Soil Fertility : जमीन सुपीकता जपत पीक उत्पादनात सातत्य

Crop Production : मोहिदे (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील मच्छिंद्रनाथ वासुदेव पाटील हे शाळेतील नोकरी सांभाळून वडिलोपार्जित शेतीमध्ये केळी, कलिंगड, पपई या पिकांचे दर्जेदार उत्पादन घेतात.
Soil Fertility
Soil FertilityAgrowon

चंद्रकांत जाधव

Jalgaon News : मोहिदे (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील मच्छिंद्रनाथ वासुदेव पाटील हे शाळेतील नोकरी सांभाळून वडिलोपार्जित शेतीमध्ये केळी, कलिंगड, पपई या पिकांचे दर्जेदार उत्पादन घेतात. जमीन सुपीकता, पीक फेरपालटीच्या बरोबरीने प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या अवलंबातून त्यांनी पीक उत्पादनात वाढ साधली आहे.

चोपडा शहरातील पंकज विद्यालयात मच्छिंद्रनाथ पाटील हे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आहे. शाळेतील नोकरी सांभाळून वडिलोपार्जित शेतीचे चांगले व्यवस्थापन करतात. शाळेतील विविध उपक्रमांची दखल घेत २०१६ मध्ये मच्छिंद्रनाथ पाटील यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला होता. वडील वासुदेव पाटील यांच्याकडून त्यांना शेतीचा वारसा मिळाला. मोहिदे शिवारात १० एकर आणि नजीकच्या दगडी (ता.चोपडा) गावशिवारात १० एकर शेती आहे. शेतशिवारात चार कूपनलिका आहेत. एक कायमस्वरूपी सालगडी असून, इतर कामांसाठी मजुरांची मदत घेतली जाते. शेतीमध्ये योग्य गुंतवणूक आणि गावाशी असलेली नाळ तुटू नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. दर आठवड्यातील शनिवार, रविवार आणि जेव्हा शासकीय सुट्टी असते तेव्हा ते शेतीमध्ये रमतात. दर शनिवार, रविवारी शेतावर जाऊन सालगड्याच्या मदतीने पुढील आठवडाभरातील शेती कामाचे नियोजन करतात. पत्नी भारती पाटील यांची देखील शेती नियोजनात चांगली मदत होते.

सुधारित तंत्रज्ञानावर भर ः
पाटील यांची दोन शिवारांत वीस एकर शेती आहे. दगडी शिवारातील शेती ही १०० टक्के ठिबक सिंचनाखाली आणली आहे. दरवर्षी कांदेबाग, मृग बाग लागवड असते. सरासरी आठ एकरात पाच बाय साडेपाच फूट अंतरावर उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड केली जाते. कांदेबागतील रोपांची लागवड सरीमध्ये केली जाते. मृग बागेतील रोपांची लागवड गादीवाफ्यावर करतात. लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून पुरेसे शेणखत आणि रासायनिक खताची मात्रा दिली जाते. लागवडीनंतर दर महिन्याला वेळापत्रकानुसार विविध खतांची मात्रा देण्यात येते. जमीन सुपीकतेकडे लक्ष असल्याने ठिबकद्वारे विद्राव्य खते योग्य प्रमाणात दिली जातात. खरिपात मूग व अन्य पिके घेतली जातात. केळी पिकाला मूग, पपई, कलिंगड आदी पिकांची फेरपालट असते.

Soil Fertility
Soil Fertility : जमीन सुपीकता अन्‌ संवर्धन महत्त्वाचे...

