Onion Downy Mildew Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Disease : कांदा पिकावरील ‘डाऊनी मिल्ड्यू’

Onion Downy Mildew Disease : सध्या राज्यातील बहुतांश भागांत कांदा पिकावर ‘डाऊनी मिल्ड्यू’ या नवीन रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Team Agrowon

राहुल वडघुले

कांदा पिकामध्ये अनेक बुरशीजन्य, जीवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामध्ये मुख्यत: फ्युझॅरियम मर, पर्पल ब्लॉच, स्टेम फायलम करपा, पिवळा करपा इत्यादी महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव सर्व कांदा उत्पादक भागांमध्ये दिसून येतात.

सध्या राज्यातील बहुतांश भागांत कांदा पिकावर ‘डाऊनी मिल्ड्यू’ या नवीन रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान होत आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी या रोगाच्या लक्षणांबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल.

रोगाची माहिती

  • रोगाचे नाव ः डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)

  • शास्त्रीय नाव ः पेर्नोस्पोरा डीस्ट्रक्टोर (Peronospora destructor)

  • रोगाचे कारण ः हा रोग बुरशी सारख्या दिसणाऱ्या ‘वॉटर मोल्ड’मुळे होतो.

  • बुरशीचे डिव्हिजन ः Oomycota

  • परजीवी प्रकार ः Obligate parasite

  • नुकसान ः या रोगामुळे कांदा पिकाचे ७५ टक्के पर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते.

  • यजमान पिके ः लसूण.

लक्षणे

  • लक्षणे प्रामुख्याने बाहेरील पानांवर दिसतात. परंतु प्रादुर्भाव वाढत जाईल तसे जमिनीतील कंदावर देखील लक्षणे दिसून येतात.

  • बाहेरील बाजूची पाने खराब होतात. त्यामुळे कांदा व्यवस्थित पोसला जात नाही. तसेच लवकर त्याला मोड येतात.

  • पानांवर फिक्कट हिरव्या रंगाचे चट्टे पडून नंतर ते तपकिरी ते पिवळे होतात.

  • चट्टा पडलेल्या जागेवरून पात शेंड्यापर्यंत पिवळी पडते आणि सुकते.

  • पाने ओली असताना किंवा हवेत आर्द्रता जास्त असते, त्यावेळी पानांवर डाऊनीची पांढरी राखेडी वाढ दिसून येते. नंतर त्या ठिकाणी दुसऱ्या बुरशींचा देखील प्रादुर्भाव होत. त्यामुळे हे स्पॉट नंतर जांभळे दिसू लागतात.

पोषक वातावरण

  • थंड वातावरण तसेच वाढलेली आर्द्रता.

  • साधारण ९५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रतेमध्ये रोगाचे बीजाणू तयार होतात.

  • २३ अंश सेल्सिअस तापमानामध्ये रोगाचे बीजाणू तयार होत नाही.

  • बिजाणूंची लागण होण्यासाठी पानांवर किमान ५ ते ६ तास पाणी आणि तापमान २० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.

नियंत्रणाचे उपाय

  • प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाने ओली राहणार नाहीत, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • तुषार सिंचनाचा वापर करू नये. जिथे तुषार सिंचन हाच पर्याय आहे, तेथे दुपारी कमी वेळ सिंचन करावे.

  • हवा खेळती राहील अशा ठिकाणची जागा कांदा लागवडीसाठी निवडावी.

  • पाण्याचा निचरा चांगला होणाऱ्या जमिनीत लागवड करावी.

  • प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रामध्ये पुढील किमान २ ते ३ वर्षे पीक घेऊ नये.

  • जास्त पावसाळी वातावरण सोडून लागवडीचे नियोजन करावे.

  • रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.

  • जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

  • पोषक वातावरणात शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी करावी.

सूक्ष्मदर्शिकेखाली काय दिसते ?

या रोगाची बीजाणूधानी (Sporangia) सूक्ष्मदर्शिकेखाली अत्यंत स्पष्टपणे पाहू शकतो. बीजाणूधानी या बीजाणूधानी दंडावर पारदर्शक असतात. त्यांचा आकार थोडा गोलाकार ते लंबगोलाकार (Spindale Shape) असतो. बीजाणूधानी जिथे फुटते, तिथे एक निप्पलसारखा भाग दिसतो. तो फुटून त्यामधून झुस्पोर बाहेर येतात.

रोग कसा निर्माण होतो ?

या रोगाच्या बुरशीचे तंतू किंवा बीजाणू (कोनिडिया) हे जमिनीत, जुन्या पीक अवशेषांवर, कांदा कंद किंवा बिजाणूंवर जिवंत राहतात. वारा, कीटक, पाणी यांच्या मार्फत ते यजमान पिकांवर पोचतात. पोषक वातावरण निर्मिती होताच मुख्य पिकाच्या खालील पानांवर रोगाची लागण होते. यालाच प्राथमिक लागण म्हणतात. रोगाची लागण झाल्यानंतर ८ ते १५ दिवसांत रोगाची लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांमधील ठिपक्यांवर अनेक बीजाणू (कोनिडीया) तयार होतात. हे बीजाणू हवेमार्फत इतर यजमान पिकांवर जातात. आणि रोगाचा प्रसार होतो. यालाच दुय्यम लागण असे म्हणतात.

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा.

पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा.  पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT