Grape Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farming Management : पाऊस, गारपीटग्रस्त बागेचे व्यवस्थापन

Grape Farming Issue : मागील ३ ते ४ वर्षांपासून परतीचा पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष लागवड पट्ट्यामध्ये वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेतील बागांमध्ये जास्त नुकसान होताना दिसत आहे.

Team Agrowon

डॉ. प्रशांत निकुंभे, डॉ. निशांत देशमुख, डॉ. कौशिक बॅनर्जी

Grape Orchard Protection from Rain, Hail Damage : मागील ३ ते ४ वर्षांपासून परतीचा पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष लागवड पट्ट्यामध्ये वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेतील बागांमध्ये जास्त नुकसान होताना दिसत आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे वेलींचे ओलांडे, काड्या, पाने आणि मण्यांना मोठ्या प्रमाणात इजा होते.

चालू फळछाटणी हंगामातही सांगली जिल्ह्यातील तासगाव भागात जास्त पाऊस व गारपीट झाली. सद्यःस्थितीत फळ छाटणी हंगामानुसार तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये असलेल्या द्राक्ष बागांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आगामी काळात अशी स्थिती उद्‌भवल्यास पुढील उपाययोजना उपयुक्त ठरतील.

छाटणी न केलेल्या बागेचे नियोजन

काही बागा ३० ते ४० टक्के छाटणी न केलेल्या अवस्थेत आहेत. जोरदार पावसासह गारपिटीमुळे या बागेतील वरील कॅनॉपी खराब झालेली आहे. शिवाय, काही द्राक्षांच्या काड्या देखील तुटल्या आहेत. काही ठिकाणी काड्यांवर नवीन फुटवे येत आहेत. अशा बागेचे खालीलप्रमाणे व्यवस्थापन करावे.

काड्या परिपक्व झाल्या असल्यास, शक्य तितक्या लवकर ऑक्टोबर फळछाटणी करावी.

जर काड्या परिपक्व नसतील, तर पानांवर पोटॅशिअम सल्फेट १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी.

बागेमध्ये जमिनीत वाफसा स्थिती येईपर्यंत सिंचन किंवा फर्टिगेशन बंद करावे.

ट्रायकोडर्मा अ‍ॅस्परेलॉइड्स किंवा ट्रायकोडर्मा अ‍ॅस्परेल्लम किंवा बॅसिलस सबटिलीस २ ग्रॅम प्रति लिटर किंवा २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

काडीवर खोल जखम असेल, तर रोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंतर प्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करावी.

बागेतील अतिरिक्त पाण्याचे व्यवस्थापन

जास्त पावसाच्या स्थितीत बागेत पाणी साचल्यामुळे वेलीमधील पाण्याचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे घड जिरण्याचे प्रमाण वाढते. हे टाळण्यासाठी बागेतील अतिरिक्त पाणी वेळीच बागेबाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी बागेतील वेलीच्या ओळींमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस सेंमी रुंदीची आणि १० ते १५ सेंमी खोलीची एक चारी घ्यावी. उताराच्या दिशेने घेतलेल्या चारीमुळे पावसाचे अतिरिक्त साचलेले पाणी बागेबाहेर निघून जाते. पाऊस कमी झाल्यावर जमिनीच्या प्रतिनुसार तीन ते चार दिवसात वाफसा आल्यास वेलीची मुळे पुन्हा सक्रिय होतील.

छाटणी केलेल्या बागेचे नियोजन

छाटणीनंतर ५ ते ८ दिवस

सुमारे ४० ते ५० टक्के द्राक्षबागा या कळी फुटण्याच्या अवस्थेत (छाटणीनंतर ५ ते ८ दिवस) आहेत. या बागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. शिवाय काही द्राक्षांच्या वेलींच्या काड्या तुटल्या आहेत. तसेच घड जिरण्याची स्थिती उद्भवत आहे. अशा परिस्थितीत खालील उपाय करता येतील.

व्यवस्थापन

सुकलेल्या आणि तुटलेल्या काड्या काढून टाकाव्यात.

बागेतील जमीन वाफसा स्थितीत येईपर्यंत सिंचन किंवा फर्टिगेशन करणे टाळावे.

कळी फुटण्याच्या अवस्थेत ६ बीए (१० पीपीएम) अधिक सीपीपीयू (१ पीपीएम)ची फवारणी करावी.

ट्रायकोडर्मा अ‍ॅस्परेलॉइड्स किंवा ट्रायकोडर्मा अ‍ॅस्परेल्लम किंवा बॅसिलस सबटिलीस २ ग्रॅम प्रति लिटर किंवा २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

पानांवर पोटॅश १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

परिशिष्ट-५ मध्ये नमूद केलेल्या मात्रेनुसार सीसीसी (क्लोरमेक्वाट क्लोराईड) ची फवारणी करता येऊ शकते.

काडीला खोल जखम झाली असेल, तर रोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंतर प्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी.

छाटणीनंतर २० ते २५ दिवस

सध्या द्राक्षघड प्रीब्लूम (५ ते ७ पाने) (छाटणीनंतर २० ते २५ दिवस) अवस्थेत १० ते २० टक्के बागा आहेत. जोरदार पावसासह गारपिटीमुळे या बागेतील काड्यांना जखमा झाल्या आहेत, नवीन फूट आणि पाने तुटलेली व फाटलेली आहेत. तसेच बागांमध्ये ५० टक्के पर्यंत घड जिरण्याची समस्या दिसत आहे.

व्यवस्थापन

बागेतील जमीन वाफसा स्थितीत येईपर्यंत सिंचन किंवा फर्टिगेशन करणे टाळावे.

सुकलेल्या, तुटलेल्या काड्या आणि पाने काढून टाकावीत.

अतिरिक्त जीए देणे टाळावे.

ट्रायकोडर्मा अ‍ॅस्परेलॉइड्स किंवा ट्रायकोडर्मा अ‍ॅस्परेल्लम किंवा बॅसिलस सबटिलीस २ ग्रॅम प्रति लिटर किंवा २ मिलि प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी.

कायटोसॅन २ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून २ ते ३ फवारण्या कराव्यात.

जर काड्या परिपक्व नसतील, तर पानांवर पोटॅशिअम सल्फेट १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

काड्यांना खोल जखमा झाल्या असतील, तर रोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करावी.

(टीप : संपूर्ण संरक्षणासाठी, कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ते १.२ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे १० दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.

प्लॅस्टिक किंवा नेट आच्छादनाचा वापर

तापमानात होणारा बदल, पर्जन्यवृष्टी आणि अवेळी पाऊस, गारपीट, दव इत्यादी हवामान बदलाच्या घटनांमुळे द्राक्षाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादन प्रभावीपणे मदत करू शकते. लागवडीखालील क्षेत्र वाढल्याने छाटणीच्या तारखांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्याद्वारे बाजारपेठेत एकाच वेळी वाढणारी द्राक्षाची आवक मर्यादेत ठेवता येईल. त्याचा बाजारभावातील घसरण रोखण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

बदलत्या हवामान परिस्थितीत प्लॅस्टिक आच्छादन (क्रॉप कव्हर) तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या अनुभवावरून दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अवेळी पाऊस असेल तर द्राक्ष बागेचे नुकसान टाळण्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिकचा किंवा नेटचा सुद्धा वापर करता येईल. पाऊस थांबल्यानंतर हे नेट काढून भविष्यात अवेळी पाऊस आणि गारपिटीपासून द्राक्ष बागेचे संरक्षण करता येईल.

डॉ. प्रशांत निकुंभे, ७०७३००६५६४ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT