Grape Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farming: द्राक्ष बागांबाबत तज्ज्ञांनी सुचविल्या उपाययोजना

Nashik Vineyards: जिल्ह्यात मे मध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस २५० मिमीपेक्षा जास्त झाला आहे. परिणामी छाटणीपश्चात द्राक्ष बागा कीड-रोगांच्या विळख्यात सापडल्या आहेत.

मुकुंद पिंगळे

Nashik News: जिल्ह्यात मे मध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस २५० मिमीपेक्षा जास्त झाला आहे. परिणामी छाटणीपश्चात द्राक्ष बागा कीड-रोगांच्या विळख्यात सापडल्या आहेत. द्राक्षवेलींच्या सूक्ष्मघडनिर्मिती अवस्थेत अडचणी वाढल्या. या पार्श्‍वभूमीवर महराष्ट्र राज्य बागायतदार संघाच्या वतीने कोकणगाव (ता. निफाड) येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी (एनआरसी) द्राक्ष बागेची सध्याची स्थिती आणि उपाययोजनांसंबंधी मार्गदर्शन केले. त्यानुसार द्राक्षबागेत सूक्ष्मघडनिर्मिती होण्याकरिता पाण्यावर नियंत्रण, नत्राचा वापर पूर्णपणे बंद आणि वेलीस आवश्यक तो सूर्यप्रकाश उपलब्ध करून देणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

परंतु पावसामुळे बागेत फुटींची वाढ नियंत्रणात राहण्यापेक्षा जोमात सुरू झाली. यामुळे वेलीत सूक्ष्मघडनिर्मिती होणार नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्षबागायतदार अडचणीत असल्याचे दिसून येते. या पार्श्‍वभूमीवर प्रमुख शास्त्रज्ञ (उद्यानविद्या) डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी उपाययोजना सुचविल्या.

ते म्हणाले, शेंडा पिंचिंग करून घ्यावा. सोबतच काडीवर वाढत असलेल्या बगलफुटीसुद्धा त्वरित काढून घ्याव्यात. ओलांड्यावरील निघालेल्या प्रत्येक फूट तारेवर बांधून मोकळी कॅनोपी राहील, असे नियोजन करावे. वेलीची रोगप्रतिकारक्षमता वाढवण्याकरिता पोटॅशची पूर्तता फवारणीच्या माध्यमातून करावी.

यानंतरच्या कालावधीत वातावरण कोरडे राहण्याची जास्त संभावना असेल. अशावेळी भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कॅनोपी मोकळी असल्यास समस्या कमी राहतील. फवारणीचे कव्हरेजसुद्धा चांगले होईल. या वेळी कॅल्शिअम नायट्रेट किंवा कॅल्शिअम क्लोराईड २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी.

बागेत पोटॅशची फवारणी (३ ते ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) कॅनोपीचा विचार करून आवश्यक ठरेल. या वेळी वेलीमध्ये सायटोकायनिनचे प्रमाण फारच कमी झाल्यामुळे सायटोकायनिनयुक्त संजीवकाची फवारणी महत्त्वाची असेल. संजीवकांचा वापर व मात्रा यासाठी द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा.

वेलीची वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता पॅक्लोब्युट्राझोलची फवारणी काही शेतकरी करीत असल्याचे समजते. तथापी त्याची शिफारस द्राक्ष संशोधन केंद्राकडून केलेली नाही. वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदाशास्त्र) डॉ. अजय कुमार उपाध्याय यांनी सांगितले, की पाऊस संपल्यानंतर बोदावरील भाग कडक आणि हवा खेळती राहत नसल्यामुळे खालच्या भागात माती कडक झाली.

यामुळे मुळीचा विकास थांबला. वेलीची वाढ थांबल्याने बोद थोडाफार प्रमाणात मोकळे करून घ्यावे. जेणेकरून बोदावर तयार झालेला कडक आवरण बाहेर निघेल. त्या बोदामध्ये हवा खेळती राहून मुळी कार्य करण्यास सुरुवात होईल. याचबरोबर, वेलीला थोडाफार प्रमाणात पाणीसुद्धा देणे गरजेचे असेल.

बागेत पोटॅशची कमतरता झाली आणि त्याबरोबरच रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांची रोगप्रतिकारक्षमता कमी झाली. अशा जमिनीत काही महत्त्वाच्या उपाययोजना गरजेच्या असतील. कडक झालेल्या बोदावर खुरपीच्या साहाय्याने जवळपास २ इंच माती मोकळी करावी. मोकळ्या झालेल्या बोदावर काही वेळ पाणी द्यावे.

अन्नद्रव्यांच्या वापरासाठी एनआरसीमधील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. खतांचा वापर होत असलेल्या परिस्थितीस जमिनीत वाफसा राहील याची काळजी घ्यावी. पाण्याचा सामु लक्षात घेऊन गरजेनुसार फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करावा.

वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र) डॉ. सुजॉय साहा यांनी सांगितले, की द्राक्ष बागेत बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य करप्याचा संसर्ग दिसताच त्वरित रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. त्यानंतर कॉपर हायड्रॉक्साईडची फवारणी १.५ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात करावी.

भुरी व डाऊनीच्या नियंत्रणसाठी शिफारसीनुसार बुरशीनाशकांचा वापर करावा. द्राक्षबाग स्वच्छ ठेवणे आणि पानांच्या घनतेचे योग्य व्यवस्थापन करणे हेदेखील रोग नियंत्रणासाठी अत्यावश्यक असल्याचे शास्त्रज्ञांनी नमूद केले.

शेतकऱ्यांना मिळाला तांत्रिक सल्ला

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी शंका थेट तज्ज्ञांपुढे मांडल्या आणि तांत्रिक सल्ला देण्यात आला. या वेळी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख, मानद सचिव बबनराव भालेराव यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT