सावकारावर अवलंबून होता. सावकाराचे दामदुप्पट व्याज परवडत नसे. यामुळे ट्रॅक्टर खरेदी अगदी मोठ्या शेतकऱ्यांच्या आवाक्यात बरेच वर्षे होती.

मशागत, पेरणीसाठी यंत्राचा वापर

पीक कापणीनंतर जमीन दगडासारखी कठीण होई. प्रसंगी अशा जमिनीच्या पहिल्या नांगरणीच्या कामाला २ ते ३ बैलजोड्या लावल्या जात. हळूहळू प्रत्येक गावात ट्रॅक्टरची संख्या वाढत गेली व बैल पाळणे हळूहळू कमी कमी होत गेले. नांगरणीची अवजारे मोठी आणि बोजड असत. यामुळे बसलेली जमीन फोडणे मोकळी करणे शक्य होई. अशी जमीन पोकळ करणे मागे काही ठरावीक कारणे होती. मशागतीच्या अवजाराच्या मानाने पेरणीचे अवजार हलके व कमी जाडीचे असे. हे पेरणी यंत्र कोणताही अडथळा न येता पुढे पुढे जावे व एकसारखे बसून जावे हा त्यामागील उद्देश होता.

पेरणी यंत्र उड्या मारत चालले तर त्याचे दात मोडण्याची शक्यता व मुठीने चाड्यात सोडलेले दाणे सर्व नळात एकसारखे पडावे हा त्यामागे मुख्य उद्देश असे. वर्षभर साठविलेले आणि बाहेरून खरेदी केलेले सेंद्रिय खत मातीत एकसारखे मिसळले जावे हा दुसरा उद्देश. उत्तम पूर्वमशागत हा चांगल्या पीक उत्पादनासाठी विमाच आहे, असे कृषी अभ्यासक्रमात शिकविले जाई.

अवजड पहिल्या नांगरणीचे काम पुढे ट्रॅक्टरने करून घेतले जाऊ लागले. जमीन थोडी तापल्यानंतर दाताचे अवजार फिरवून ढेकळे थोडी बारीक झाल्यानंतर पुढील कामे घरची बैलजोडी करून घेतली जाणे असा प्रकार पुढे बरीच वर्षे चालू राहिला. या कामासाठी ट्रॅक्टरचे भाडे बरेच मोजावे लागले तरी चांगल्या पूर्वमशागतीची शिफारस कृषी विद्यापीठ, कृषी खात्याकडून आजही केली जाते. मीही अनेक वर्षे या परंपरांचे पालन मोठ्या निष्ठापूर्वक करीत आलो आहे.

पुढे भू-सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासाने प्रत्येक वर्षी प्रत्येक पिकाला २० ते २५ गाड्या शेणखत वापरले पाहिजे हे लक्षात आले. पारंपारिक शेणखत कंपोस्ट, गरजेइतके उपलब्ध करणे आणि वापरणे केवळ अशक्य असल्याचे लक्षात आले. मग त्याला पर्याय शोधणे सुरू झाले. कोणती तरी वनस्पती जनावर खाते, त्यापासून शेणखत तयार होते. आजपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या व विद्यापीठाच्या शिफारसीप्रमाणे सेंद्रिय खत वापर म्हणजे शेणखत, कंपोस्ट खताचा वापर. यामुळे असे करत आपण पाळलेली अगर दुसऱ्याची जनावरे खाऊ शकतील तितकाच कच्चा माल या कामी वापरता येई. मी ही व्याख्या बदलली, वनस्पती अगर प्राण्यांनी तयार केलेला कोणताही पदार्थ हा कच्चा माल होऊ शकतो, या विचारापर्यंत आलो.

