Grape Farming: आव्हाने पेलून जपली प्रयोगशीलता

Agriculture Development: शेतकऱ्यांनी अभ्यास करून व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर वाण बदल, संरक्षित शेती, अचूक हवामान अंदाजानुसार कामकाज, जैविक पद्धतीने व्यवस्थापन असे पर्याय स्वीकारले आहेत. त्यातूनच द्राक्ष शेती शाश्‍वत होण्यास मदत मिळत आहे.
Grape Farming
Grape Farming Agrowon
Published on
Updated on

Indian Agriculture Management : गेल्या पाच दशकांमध्ये नाशिक विभागात द्राक्ष शेती अधिक विस्तारली आहे. मात्र मागील १० वर्षांत अतिवृष्टी व अवेळी पावसाच्या तडाख्यात छाटणी ते काढणीदरम्यान सातत्याने नुकसान होत आहे. त्यामध्ये पोंगा अवस्थेत माल जिरणे, गळकुज, डाऊनी मिल्ड्यू, करपा रोग, तयार मण्यांवर काळे ठिपके पडणे, काढणीच्या अवस्थेतील मालाला तडे जाणे या प्रमुख समस्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांनी उपाययोजना व नवीन पर्याय शोधण्यावर भर दिला आहे.

क्रॉप कव्हर तंत्राचा अवलंब

अतिवृष्टी व अवेळी पावसाच्या तडाख्यातून द्राक्ष बागा वाचविण्यासाठी ‘क्रॉप कव्हर’ तंत्राचा वापर वाढत आहे. त्यातून पीक संरक्षित करण्यासह खर्च व श्रमात बचत साधून गुणवत्तावाढ मिळविण्यात यश येत आहे. एक एकर क्षेत्रात क्रॉप कव्हर वापरण्यासाठी सुमारे ४ लाख २५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र यातून माल वाचवून त्याला बाजारपेठेत किफायतशीर दर मिळवणे शक्य होत असल्याचे कोटबेल (ता. सटाणा) येथील शेतकरी अण्णा खैरनार सांगतात. मालेगाव तालुक्याच्या पूर्व भागात देखील बागा शेतकऱ्यांनी या पद्धतीनेच टिकवल्या आहेत. हवामानाला अनुकूल वाण व आपत्ती काळात क्रॉप कव्हरचा अवलंब करून उत्पादनात सातत्य राखले आहे, असे मथुरपाडे (ता. मालेगाव) येथील प्रयोगशील शेतकरी दीपक शिंदे यांनी सांगितले.

‘क्रॉप कव्हर’चे फायदे

पेस्टिंग, डीपिंग, बगल फूट आदी कामे चालू पावसात करणे शक्य.

जोराच्या पावसात वेलींवरील घडांचा संपूर्ण फुलोरा धुवून जाण्याचे प्रमाण कमी. त्यामुळे दर्जेदार फळधारणा.

६० टक्के फवारण्या कमी. त्यामुळे खर्चात ४० टक्के बचत.

एकूण फवारण्या कमी झाल्याने घडात रसायनांचे अवशेष कमी.

पावसामुळे द्राक्ष काढणीच्या अवस्थेत तडे जाण्याची समस्या शून्यावर.

Grape Farming
Grape Farming : द्राक्ष शेतीमध्ये प्लास्टिक कव्हरचा योग्य वापर

वेदर स्टेशन्ससह सेन्सर्सचा वापर

द्राक्ष बागेत माती, पाणी, पीक व्यवस्थापन आदींच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांची संकलित माहिती क्षेत्रनिहाय उपलब्ध होऊन शेती अधिक काटेकोर करण्यासाठी सेन्सर आधारित वेदर स्टेशनची मोठी मदत होते. त्यातूनच उत्पादन खर्च कमी करण्यासह अचूक व्यवस्थापन व गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादन घेणे शक्य होऊ लागले आहे. द्राक्षशेतीत अन्नद्रव्ये व कीडनाशकांवरील खर्च कमी करणे गरजेचे असते.

त्यादृष्टीने पीकवाढीच्या प्रत्येक अवस्थेत सर्वेक्षण व सिंचन नियंत्रण करताना वेदर स्टेशनसह विविध सेन्सर्स माती व बागांवर देखरेख करतात. या सेन्सरमुळे वाऱ्याचा वेग व दिशा, सूर्यकिरणांची तीव्रता, बाष्पीभवन, पर्जन्यमान, पानांवरील ओलावा, आर्द्रता, किमान व कमाल तापमान, मातीतील स्तरानुसार ओलावा व विद्युत वाहकता, मातीचे तापमान यांची अचूक माहिती थेट मोबाइलवर मिळते, असे प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी अनंत मोरे सांगतात.

वेदर स्टेशनसह सेन्सरचा वापर करून मिळालेली माहिती सर्व्हरवर साठविली जाते. ती मोबाइलवर पाहता येते. रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून उपग्रह प्रतिमा घेऊन बागेत अन्नद्रव्ये कमतरता,  सिंचन, बागेची वाढ यांचे आकलन करता येते. मोहाडी (ता. दिंडोरी) येथील प्रयोगशील शेतकरी सुदर्शन पाटील सांगतात, द्राक्ष हंगामाचे नियोजन करताना शेतात बसवलेल्या व्यक्तिगत हवामान केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध माहितीच्या आधारे अचूक निर्णय घेणे शक्य झाले आहे. वाफसा स्थिती तपासून सिंचन, हवामान बदलाच्या पूर्वसूचनेनुसार फवारणीचे नियोजन, कामकाजाच्या अचूक नोंदी होत असल्याने सकारात्मक फायदे होत आहेत. शिवाय नुकसान झाल्यास नकारात्मक बाजू समजून तुलनात्मक पडताळणी करता येते. उपलब्ध भांडवल आणि गुंतवणूक यातून स्वयंचलित सिंचन प्रणाली आणि माहिती विश्‍लेषण यासारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नव्या प्रणालीसह तंत्रज्ञानासाठी नवी पिढी आग्रही आहे.

Grape Farming
Sustainable Farming: शाश्‍वत शेती हीच पुढची दिशा

बाजाराभिमुख नव्या वाणांची नांदी

सध्या द्राक्ष पट्ट्यात असलेले अनेक वाण गुणवत्ता, खर्च या बाजूने स्पर्धात्मक नाहीत. त्यामुळे वाण बदल करताना अनेक शेतकऱ्यांनी रंगीत नॉन पेटंटेड व ‘क्रिमसन, रेड ग्लोब, फ्लेम’ अशा वाणांची लागवड केली आहे. त्यामधील काहींना स्थानिक व निर्यातीसाठी मागणी आहे. मात्र जागतिक स्तरावर स्पर्धात्मक वाणांची उपलब्धता काळाची गरज आहे. यासाठी १० वर्षांपूर्वी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने पुढाकार घेतला. हवामान अनुकूल, कमी उत्पादन खर्च, गुणवत्तापूर्ण उत्पादन व उत्पादकता या बाबी विचारात घेऊन सुरुवातीच्या टप्प्यात ‘आरा’ या पेटंटेड वाणाची उपलब्धता करण्यात आली.

आता आंतरराष्ट्रीय द्राक्ष पैदासकारांमार्फत ३५ पेटंटेड वाणांची उपलब्धता झाल्याचे समजते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी ‘ग्राफा, एसएनएफएल, इटुम, ब्लूमफ्रेश’ आदी जागतिक द्राक्ष पैदासकारांचे वाण सह्याद्रीसह इतर द्राक्ष उत्पादक व निर्यातदारांनी उपलब्ध केले आहेत. वाणांची लागवड ते विस्तार होताना संशोधन व विकास पातळ्यांवर कामकाज सुरू आहे. त्यानुसार भविष्यात नव्या वाणांचे उत्पादन वाढवून भारतीय द्राक्ष उत्पादक पुन्हा नव्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान निर्माण करतील, असे सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे सांगतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात सक्षम विक्री व्यवस्था

१९९० पासून जागतिक पातळीवर द्राक्ष निर्यात सुरू झाली. ‘यूके’मध्ये निर्यात सुरू झाल्यानंतर अनेक सुपर मार्केट व घाऊक विक्रेत्यांसोबत संपर्क होऊन संधींमध्ये वाढ होत गेली. यामध्ये अनेक चढ-उतार उत्पादक, निर्यातदारांनी अनुभवले. पुढील टप्प्यात ‘कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण’ (APEDA) यांच्या माध्यमातून ‘ग्रेपनेट’ प्रणालीत द्राक्ष उत्पादक नोंदणी करून उत्पादन घेतात. यात युरोपियन देशांसाठी रासायनिक कीटकनाशक अंश नियंत्रणाचे निकष पाळले जातात. यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने तयार केलेल्या प्रपत्र ५ नुसार शिफारशीत कीटकनाशकांचा वापर, कालावधी यांचे द्राक्ष उत्पादक अवलंब करत आहेत. देशात ४० हजारांहून अधिक शेतकरी ‘अपेडा’च्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीत नोंदणी करतात. त्यामुळेच नेदरलँड, यूके, संयुक्त अरब, रशिया आणि बांगलादेश या प्रमुख देशांत निर्यात होत आहे. यासह पूर्व आशियायी देशात नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

यांत्रिकीकरणातून कार्यक्षमता वाढ

द्राक्षशेतीमध्ये कुशल मजुरांची उपलब्धता व वाढलेली मजुरी ही मोठी समस्या आहे. वेळ व खर्च कमी करण्यासाठी सुधारित यांत्रिकीकरण बाहेरील देशातून आयात केले जात होते. त्यावर पर्याय देण्यासाठी द्राक्ष उत्पादक भारतीय अभियंत्यांनी स्थानिक द्राक्ष शेतीचा अभ्यास करत कार्यक्षम व परवडणारी गुणवत्तापूर्ण यंत्रे विकसित केली आहेत. त्यामुळे येत्या काळात विदेशी यांत्रिकीकरणावरील अवलंबित्व कमी होईल, असा विश्‍वास अभियंता प्रवीण मोगल यांनी व्यक्त केला.

जैविक पद्धतीचा अवलंब

द्राक्ष उत्पादनात पीक संरक्षणावर अधिक खर्च होतो. हा खर्च कमी करून निर्यातक्षम रेसिड्यू फ्री उत्पादन महत्त्वाचा मुद्दा आहे. याच धर्तीवर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडून गेल्या ५ वर्षांपासून ‘कीटकनाशकांच्या अवशेषांशी सुसंगत द्राक्ष उत्पादनासाठी रोग आणि किडीचे जैविक व्यवस्थापन’ या संबंधी प्रात्यक्षिक चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये निफाड व दिंडोरी तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले. या माध्यमातून ५० टक्के फवारण्या कमी झाल्याची काही उदाहरणे आहे. यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात रसायनांचे अवशेष अत्यंत कमी झाल्याचे प्रयोगशाळेतील तपासणी समोर आले आहेत.

कारसूळ (ता. निफाड) येथील द्राक्ष उत्पादक कैलास पगार यांनी सांगितले, द्राक्ष उत्पादनात रसायनांचा मर्यादित वापर करून प्रामुख्याने जैविक व्यवस्थापनाची पद्धत फायदेशीर ठरत आहे. यामुळे खर्च तर कमी झाला शिवाय गुणवत्तापूर्ण माल घेणे शक्य झाले. निर्यातक्षम मालामध्ये कीटकनाशकांचे अवशेष कमी आल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीवरून समोर आले आहे. फवारणीवरील ४० टक्क्यांपर्यंत खर्च कमी झाल्यामुळे उत्पन्न वाढीस चालना मिळाली आहे. जैविक खतांमध्ये पीएसबी, केएसबी ॲझोटोबॅक्‍टर, तर जैविक बुरशीनाशकांमध्ये स्युडोमोनास, बॅसिलस, ट्रायकोडर्मा यांचा वापर केला जातो.

अण्णा खैरनार ९७६३८७८०८२

कैलास पगार ७५८८६१७८९४

सुदर्शन पाटील ९९२३७०१०४६

(प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com