Soybean Disease : सोयाबीनवरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण

Soybean Disease Management : पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे पिकावर रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. या रोगाच्या नियंत्रणाकरिता खालील उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
Soybean Disease
Soybean DiseaseAgrowon
Published on
Updated on

प्रा. राजीव घावडे, प्रा. मंगेश दांडगे, प्रा. सतीश निचळ

Control of Soybean Fungal Disease : सध्या सोयाबीन हे पीक शेतामध्ये सर्वसाधारणपणे ६० ते ७० दिवसांच्या कालावधीचे झालेले दिसते. अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन पीक हे शेंगा लागणे ते शेंगा वाढीच्या अवस्थेमध्ये असेल. या सोयाबीन पिकाला अन्नद्रव्याची खूप आवश्यकता असते. मात्र मागील महिन्यापासून सतत पाऊस, ढगाळ वातावरण लागून राहिलेले होते. तर काही ठिकाणी काही काळ उष्ण वातावरण होते. अशा ठिकाणी दिवसाचे तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याचे दिसून आले. काही ठिकाणी वाढ झालेली आहे. असे अधिक तापमान आणि अधूनमधून पडणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे पिकावर रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. या रोगाच्या नियंत्रणाकरिता खालील उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट

लक्षणे : या रोगामध्ये प्रामुख्याने सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पानांवर हिरवे तपकरी ते लालसर तपकिरी डाग दिसतात. त्यानंतर पूर्ण पान तपकिरी होते. हा रोग पाने देठ शेंगावरपण दिसू शकतो. या रोगाचा अधिक प्रादुर्भाव असल्यास पानगळ होते. जवळच्या झाडांनाही या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. विशेषतः रोगग्रस्त पाने ही निरोगी पानांसोबत एकत्र मिसळतात किंवा बाजूच्या शेंगावर आणि खोडांना चिकटून राहतात, अशा ठिकाणी रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. अशा प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी पिकाची दाट लागवड टाळणे आवश्यक आहे.

हा रोग जास्त पाऊस किंवा दमट परिस्थिती असेल तर पानांवर बुरशीचे जाळे तयार होते. पाने आणि देठ यावर गडद तपकिरी रंगाचे डाग पडतात. या डागामध्ये स्लेरोशिया तयार होतो. या रोगाचे बीजाणू मातीत जिवंत राहतात. दमट आणि थंड २४ ते ३२ अंश सेल्सिअस उष्णतामान असेल तर रोगाचे प्रमाण जास्त वाढण्याची शक्यता असते.

Soybean Disease
Soybean Disease Management : सोयाबीनवरील तांबेरा, बुरशीजन्य ठिपके नियंत्रण

उपाययोजना : रायझोक्टोनिया एरियल ब्लाईटची लक्षणे दिसल्यानंतर फवारणी करावी. (प्रमाण प्रति लिटर पाणी)

पायरोक्लोस्ट्रोबिन (२० डब्ल्यूजी) १ ग्रॅम (३७५-५०० ग्रॅम / हेक्टरी) किंवा

फ्लक्सापायरोक्साइड (३३३ ग्रॅम एल/एफएस) ०.६० ग्रॅम (३०० मिलि / हेक्टर) किंवा

पायरोक्लोस्ट्रोबिन (१३.३ टक्के) अधिक एपोक्सिकोनॅझोल (५ टक्के एसई) (संयुक्त बुरशीनाशक) १.५ ग्रॅम (७५० मिलि / हेक्टर).

किडीचा प्रादुर्भाव

सध्या अनेक शेतकऱ्याकडून सोयाबीन पिकाला फुले व शेंगा कमी लागणे किंवा न लागण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यातील काही शेतकऱ्यांच्या शेताला प्रत्यक्ष भेट दिली असता सोयाबीनच्या झाडाला अत्यल्प प्रमाणात शेंगा दिसत होत्या. मात्र नव्याने गुच्छामध्ये फुले (दुसरा फुलोरा) उमलण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे दिसून आले. त्यामागे नेमके शास्त्रीय कारणे सामान्यतः पुढील प्रमाणे, हेलिकोवर्पा अळी व तंबाखूचे पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र सततच्या ढगाळ वातावरण आणि पाऊस स्थितीमुळे शेतकरी वेळीच फवारणी घेऊ शकले नाहीत. ज्यांनी घेतली त्यांना पावसामुळे तितकी परिणामकारकता मिळाली नाही. परिणामी या अळ्यांनी फुलोरा व बारीक शेंगा खालेल्या दिसतात. उत्पादनात लक्षणीय घट येऊ शकते. ही घट संपूर्णपणे टाळता येणार नसली तरी काही प्रमाणात भरून काढण्यासाठी पिकावर ००:५२:३४ या विद्राव्य खताची १०० ग्रॅम अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड II ५० मिलि अधिक इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ६ ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणे एक फवारणी तातडीने करून घ्यावी. (प्रादेशिक संशोधन केंद्राची तातडीची एकत्रित शिफारस.)

Soybean Disease
Soybean Pest Disease Management : पावसामुळे सोयाबीनवर येणाऱ्या कीड, रोगाचं नियंत्रण

पानावरील/ देठा /शेंगावरील करपा :

सद्यपरिस्थितीत पाऊस ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीन या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या रोगामध्ये प्रामुख्याने फांद्यावर, देठावर, पानावर व शेंगावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.

या रोगाची लक्षणे

खळग्यामध्ये पाने पिवळी पडून पानगळ आणि मर दिसून येते.

फांदी, देठ व त्याचप्रमाणे शेंगावर लालसर ते गडद करड्या रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके आढळून येतात.

प्रादुर्भावग्रस्त देठ हे मेंढपाळाच्या आकडा असलेला काठी सारखे दिसतात. त्यावर करड्या रंगाचे ठिपके दिसतात. त्यानंतर अकाली पानगळ दिसून येते.

त्यानंतरच्या काळात काळ्या रंगाची बुरशीफळे आणि त्यामध्ये काट्यासारखे अगदी लहान काटे प्रादुर्भावग्रस्त उतीच्या बाह्य पृष्ठभागावर दिसून येते. हा बुरशीजन्य रोग असून त्याचा प्राथमिक प्रसार हा रोगग्रस्त बियाण्यांमार्फत होतो. त्यामुळे शेंगावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असलेल्या पिकातील बियाणे पुढील वर्षी वापरू नये.

शेतकऱ्यांनी नियमित अंतराने पिकाची पाहणी करावी. प्राथमिक अवस्थेत रोग नियंत्रण करण्याकरता प्रतिबंधात्मक व त्याचप्रमाणे उपचारात्मक फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुढीलपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची त्वरित फवारणी घ्यावी. कारण अजून पिकाचा कालावधी पुढील २० ते २५ दिवसांच्या आहे.

रोगाची लक्षणे दिसल्यानंतर फवारणी (प्रति लिटर पाणी)

टेब्युकोनॅझोल (२५.९ ईसी) १.२५ मिलि (६२५ मिलि/हेक्टर) किंवा

टेब्युकोनॅझोल (१० टक्के) अधिक सल्फर (६५ टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम (१.२५ किलो/हेक्टर) किंवा

कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम (१.२५ किलो/हेक्टर).

(टीप : लेबल क्लेम आहेत.)

राजीव घावडे, ९४२०८४१४२१ सतीश निचळ, ९४२३४७३५५०

(सहायक प्राध्यापक, वनस्पती रोग शास्त्र, अखिल भारतीय समन्वयीत सोयाबीन संशोधन प्रकल्प, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com