Pest Management Agrowon
ॲग्रो विशेष

Brinjal Crop Management : वांगी पिकावरील किडींचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. योगेश मात्रे, डॉ. अनंत लाड

फळभाजीपाला पिकातील वांगी हे पीक महत्त्वाचे पीक म्हणून ओळखले आहे. तिन्ही हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या या पिकांमध्ये सर्वात जास्त दर्जा व उत्पादनातील घट किडींच्या प्रादुर्भावामुळे येते. किडींचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

शेंडा व फळे पोखरणारी अळी

वांग्यावरील ही कीड अत्यंत नुकसानकारक असून, या किडीच्या अळ्या पानाच्या देठातून पोखरून आत शिरतात. देठाचा आतील भाग गोल काप देऊन खातात, त्यामुळे पान मलूल होते. त्याच प्रकारे झाडाचे कोवळे शेंडेसुद्धा पोखरली जातात. त्यामुळे शेंडे मलूल होऊन खाली झुकलेले दिसतात. याच अळ्या पुढे फुले व फळेपण पोखरतात.

एक अळी ४ ते ६ फळांचे नुकसान करते. पतंग आकाराने लहान व सुंदर असतो. त्याचे पंख स्वच्छ पांढरे असून त्यावर गुलाबी ठिपके असतात, त्यामुळे ही कीड ओळखण्यास सोपी असते. या किडीच्या अळ्या गुलाबी छटांच्या असतात.

यांनी आत घुसताना केलेले छिद्र फार लहान असते, परंतु फळात आत शिरल्यानंतर आतील बराच भाग पोखरून फळ खाण्यास अयोग्य करते. शेंड्यात अथवा फळात शिरलेल्या अळ्या बाहेर येऊन दुसऱ्या शेंड्यात अथवा फळात जातात. मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.

पान पोखरणारी अळी

या किडीची अळी पानावरच्या शिरा, मुख्य शीर, पानाचे देठ आणि कोवळे शेंडे पोखरते आणि आतील पेशी खाते. परिणामतः: कीडग्रस्त भागावर गाठीसारखा आकार येतो. पोखरलेला भाग अळीच्या विष्ठेने भरला जातो. कीडग्रस्त पाने व शेंडे वाळतात.

पांढरी माशी

या किडीचे पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने पिवळी पडतात प्रौढ किटकांच्या शरीरातून गोड चिकट द्रव पदार्थ बाहेर पडतो. या द्रवावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर बाधा येते. पाने पिवळी होऊन परिणामी झाडाची वाढ खुंटते. उत्पादनावर परिणाम होतो.

ठिपक्याचे भुंगेरे

ही कीड वांगी पिकावरील महत्त्वाची नुकसानकारक कीड आहे. ही कीड झाडाच्या पानातील हरितद्रव्य खाते. पानाची चाळणी करते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते.

खोडकिडा

ही वांग्यावरील कमी महत्त्वाची समजली जाणारी कीड असली तरी कधी कधी तिचे प्रमाण वाढून ती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. या किडीचा पतंग मध्यम आकाराचा व पोटाचा भाग फिक्कट पिवळसर रंगाचा असतो. डोके आणि धड भुरकट रंगाचे असतात. समोरील पंख पिवळसर तर मागील पंख पांढुरक्या रंगाचे असतात.

पंखाचा विस्तार ३२ मिमी..मि. असतो. या किडीची अळी फक्त मुख्य खोड पोखरून त्यातील आतील भाग खात असते. त्यामुळे झाड प्रथम कोमेजते व नंतर वाळून जाते. ही कीड मार्च ते ऑक्टोंबर महिन्यात कार्यक्षम असते. अळी हिवाळ्यात झाडाच्या खोडात सुप्त अवस्थेत जाते.

व्यवस्थापन

जमिनीची खोल नांगरट केल्यास किडींच्या जमिनीतील सुप्तावस्था उन्हामुळे व पक्षी खाऊन नष्ट होतील.

प्रादुर्भावग्रस्त पाने, शेंडा, फळे गोळा करून नष्ट करावी.

पाने खाणाऱ्या भुंग्याचे अंडीपुंज, अळ्या जमा करून त्याचा बंदोबस्त करावा.

पांढऱ्या माशीसाठी पिवळे चिकट सापळे हेक्टरी १० प्रमाणात लावावेत.

ढालकिडे, सिरफिड, कोळी, भक्षक ढेकूण इत्यादी परभक्षी व इतर परोपजीवी किटकांचे संवर्धन करावे.

क्रायसोपाच्या अळ्या २ प्रति झाड रसशोषण करणाऱ्या किडीसाठी सोडावे.

प्रकाश सापळ्यांचा उपयोग करावा. ॲझाडिरॅक्टीन १० हजार पीपीएम २० मिली.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास रसशोषण करणाऱ्या किडींचे व शेंडा व फळे पोखरणा­या अळीचे नियंत्रण होईल.

किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच लेबलक्लेम नुसार खालील रासायनिक कीटकनाशकांचा आलटून पालटून वापर करावा. (प्रमाण : प्रति लिटर पाणी.)

शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळी

इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा

लॅंबडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी)०.६ मिली किंवा

स्पिनोसॅड (४५ एससी)०.३२ मिली किंवा

क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०. ४ मिली.

रसशोषक किडी (पांढरी माशी)

पायरीप्रोक्सिफेन (५ टक्के) अधिक फेनप्रोपाथ्रिन (१५ टक्के ईसी) (संयुक्त कीडनाशक) १ मिली किंवा

थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी) ०.४ ग्रॅम किंवा

डायफेन्थुरॉन (५० डब्लुपी) १.२ ग्रॅम किंवा

पायरीप्रोक्झीफेन (१० ईसी) १.६ मिली.

लाल कोळी

डायकोफॉल (१८.५ ईसी) २.७‍ मिली किंवा

स्पायरोमेसीफेन (२२.९ एससी) ०.८ मिली

वरील कीटकनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठीचे आहे.

(कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

- डॉ. योगेश मात्रे, (संशोधन सहयोगी), ७३८७५२१९५७,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT