Sugarcane Pest Management : उसावरील लोकरी माव्याचे एकात्मिक व्यवस्थापन

राज्यात सांगली येथे जुलै, २००२ मध्ये प्रथम आढळून आलेला लोकरी मावा बहुतांश सर्व ऊस उत्पादक पट्ट्यामध्ये पसरला आहे. राज्यात ८ ते ९ महिने या किडीसाठी पोषक वातावरण असल्याने प्रसार वाढतच चालला आहे. त्यामुळे वेळीच व्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे.
Sugarcane Milly Bug Pest
Sugarcane Milly Bug PestAgrowon
Published on
Updated on

डॉ. भरत रासकर, डॉ. शालीग्राम गांगुर्डे

पांढरा लोकरी मावा किडीचा (Milly Bug Pest) प्रामुख्याने सांगली जिल्ह्यात जुलै, २००२ मध्ये प्रथम प्रादुर्भाव आढळून आला. त्यानंतर कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर व नगर या जिल्ह्यांत झपाट्याने प्रसार होत गेला. तेव्हापासून आजपर्यंत या किडीचा उसावर (Sugarcane Pest Management) कमी-अधिक प्रमाणात वेगवेगळ्या हवामानानुसार प्रादुर्भाव आढळून येत आहे.

चालू वर्षी मराठवाडा विभागात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला. ही कीड ऊस पिकाच्या पानातील रस शोषून घेते. अनुकूल परिस्थितीमध्ये किडीची वाढ व प्रसार झपाट्याने होते. किडीच्या बंदोबस्तासाठी वेळीच योग्य उपाययोजना करणे आवश्यक असते.

किडीची ओळख ः

मावा किडीचे पंखी व बिनपंखी असे दोन प्रकार आढळतात.

उसाच्या पानाच्या खालील बाजूने मध्य शिरेलगत पांढऱ्या लोकरीसारखा तंतुधारी बिनपंखी मावा जास्त प्रमाणात आढळतो. बिनपंखी माव्याची मादी पांढरट व पिल्ले फिक्कट पिवळसर असतात.

पंखी मावा काळपट रंगाचा असतो. त्याची मादी काळसर तर पिल्ले फिक्कट हिरवट रंगाची असतात.

किडीचे मुख्यांग सुईसारखे असते. पिल्लाच्या शरीरावर एक आठवड्यानंतर पांढऱ्या लोकरीसारखे मेण तंतू येऊन संपूर्ण शरीर पांढरे दिसते.

Sugarcane Milly Bug Pest
Sugarcane : जालना जिल्ह्यात यंदाही अतिरिक्त उसाचा प्रश्न

अनुकूल हवामान ः

मावा किडीला महाराष्ट्रात सलग ८ ते ९ महिने अनुकूल हवामान मिळते. जूनपासून ते मार्च महिन्यापर्यंत तापमान १६ ते ३५ अंश सेल्सिअस या दरम्यान असते.

किडीच्या वाढीसाठी व प्रसारासाठी ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, ७० ते ९५ टक्क्यांपेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता हे हवामान घटक अनुकूल ठरतात.

राज्यात असे हवामान साधारणतः जून महिन्यापासून निर्माण होते. त्यामुळे किडीच्या अनेक पिढ्या होऊन किडीची संख्या झपाट्याने वाढते. परिणामी, संपूर्ण पीक किडीला बळी पडते. हिवाळ्यातही किडीचा प्रादुर्भाव टिकून राहतो.

सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यातील हवामान किडीसाठी जास्त पोषक असल्याने प्रादुर्भाव वाढतो.

मात्र, उन्हाळ्यातील हवामान किडीसाठी तितके पोषक ठरत नाही. त्यामुळे अत्यल्प प्रादुर्भाव दिसून येतो. कारण उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असते.

को. ८६०३२, कोसी. ६७१, को.८०१४, को. ७५२७, कोएम.७१२५, को. ४१९, को. ७५२७ इ. जातींवर अनुकूल हवामानात किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. कोएम ०२६५ या जातीवर इतर जातींच्या तुलनेत कमी प्रादुर्भाव आढळतो.

Sugarcane Milly Bug Pest
Excess Sugarcane : यंदाही अतिरिक्त उसाचा प्रश्न ?

प्रसार ः

किडीचा प्रसार पंखी माश्‍या, वारा, मुंग्या, कीडग्रस्त पाने, वाढे किंवा बेणे याद्वारे होतो. ही कीड बांबू, हराळी इत्यादी यजमान वनस्पतींवर उपजीविका करते.

नुकसान ः

पिले व प्रौढ पानाखाली राहून अणकुचीदार सोंडेने पानांतील अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पाने निस्तेज दिसू लागतात. पानाच्या कडा सुकतात व पाने वाळू लागतात.

Sugarcane Milly Bug Pest
Sugarcane Farming : ऊस शेती प्रशिक्षणाला २० डिसेंबरपासून सुरुवात

कीड पानातील अन्नरस शोषताना पानांवर मधासारखा चिकट पदार्थ स्त्रवते. त्या ठिकाणी काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते. परिणामी, संपूर्ण पान काळे पडते.