भू-सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यास

भू-सूक्ष्मजीवशास्त्राने शिकविले, की वनस्पती अवशेष थेट जमिनीतच कुजले पाहिजेत, ते दीर्घकाळ कुजत राहणे जमिनीसाठी सर्वांत चांगले आहे. आता थेट शेतात कुजविण्यासाठी कच्च्या मालाचा शोध सुरू झाला. खर्च व उत्पन्नाचा मेळ बसावा यासाठी कोणत्याही परिस्थितीत जागेलाच उपलब्ध झाल्यास जास्त चांगले, या विचाराने पहिले लक्ष उसाच्या पाचटाकडे गेले. पाचट जागेला कुजविण्याचे १५ वर्षे वेगवेगळे प्रयोग केले. पाचट कुजविण्याचे तंत्र विकसित झाले परंतु असे लक्षात आले की यातून उत्पादनात काहीच वाट मिळालेली नाही.

मग उसाचे जमिनी खालचे अवशेष (खोडकी) कुजविण्याचा निर्णय झाला. खोडकी कशी कुजवायची यावरील चिंतनात असे लक्षात आले, की जशी खोडकी रानात उभी आहेत त्याच अवस्थेत मारायची आणि पुढील भाताची पेरणी उसाच्या जुन्या सरी वरंब्यावरच करावयाची. रानाची कोणतीही हलवाहलवी न करताच भात टोकण पद्धतीने सरी वरंब्यावर पेरावयाचे. यातून १८ वर्षांपूर्वी माझे जमिनीत शून्य मशागत पद्धतीला सुरुवात झाली. कोणतीही मशागत न करता भात घेणे हे त्या काळात इतरेजनांसाठी चेष्टेचा विषय होता. येणारे जाणारे लोक हसत होते. अशी कोठे शेती पिकत असती का?

मात्र घट्ट जमीन व पहिला महिना चांगला वाफसा या भाताच्या प्राथमिक गरजा व्यवस्थित भागल्याने भात उत्तम पिकले. सरी वरंब्यामुळे भाताला गरजेनुसार पाणी देणे अतिशय सोपे गेले. भात कापणी झाली, आत फेर उसाची लावण करावयाची होती. जुने सरी वरंबे तयार होते. सरीचे तळात नांगराचे एक तास फक्त कांडी व्यवस्थित पुरली जाईल इतके खोल मारले आणि नेहमीप्रमाणे लावण करून घेतली. ऊस उगवला, योग्य पातळीत फुटवे आले, खांदणी झाली. त्यानंतर एक महिन्याने उसाकडे पहात असता अशी जाणीव झाली की गेले ३० ते ३५ वर्षे इतका चांगला ऊस आपल्या रानात कधीही पाहावयास मिळाला नाही.

यथावकाश ऊस कारखान्याला गेला. ज्या रानात अनेक प्रयोग करूनही ४० टन प्रति एकरी उत्पादन मिळत नव्हते तेथे ६० टन उत्पादन मिळाले. ही ५० टक्के वाढ केवळ खोडकी जागेला कुजण्याचा परिणाम होता. या गोष्टी डोके चक्रावणाऱ्या होत्या. वनस्पतीच्या जमिनीवरच्या भागापेक्षा जमिनीखालच्या भागाचे खत सुपीकतेसाठी सर्वांत चांगले हा नवीन धडा शिकायला मिळाला. पाचट चुलीत जाळले तर ते व्यवस्थित पेटत नाही. खोडकी मात्र जाळल्यास उत्तम धग निर्माण होते. उष्णता ही एक शक्ती आहे, ती खोडक्यात जास्त असते. त्याचे खत सर्वांत चांगले, पाचटाचे खत त्यामानाने निकृष्ट हे यातून शिकलो. याबाबत कृषी खाते, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांना माझे अनुभव सांगितले आहेत. खोडक्याबरोबर जमिनीत पसरलेल्या मुळांच्या जाळ्याचे कुजण्याचा हा परिणाम असल्याचे एका वनस्पतीशास्त्राचे ग्रंथ वाचनातून लक्षात आले.

प्रताप चिपळूणकर , ८२७५४५००८८, (लेखक कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT