Brinjal Farming : राणे बंधूंची भरीत वांगी सर्वदूर प्रसिद्ध

Brinjal Cultivation : जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव येथील नाना ऊर्फ ज्ञानेश्‍वर व धनराज या राणे यांच्या कुटुंबाने ३५ वर्षांहून अधिक काळापासून भरीत वांग्याचे पीक व बियाणे यांची जोपासना केली आहे.
Brinjal Farming
Brinjal FarmingAgrowon

Story of Brinjal Farming : जळगाव जिल्ह्यात भुसावळ या तालुका ठिकाणापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर पिंपळगाव आहे. गावाला नदीचा मोठा स्रोत नाही. कमी पाऊस व दुष्काळी स्थितीचा शेतकऱ्यांना फटका बसतो. भाजीपाला उत्पादनात हे गाव आघाडीवर आहे. गावातील नाना ऊर्फ ज्ञानेश्‍वर व धनराज यांनीही भाजीपाला उत्पादनात नाव मिळवले आहे. वडील प्रल्हाद यांच्याकडून त्यांनी शेतीचे धडे गिरविले.

दोघांचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण झाले आहे. नाना यांनी पुण्यात पाइप उत्पादक कंपनीत काम केले. परंतु नोकरीपेक्षा शेतीची ओढ त्यांना पुन्हा गावी घेऊन आली. शेती ४० एकर असून दोघा बंधूंनी व्यवस्थापनातील जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. तीन विहिरी, तीन कूपनलिका आहेत. परंतु सात ते आठच महिने पाणी त्यात असते. उन्हाळ्यात जलसंकट तयार होते. यामुळे पावसाळ्यातील तसेच उन्हाळा सुरू होण्यापूर्वीची पिके घेण्यावर भर असतो.

भरीत वांग्याचे जतन केलेले पीक

भरताचे वांगे हे राणे यांचे मुख्य पीक आहे. सुमारे ३५ वर्षांहून अधिक किंवा आजोबांच्या काळापासून त्यांनी अनेक संकटांमधून हे पीक त्यांनी मोठ्या कष्टाने जोपासले आहे. दरवर्षी मेअखेर ते जूनचा पहिला आठवडा, जून व जुलै अशी तीन टप्प्यांत त्याची लागवड होते. फेब्रुवारीत दर्जेदार पिवळी झालेली वांगी तोडून त्यातून बिया काढल्या जातात. त्या घरात पत्री डब्यात साठविल्या जातात. पुढे रोपवाटिकेत रोपे तयार केली जातात. हे चक्र वर्षानुवर्षे सुरू आहे. गोलाकार व लांबट अशा दोन प्रकारच्या वांग्यांचे बियाणे अनेक वर्षांपासून अशा प्रकारे राणे यांनी जतन केले आहे. दरवर्षी सुमारे अडीच एकरांत लागवड असते. त्यासाठी फेरपालट केलेल्या जमिनीची निवड केली जाते.

Brinjal Farming
Sugar Factory Maharashtra : समन्वय साधून तातडीने कारखाने सुरू करावेत

उत्पादन

लागवडीनंतर साधारण अडीच महिन्यांनी तोडणी सुरू होते. ती पुढे तीन- चार महिने चालते. दर आठवड्याला तोडणी असते. प्रत्येक तोडणीला एकरी ५० पन्नी माल मिळतो. प्रति पन्नी २० किलोची असते. एकूण हंगामात सुमारे १२ ते १३ तोडण्या होतात. त्यासाठी मजुरांची व्यवस्था, जुळवाजुळव करून ठेवावी लागते. शेतातच प्रतवारी होऊन प्लॅस्टिक पिशव्यांमधून पॅकिंग होते. वांगी हे शरीरास ऊब देणारे पीक असल्याने हिवाळ्यात मोठा उठाव असतो. या काळात उत्पादनही चांगले मिळते.

खानदेशी भरीत वांग्यांची वैशिष्ट्ये

बियाणे घरचेच जतन केलेले असते.

रंग पांढरा व त्यास हिरवट शेड.