जास्त प्रादुर्भावामध्ये पानांची लांबी व रुंदी कमी होऊन उसाची वाढ खुंटते. असा ऊस कमकुवत होतो.

किडीच्या प्रादुर्भावामुळे ऊस उत्पादनात साधारणपणे १० ते २० टक्के, तर साखर उताऱ्यात ०.५ ते २० युनिटने घट होते.

जीवनक्रम

या किडीमध्ये नर नसतात. मादी नरांच्या समागमाशिवाय पुनरुत्पत्ती करू शकते.

पिल्ले साधारण ४ वेळा कात टाकून प्रौढ होतात.

मावा पिलावस्था जीवनक्रम प्रजनन क्षमता (प्रति मादी)

पंखी मावा ३२ ते ४० दिवस ४० ते ५० दिवस ४० ते ५० पिले

बिनपंखी मावा २३-४२ दिवस ५३-७८ दिवस ४० ते ६० पिले

व्यवस्थापन ः

किडीच्या योग्य नियंत्रणासाठी पूर्वमशागतीपासून उपाययोजना करणे आवश्यक आहे.

प्रतिबंधात्मक उपाय ः

मावा किडीच्या प्रसाराचा वेग जास्त असतो. त्यामुळे पिकाची दर आठ दिवसांनी नियमित पाहणी करावी.

पट्टा किंवा रुंद सरी पद्धतीने ४ ते ६ फुटांवर उसाची लागण करावी. जेणेकरून दोन सऱ्यांमध्ये सूर्यप्रकाश व हवा जास्त प्रमाणात खेळती राहून शेतातील आर्द्रता कमी होते. पट्टा पद्धतीमुळे पीक संरक्षणासाठी उपाययोजना करणे सोईस्कर होते.

शेताच्या चारही बाजूंनी मक्याच्या २ ओळी व चवळीच्या २ ओळी लावाव्यात. तसेच पिकामध्ये तुरळक मका टोकावी. त्यामुळे लोकरी माव्यावर जगणाऱ्या परभक्षी व परोपजीवी कीटकांची वाढ होते.

मावाग्रस्त शेतातील उसाची पाने दुसऱ्या शेतात नेऊ नयेत. कीडग्रस्त पाने तोडून अलगद गोळा करावीत व जाळून टाकावीत. कीडग्रस्त पाने तोडताना शेंड्याकडील कमीत कमी सात पाने ठेवावीत.

ऊसतोडणीनंतर शेतातील उसाची पाने व इतर अवशेष जाळून नष्ट करावेत. जास्त प्रादुर्भाव असलेल्या उसाचा खोडवा घेऊ नये. कीडग्रस्त ऊस बेण्यासाठी वापरू नये. वाढे वाहतूक करू नये.

उसाची लागण करण्यापूर्वी बेणेप्रक्रिया करावी.

पिकास आवश्यक तितकेच सिंचन करावे. जास्त पाणी दिल्यास शेतामध्ये आर्द्रता वाढून किडीला पोषक वातावरण तयार होते.

रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. नत्रयुक्त खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

जैविक नियंत्रण ः

डिफा ऑफिडीव्होरा, लेडी बर्ड बीटल, मायक्रोमस, क्रायसोपा व सिरफीड माशी या परभक्षी कीटकांच्या अळ्या उसावरील लोकरी मावा खातात. मित्रकीटकांच्या अळ्या शेतामध्ये दिसून आल्यास मावा किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी करणे टाळावे.

डिफा ऑफिडीव्होरा किंवा कोनोबाथ्रा ॲफिडीव्होरा हेक्टरी १००० अळ्या किंवा मायक्रोमस २५०० अळ्या या मित्रकीटकांची अंडी १५ दिवसांच्या अंतराने ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान सोडावीत.

डिफा ऑफिडोव्हारा या परभक्षी कीटकांच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी ५ बाय ५ बाय ४ मीटर आकाराचे बांबूचे छायागृह उभारावे. त्यासाठी ५० टक्के हिरव्या रंगाची शेडनेट वापरून ७ महिन्यांचा ऊस पिकावर आच्छादन करावे. या शेडनेट (छायागृह)मध्ये लोकरी माव्याची ७५ टक्के वाढ झाल्यानंतर डिफा ॲफिडोव्होराच्या १०० अळ्या किंवा कोष सोडावेत. त्यानंतर साधारणतः २ महिन्यांत या परभक्षी कीटकांच्या १ हेक्टर क्षेत्रासाठी पुरेशा अळ्या (२६८७) किंवा कोष उपलब्ध होतात.

मित्रकीटक शेतामध्ये प्रसारित केल्यानंतर किमान ३ ते ४ आठवड्यांपर्यंत रासायनिक फवारणी टाळावी.

- डॉ. शालीग्राम गांगुर्डे, ९४०३१८९१०२

(कीटकशास्त्रज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com