
डॉ. हर्षवर्धन मारकड, डॉ. रवींद्र जाधव
Agriculture Innovation: शेती परिसरातील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. हे सूक्ष्मजीवा, बुरशी पिकांना अन्नद्रव्याच्या शोषणापासून ते कीड-रोगांपासून संरक्षणात मोठी मदत करतात.
ट्रायकोडर्मा
पिकांवर पडणाऱ्या मर, मूळकुज, खोडकुज, कॉलररॉट, मुळावरील गाठी अशा विविध रोगांसाठी कारणीभूत असलेल्या विविध बुरशींना नियंत्रणात ठेवण्याचे काम ट्रायकोडर्मा करते. सामान्यतः फ्युजारिअम, पिथिअम, फायटोप्थोरा, रायझोक्टोनिया या बुरशींवर वाढणारी ट्रायकोडर्मा ही एक परोपजीवी बुरशी आहे. सामान्यतः ती जमिनीत सेंद्रिय पदार्थांवर मोठ्या प्रमाणात वाढते. वाढताना ती अन्य रोगकारक बुरशीचे धागे नष्ट करते. त्यांचे बीजाणू कमकुवत करते.
त्यामुळे त्यांची अंकुरण क्षमता कमी होऊन संभाव्य वाढ रोखली जाते. ट्रायकोडर्मा बुरशी तयार करत असलेली व्हीरीडीन आणि ग्लायटॉक्झीन ही प्रतिजैविके रोगकारक बुरशींचा नाश करतात. ट्रायकोडर्मा बुरशीच्या अनेक प्रजाती असल्या तरी त्यापैकी ट्रायकोडर्मा हरजीएनम व ट्रायकोडर्मा व्हीरीडी या दोन प्रजातींचा वापर शेतीमध्ये रोग नियंत्रणाच्या प्रामुख्याने केला जातो. आपण त्यांची बीजप्रक्रिया, मातीप्रक्रिया, आळवणी, फवारणी किंवा द्रावणात रोपे बुडवणे अशा अनेक प्रकारे वापर करता येतो.
मायकोरायझा
वनस्पतीच्या मुळांवर वाढणारी आणि डोळ्यांना स्पष्ट दिसणारी बुरशी म्हणजे मायकोरायझा. ग्लोमेरोमायकोटा गटातील ग्लोमस, गिगास्पोरा, अक्युलोस्पोरा, स्लेरोसिस्ट आणि स्कटेलोस्पोरा या वर्गातील बुरशी प्रामुख्याने पिकांच्या मुळांवर आणि थोड्या आतपर्यंत वाढतात. त्या पिकाकडून शर्करा आणि अन्नरस मिळवतात. त्या बदल्यात पिकांस अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात. या वर्गातील बुरशींना व्हॅस्क्युलर अर्ब्युस्कुलर मायकोरायझा म्हणजेच व्हॅम (VAM) असेही म्हणतात.
पिकाच्या मुळांत असलेल्या पेशींच्या पेशीभित्तिकेच्या आत वाढतात. त्या ठिकाणी या बुरशी काहीशा फुग्याच्या आकारात वाढतात, तर काही वेळेस अनेक फांद्या, उपफांद्या असल्यासारखी वाढ करतात. त्या पेशीतील अन्नरस आणि बुरशीद्वारे जमिनीतून शोषून घेतलेला रस, स्फुरद व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची देवाणघेवाण करतात. या बुरशींच्या मायसेलियममधून ग्लोमॅलिन हे एक ग्लायकोप्रोटिन स्रवले जाते.
ते जमिनीतील सर्वात मोठा कार्बन स्रोत म्हणून कार्य करते. बुरशी आणि मुळांच्या अशा एकत्र वाढल्याने मुळांना जमिनीतील अन्नद्रव्ये प्रामुख्याने फॉस्फरसचा पुरवठा मुबलक होतो. माईकोरायझा बुरशीजन्य तंतूचे जाळे तयार करून हे सूक्ष्मतंतू जमिनीत वाढतात. ती अधिक प्रमाणात पोषक द्रव्यांचे शोषण करून मुळांना पुरवतात. सहजीवी पद्धतीने अतिरिक्त पाणी आणि पोषक द्रव्य वनस्पतींना पुरवण्यासोबत मायकोरायझा वनस्पतींची प्रतिकारशक्ती आणि आरोग्यासाठी मोलाचे योगदान देते.
मेटारायझिम ॲनिसोप्ली
ही उपयुक्त बुरशी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या हानिकारक किडींवर स्वतःची वाढ करून घेते. या बुरशीचे बीजाणू कीटकाच्या शरीराच्या पृष्ठभागावर चिटकून वाढतात. जास्त वाढ झाल्यानंतर ते कीटकांच्या शरीरात घुसून त्यांना मारून टाकतात. त्यामुळे कीड नियंत्रणात राहण्यास मदत होते. उदा. हुमणी अळी, मावा, तुडतुडे इ. या बुरशीचा वापर फवारणी, आळवणी किंवा सेंद्रिय पदार्थांसोबत मिसळून करता येतो.
बिव्हेरिया बॅसियाना
ही प्रामुख्याने रसशोषक कीडींवर जगणारी बुरशी आहे. रसशोषक किडीच्या त्वचेवर आपल्या बीजाणूची वाढ करते. हे बीजाणू अंकुरीत होऊन संपूर्ण शरीरभर पसतात. त्यामुळे मावा, भुंगे, तुडतुडे, पाने खाणाऱ्या कीडी आटोक्यात राहण्यास मदत होते.
- डॉ. हर्षवर्धन मारकड, ९६६५६१७८०४
(सहायक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकूल, काष्टी, मालेगाव)
- डॉ. रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१
(सहायक प्राध्यापक, मृदाशास्त्र विभाग, शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जि. जळगाव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.