Soil Fertility : जमिनीच्या सुपीकता अन् व्यावसायिक पीक नियोजनातून साधली आर्थिक प्रगती

commercial Crop Management : सातारा जिल्ह्यातील शिवडे (पो. उंब्रज, ता. कऱ्हाड) येथील प्रगतिशील शेतकरी राहुल सुरेश बाजारे हे गेल्या तेवीस वर्षांपासून टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. या पिकामध्ये सातत्यपूर्ण अभ्यास, प्रयोग आणि सुधारणा करत उत्पादनामध्ये वाढ मिळवली आहे.
Agriculture Success Story
Agriculture Success StoryAgrowon

Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यातील शिवडे (ता. कऱ्हाड) हे गाव महामार्गालगत असून, आठवडी बाजाराचे गाव उंब्रज हे जवळ आहे. आठवडी बाजारामध्ये भाजीपाल्यास मोठी मागणी असते, हे लक्षात घेऊन राहुल बाजारे यांचे वडील सुरेश आणि चुलते कुमार हे वांगी व अन्य भाजीपाला पिकांची लागवड करत आले आहेत. त्यांच्या हाताखालीच राहुल यांनी शालेय काळापासूनच शेती आणि विक्री व्यवस्थापनाचे धडे गिरवले.

वाणिज्य शाखेतून पदवी पूर्ण केल्यानंतर हळूहळू शेतीची जबाबदारी राहूल यांनी घेत गेले. बाजारे कुटुंबीयांची एकूण साडेतेरा एकर बागायत शेती महामार्गाच्या दोन्ही बाजूंस पसरलेली आहे. सुरुवातीला वांगी, काकडी, कारली आदी भाजीपाला कमी अधिक प्रमाणात करत असे. या दरम्यान शेजारच्या हनुमानवाडी येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र जाधव यांची भेट झाली. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी टोमॅटो लागवडीचे नियोजन सुरू केले.

टोमॅटो पीक बनले मुख्य ः

पूर्वीही बाजारे कुटुंबीय टोमॅटो लागवड करत असले तरी त्याचे क्षेत्र काही गुंठ्यांइतकेच असे. राहुल यांनी मार्च २००३ मध्ये दोन एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली. या पिकाच्या नियोजनातून चांगले उत्पादन व दर मिळाल्याने उत्पन्नही भरघोस मिळाले. आत्मविश्‍वास वाढला. व्यवस्थापनातील खाचाखोचा लक्षात येत गेल्याने दरवर्षी थोडे थोडे करत या पिकामध्ये ते वाढ करत गेले.

आज त्यांच्याकडे सहा ते १३ एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड असते. राहुल हे वर्षातून दोन वेळा टोमॅटोचे नियोजन करतात. उन्हाळा हा प्रमुख हंगाम गृहीत धरून मार्च, एप्रिल महिन्यांत बाजारपेठेचा विचार करून क्षेत्र कमी अधिक केले जाते. दुसरी लागवड ऑॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत साधारणतः चार ते सात एकरांपर्यंत केली जाते.

Agriculture Success Story
Agriculture Success Story : माळरानाचे पालटले चित्र...

प्रयोगातून केलेले बदल ः

राहुल यांचे पीक टोमॅटो हे बऱ्यापैकी स्थिर असले तरी त्यामध्ये ते विविध प्रयोग सतत करत आले आहेत. उदा. सुरुवातीला तार काठीवर लागवड करताना दोन सरींत पाच फूट अंतर ठेवत. त्यामुळे एकरी सुमारे सात हजार रोपे लावली जात. पुढे त्यात मल्चिंग, ठिबक सिंचन, विद्राव्य खते यांचा वापर सुरू केला. त्यातही टप्प्याटप्प्याने बदल करत व्यवस्थापन सोपे होण्यासाठी ते सध्या दोन सरीतील अंतर आठ फूट ठेवतात.

यामध्ये एकरी रोपे ४३०० रोपे लागतात. मात्र सरीची संख्या कमी झाल्याने मल्चिंग, तार, काठी, ठिबक लॅटरल यांच्यामध्ये बचत झाली. रोपांची संख्या कमी झाली असली तरी प्रत्येक झाडांचे पूर्ण क्षमतेने उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न करतो. बागेमध्ये हवा खेळती राहून कीड-रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो, फुलांची संख्या वाढते, असे त्यांचे मत आहे.

बाजारातील दरामध्ये चढ-उतार शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असले, तरी उत्पादन खर्चात शक्य तितकी बचत करणे, एवढे शेतकऱ्यांच्या हाती असते. गेली काही वर्षे सातत्याने सेंद्रिय आणि रासायसिक खतांमध्ये योग्य समतोल ठेवत आहे. त्यामुळे माती भुसभुशीत आणि सुपीक झाली आहे. आपण त्या उद्देशाने व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करत असल्याचे राहुल सांगतात.

दहा ड्रम तंत्रज्ञानाचा वापर

राहुल यांना वाचनाची सवय आहे. अतिरिक्त रासायनिक घटकांच्या वापरातून आपली जमिनीचे आरोग्य खराब होत असल्याचे त्यांना प्रथमच कोरोनाच्या काळात जाणवले. मग शेतीची सुपीकता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. यासाठी तज्ज्ञांचे लेख वाचणे, आवश्यक ती प्रशिक्षणे घेत त्यांनी स्वतःला अपडेट ठेवले आहे. नाशिक येथील मंगेश भास्कर यांच्या दहा ड्रम तंत्रज्ञानाविषयी समजल्यानंतर संपूर्ण माहिती घेत ती यंत्रणा आपल्या शेतात उभी केली.

त्यात ईएम द्रावण, जिवामृत स्लरी, फल्विक अॅसिड, देशी केल्प, मासे अर्क, खेकडा अर्क, अमिल अर्क, व्हेनील अर्क, दशपर्णी अर्क, फलार्क यांचा समावेश असतो. हे अर्क आळवणी किंवा फवारणीद्वारे पिकांना दिले जातात. त्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब सुधारला आहे. जमीन आरोग्यात सुधारणा झाल्यामुळे खताची कार्यक्षमता वाढते. परिणामी, खत खर्चात किमान ३० टक्के बचत होत असल्याचे राहुल सांगतात.

शेतीची वैशिष्ट्ये ः

- प्रमुख पीक टोमॅटो. वर्षातून दोन वेळा टोमॅटो पिकाचे नियोजन.

- उन्हाळी हा प्रमुख हंगाम असल्याने सहा ते १३ एकरांपर्यंत लागवड.

- शेतात ५० टक्के सेंद्रिय व ५० टक्के रासायनिक निविष्ठांचा वापर.

- दोन वर्षांपासून तणनाशकाचा अजिबात वापर करत नाही. यंत्राद्वारे तणनियंत्रणाचा प्रयत्न केला जातो.

- टोमॅटो निघाल्यावर बाजारपेठेचा अंदाज घेऊन काकडी, वांगे आदी प्रकारची पिके त्यांचा स्ट्रॅक्चरवर केली जातात.

- प्रॉम शेणखत आणि दहा ड्रॅम तत्रज्ञानांचा शेतात वापर केला जातो.

-व्यायसायिक पद्धतीने शेती करताना वेळेवर कामे होण्यासाठी आवश्यक ती यंत्रे खरेदी केली आहेत.

Agriculture Success Story
Agriculture Success Story : तूर- सोयाबीन पद्धतीचा भलमे यांचा आदर्श

अर्थशास्त्र

राहुल यांना टोमॅटो पिकासाठी मशागत ते अखेरची तोडणी व बाजारापर्यंतची वाहतूक यांची एकरी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येत होता. आता खर्च दीड ते पावणेदोन लाखपर्यंत कमी केला आहे. टोमॅटोचे एकरी सरासरी ४० टनांपर्यंत उत्पादन मिळते. प्रति किलो सरासरी १० ते १५ रुपये दराने चार ते साडे चार लाख रुपये होतात.

खर्च वजा जाता दोन लाख रुपये शिल्लक राहतात. पूर्वी वेगवेगळी पिके करत असताना नियोजन करताना अडचणी येत. आता बहुतांश शेती एक पीक पद्धतीवर आणली असल्याने नियोजन करणे सोपे होते. यंत्राने कामे वेगाने होतात. जमिनीची सुपीकता टिकविण्यासोबतच खर्चात बचतीसाठी सेंद्रिय घटकांचा वापर फायदेशीर ठरतो.

कुटुंबाची मदत कायम

वडील सुरेश व चुलते कुमार यांचे मार्गदर्शन, तर बंधू नितीन, जितेंद्र व अन्य कुटुंबीयांची शेतीत मदत होत असते. बाजारे कुटुंबाचे महामार्गालगत हॉटेल असून, तिथेही स्वतःच्या शेतावरील ताजा भाजीपाला प्रामुख्याने वापरला जातो. टोमॅटो पिकाचा आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा अभ्यास सातत्याने करत असतात.

राहुल बाजारे, ७०३८८८९६२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com