साल, गर अतिशय मऊ. त्यामुळे अल्पावधीतच भाजणे शक्य.

स्वाद रुचकर

बियांचे प्रमाणे अल्प

लांबट व गोलाकार प्रकारातील चमकदार वांगे. वजन ४०० ते साडेचारशे ग्रॅमपर्यंत राहते.

बाजारपेठ

दसरा, दिवाळी सणात खानदेशात विशेषतः जळगाव जिल्ह्यात अनेक घरांत भरीत, भाकरी- पुरी असा मेन्यू असतो. या काळात वांग्यांना मोठी मागणी असते. त्या दृष्टीने ऑक्टोबरच्या मध्यात बाजारात आवक सुरू होते. या काळात सुरुवातीच्या दरांचा लाभही मिळतो. दर्जा, गुणवत्ता व चव यामुळे या वांग्यांना जळगाव, भुसावळच्या बाजारासह आठवडी बाजारांत ग्राहकांकडून मोठी मागणी असते. राणे यांच्याकडील वांग्यांनाही याच बाजारपेठा आहेत. अनेक खरेदीदार शेतात येऊनही खरेदी करतात.

राणे यांच्या वांग्यांना पसंती

परिसरात याच काळात भरीत पार्ट्याही सुरू असल्याने या व्यावसायिकांकडूनही मोठी मागणी नोंदविली जाते. अनेक ग्राहक पुणे, मुंबई व अन्य शहरांतील नातेवाइकांना पाठविण्यासाठी राणे यांच्याकडील वांग्यांना पसंती देतात. दर सुरुवातीला ३० ते ३५ रुपये प्रति किलो मिळतात. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आवक वाढते. त्यानंतर ते ० ते २५ रुपयांपर्यंत स्थिर राहतात. जानेवारीच्या मध्यानंतर दर कमी होतात. या पिकातून एकरी किमान एक लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे राणे सांगतात.

Brinjal Farming
Mahareshim Campaign : पुणे जिल्ह्यात महारेशीम अभियानास सुरुवात

भरीत सेंटर्सकडून मागणी (इन्फो २)

भरताच्या वांग्यांसाठी जिल्ह्यातील यावल, रावेरमधील विविध आठवडी बाजार प्रसिद्ध आहेत. या भागातील किरकोळ विक्रेते, अडतदार, मोठ्या व्यापाऱ्यांकडे वांग्यांची मागणी नोंदवितात. जळगाव शहरात ११० हून अधिक भरीत वांगी सेंटर्स आहेत. तेथे हिवाळ्यात दररोज १०० क्विंटलपर्यंत वांग्यांची मागणी असते. हे व्यावसायिक अनेकदा शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करतात. पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण भागांत स्थायिक जळगावकरांकडूनही भाजलेली तसेच तयार भरीतवांग्यांना मोठी मागणी असते. अलीकडे पुणे, कल्याण, ठाणे, नाशिक भागांतही भरीत सेंटर्स सुरू झाली आहेत.

नाना राणे ९८३४२९६८९६, ७७२१०९९०७७

अन्य बागवानी पिकांतही आघाडी

वांग्याव्यतिरिक्त अन्य बागवानी पिकांच्या उत्पादनातही राणे यांची आघाडी असते. मिरची, पपई, कांदा आदी पिकांमधूनही ते आश्‍वासक उत्पादन व उत्पन्न मिळवतात. मिरचीचा बेवड पपईला चांगला मानला जातो. हिरव्या मिरचीचे त्यांना एकरी १७० क्विंटल उत्पादन मिळते. डिसेंबरनंतर ओल्या लाल मिरचीचेउत्पादन घेतात. पाऊसमान चांगले राहिल्यास नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कलिंगड लागवड होते. त्याचे एकरी १७ टनांपर्यंत उत्पादन घेतात. भाजीपाला शेतीतील उत्पन्नातून १२ एकर शेती राणे बंधूंनी घेतली आहे. शेतातील उत्पन्नाची गुंतवणूक शेतीतच करण्यावर त्यांचा भर असतो. मजुरांसोबत शेतात राबण्याची त्यांची नेहमी तयारी असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com