ऑक्टोबरनंतर हलकी पूर्वमशागत करून ठिबकवर हरभऱ्याची लागवड केली जाते. केळीचा बेवड हरभऱ्यासाठी फायदेशीर ठरतो. मोठा काबुली आणि लहान काबुली जातीची लागवड केली जाते. या जातीस बाजारपेठेत चांगली मागणी आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात पाटील चार एकरांत पपई लागवड करतात. पपई रोपांचे उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी क्रॉप कव्हरचा उपयोग केला जातो. उन्हाळ्यात दोन एकर क्षेत्र रिकामे राहिल्यास बेवड म्हणून बाजरी लागवड केली जाते. बाजरी पिकालाही ठिबक सिंचन केले जाते.
पूर्वी केळी, पपईची उत्पादकता कमी होती. मात्र प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञांच्या सल्ला तसेच सूक्ष्मसिंचनासह खतांचा नियंत्रित कार्यक्षम वापर करून पाटील यांनी पीक उत्पादकता वाढविली आहे. केळीची सरासरी १८ ते २० किलोची रास मिळते. पपईचे एकरी २० ते २२ टन, हरभऱ्याचे एकरी १० क्विंटल आणि बाजरीचे एकरी आठ ते १० क्विंटल उत्पादन मिळते.

शेती व्यवस्थापनासाठी मच्छिंद्रनाथ यांना मोठे बंधू राजाराम पाटील यांचे मार्गदर्शन मिळते. तसेच पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरुले, गावातील मित्र पांडुरंग पाटील, पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ महेश महाजन, मोहिदे येथील अशोक पाटील, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, वढोदा येथील शेतकरी वासुदेव पाटील तसेच रावसिंह बारेला यांचे मार्गदर्शन मिळते.पपई, केळीची थेट विक्री ः
पाटील केळी, पपईची थेट विक्री करतात. चोपडा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर भागातील खरेदीदारांशी चांगला संपर्क आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत असल्याने खरेदीदारही पाटील यांच्या शेतीमालास पसंती देतात. कांदेबाग केळीची काढणी सप्टेंबर आणि मृग बहर बागेची काढणी फेब्रुवारीत सुरू होते. या काळात केळीचे दर टिकून असतात. या सुरुवातीच्या दरांचा लाभ मिळावा, यानुसार नियोजन असते. सप्टेंबरमध्ये सणवार, पुढे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यामुळे कांदेबाग केळीस लाभ मिळतो. खरेदीदार थेट शेतात येऊन खरेदी करतात. दर कमी असले तरी उत्पादकता चांगली असल्याने केळी पीक त्यांना परवडते.

शेतीने दिली ओळख
मच्छिंद्रनाथ यांचे वडील वासुदेव पाटील यांनी शेतीच्या बळावर मुलांना उच्चशिक्षण दिले. शेतीनेच आपल्याला मोठे केले, ही कृतज्ञता पाटील यांनी कायम ठेवली. शेतीच्या उत्पन्नातून ६०० चौरस फूट एवढे गोदाम शेतात बांधले आहे. सूक्ष्मसिंचन, कूपनलिका अन्य यंत्रणा घेऊन शेतीमध्ये गुंतवणूक केली. पाटील यांचा मुलगा प्रफुल्ल हा वैद्यकीय पदवी घेऊन मुंबईत कार्यरत आहे. कन्या नेहा यांनी विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

जमीन सुपीकतेकडे लक्ष
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी धैंचा, ताग लागवड केली जाते. दरवर्षी शेणखताचा पुरेशा प्रमाणात वापर केला जातो. केळी, पपईचे अवशेष बारीक करून जमिनीत गाडले जातात. रासायनिक खतांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियंत्रित वापर केला जातो. अनेक वर्षांपासून ठिबक सिंचनावर त्यांनी भर दिला आहे.


जमा-खर्च, व्यवस्थापनाच्या नोंदी ः
- भारती पाटील यांच्याकडे शेतीमधील खर्च, नफा आदी बाबींच्या नोंदी.
- दर रविवारी आठवडाभरातील पुढील कामकाजाचे नियोजन.
- ज्या पिकात नफा कमी झाला, त्यावर चर्चा करून नियोजनात सुधारणा.
- मजुरी, खतांवरील खर्च कमी करण्यावर भर.
- पपई, केळी, हरभरा पिकाचे दर्जेदार उत्पादनासाठी प्रयत्न.
- शेतातून जे उत्पन्न येते, ते व्यवस्थापनात गुंतवून शेती नफ्यात कशी येईल, याचे नियोजन.

संपर्क ः मच्छिंद्रनाथ पाटील, ९४०३८३७६३७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com