Sugarcane Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Pest Management: उसावरील पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन

Sugarcane Whitefly Attack Control: पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खोडवा उसात अधिक प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे ऊस उत्पादनात तब्बल ८६% घट होत असून, साखरेच्या उताऱ्यावरही गंभीर परिणाम होतोय. योग्य वेळी नियंत्रणाचे उपाय न केल्यास ही कीड आर्थिकदृष्ट्या धोकादायक ठरते.

Team Agrowon

रवींद्र पालकर, शुभम पाटील, डॉ. अभयकुमार बागडे

Agri Awareness: पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव लागवडीच्या उसापेक्षा खोडवा उसात अधिक आढळतो. विशेषतः ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत प्रादुर्भावाचे प्रमाण वाढते. प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनात साधारणतः ८६ टक्क्यांपर्यंत घट आढळते, तर साखरेच्या उताऱ्यात ३ ते ४ युनिटने घट होते. त्यामुळे या किडीपासून ऊस पिकाचे वेळीच संरक्षण करणे गरजेचे आहे.

पूर्वी ऊस पिकावर दुय्यम समजल्या जाणाऱ्या पांढरी माशी व लोकरी मावा या किडी हळूहळू प्रमुख किडी बनताना दिसत आहे. पाणी साचलेल्या शेतांमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो, तर वाणानुसारही प्रादुर्भावात चढ-उतार जाणवतो. पांढऱ्या माशीमुळे उसाच्या उत्पादनात साधारणतः ८६ टक्क्यांपर्यंत घट आढळते, तर साखरेच्या उताऱ्यात ३ ते ४ युनिटने घट होते. त्यामुळे या किडीपासून पिकाचे वेळीच संरक्षण करणे गरजेचे आहे.

पांढरी माशी

शास्त्रीय नाव : अॅल्युरोलोबस बॅरोडेनसीस

ओळख : मादी किडीचा रंग फिकट पिवळसर असतो, तर तिच्या पंखाच्या जोड्या पांढऱ्या रंगाच्या असून पारदर्शक आणि मेणासारख्या चमकत असतात. मादी सहसा स्थिर राहते, फारशी हालचाल करत नाही. नर सतत एका पानावरून दुसऱ्या पानावर हालचाल करतो. अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले फिकट पिवळ्या रंगाची, चपटी आणि अंडाकृती आकाराची असतात. वाढीच्या टप्प्यावर ही पिले गडद रंगाची व चमकदार होत जातात व त्यांच्या कडेने पांढऱ्या रंगाचे सूक्ष्म तंतू दिसू लागतात. त्यानंतर संपूर्ण बाल्यावस्था पांढऱ्या चिकट मेणाद्वारे झाकली जाते. शेवटी कीड कोष अवस्थेत प्रवेश करते. कोष थोडासा मोठा, चपटा, अंडाकृती आणि करडा दिसतो. एकाच पानावर ५०० पेक्षा जास्त कोष असू शकतात. प्रौढ मादी कोषातून बाहेर पडण्यासाठी ‘टी’ आकाराचे सूक्ष्म छिद्र तयार करते.

जीवनचक्र

अंडी - प्रौढ मादी माशी कोषातून बाहेर आल्यानंतर सुमारे २४ ते ४८ तास सक्रिय राहते आणि उसाच्या पानांच्या खालील बाजूस अंडी घालते. ती सुमारे ६० ते ६५ अंडी समूहाच्या स्वरूपात घालते. प्रत्येक समूहात सुमारे १५ ते २० अंडी एकमेकांच्या जवळ, पानाच्या मध्य शिरेलगत समांतर पद्धतीने मांडलेली असतात. ही अंडी सूक्ष्म धाग्यांच्या साह्याने पानाला चिकटवलेली असतात. अंडी अवस्था ८ ते १० दिवसांची असते.

पिले - अंड्यांतून ८ ते १० दिवसांनी पिले बाहेर पडतात. पिले चार टप्प्यांत आपली वाढ पूर्ण करून सुमारे १५ ते ३० दिवसांत प्रौढ होतात.

कोषावस्था सुमारे १० ते ११ दिवस टिकते.

पूर्ण जीवनक्रम ५ ते ६ आठवड्यांत पूर्ण होतो. ही कीड वर्षभरात सुमारे ९ पिढ्या पूर्ण करते.

पांढरी माशी नियंत्रणासाठी,

उसाच्या शेतात पाणी साचल्यास त्वरित निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.

पावसाचा ताण पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ राहिल्यास पूरक सिंचनाची व्यवस्था करावी.

रासायनिक खते विशेषतः नत्रयुक्त खते शिफारशीनुसार आणि संतुलित प्रमाणात वापरणे आवश्यक आहे.

खोडवा उसात खतांचा वापर न केल्यास पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो, म्हणून खोडवा पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

पांढऱ्या माशीसाठी पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. त्यातही उसाची दुसरी व तिसऱ्या पानांवर तपासणी करावी. त्यावर अंड्यांचा अधिक प्रमाणात आढळून येत असल्यास अशी पाने तोडून नष्ट करावीत.

ऊस तोडणीनंतर उरलेल्या पीक अवशेषांवर पांढऱ्या माशीच्या अवस्था आढळल्यास त्याची विल्हेवाट लावावी.

ज्या उसामध्ये आधीच पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे, अशा उसाचा खोडवा घेणे टाळावे.

शेतात पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. हे सापळे वाऱ्याच्या दिशेने लावल्यास पांढऱ्या माशीचे प्रौढ कीटक त्याकडे आकर्षित होऊन चिकटतात, त्यामुळे शेतातील पांढऱ्या माश्यांची संख्या कमी होते.

निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१००० पीपीएम) ३ ते ५ मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. यासोबत लेकॅनीसिलियम लेकॅनी या मित्रबुरशीनजन्य कीटकनाशकाची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. क्रायसोपर्ला या परभक्षी मित्रकीटकांचे १००० प्रौढ किंवा २५०० अळ्या प्रति हेक्टर या प्रमाणात सोडाव्यात.

नुकसानीचे स्वरूप

प्रौढ व पिले उसाच्या पानांतील पेशीमधून रस शोषतात. पिल्ले प्रामुख्याने पानाच्या खालच्या बाजूस स्थिर राहून मोठ्या प्रमाणात रस शोषतात.

या किडीच्या शरीरातून चिकट मधासारखा स्राव बाहेर पडतो. तो पानावर पडून, त्यावर कॅप्नोडिअम नावाची काळसर बुरशी विकसित होते. परिणामी, उसाच्या श्‍वसन व प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर व गुलाबी पडतात, नंतर कोरडी पडून वाळून जातात.

पानांच्या खालच्या भागावर कोष तयार होऊन ती काळसर दिसू लागतात. याचा पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो व उत्पादनक्षमता लक्षणीयरीत्या घटते.

या किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनात साधारणतः ८६ टक्क्यांपर्यंत घट आढळते, तर साखरेच्या उताऱ्यात ३ ते ४ युनिटने घट होते. लागवडीच्या उसापेक्षा खोडवा उसात किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो. विशेषतः ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत प्रादुर्भावाचे प्रमाण वाढते. रुंद पानांचे व मऊ प्रकारातील वाणांमध्ये किडीचा प्रादुर्भाव अधिक तीव्रतेने जाणवतो.

सद्यःस्थितीत प्रादुर्भावाची कारणे

शेतामध्ये पाणी साचून राहणे जमिनीत व पिकाला पाण्याचा ताण पडणे.

नत्रयुक्त खतांचा असमतोल व अवेळी वापर.

किडीच्या प्रजननास पोषक वातावरण : प्रदीर्घ काळ हवेतील जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण व उष्ण हवामान. पावसाळ्यात जास्त प्रमाणात पावसाची उघडीप किंवा खंड पडणे. लागवडीसाठी रुंद पानांच्या वाणांची निवड. खोडव्याचे अयोग्य नियोजन.

-रवींद्र पालकर ८८८८४०६५२२

-शुभम पाटील ७०८३८३९५८९

(पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

-डॉ. अभयकुमार बागडे ९४२३२९७०२७,

(विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme: नव्या विहीरींसाठी राज्य सरकारकडून मिळणार ४ लाख अनुदान; शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

Agrowon Podcast: टोमॅटोच्या दरात तेजी; हिरवी मिरची टिकून, केळीला उठाव, कोथिंबीर नरमली तर तुरीचा बाजार दबावातच

Nashik Industrial Hub : उद्योजकांनी पर्यावरणपूरक,प्रदूषणमुक्त उद्योगांना प्राधान्य द्यावे

Lumpy Skin Disease : ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ मोहिमेसाठी समिती नियुक्त

Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; ओबीसी आरक्षणासह, नव्या प्रभागरचनेला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

SCROLL FOR NEXT