Soyabean Market : लातूर… देशातील सोयाबीनचं बेंचमार्क मार्केट. सोयाबीन बाजाराचं विश्लेषण लातूर बाजाराला डावलून होऊच शकत नाही. असं या बाजाराचं वजन. पण या बाजारात आजही सर्वच सोयाबीनचे सौदे होत नाहीत. मोठ्या प्रमाणावर पोटली व्यवहार चालतात. पोटली व्यवहारात सौद्यात मिळणाऱ्या भावापेक्षा कमी भाव मिळतो. हा भाव ३०० रुपयांपर्यंत कमी असतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
सर्वात आधी आपण पोटलीतील व्यवहार ही नेमकी काय भानगड आहे, ते समजून घेऊ. लातूर मार्केटमध्ये रोज सकाळी काही अडत्यांच्या गाळ्यावर शेतीमालाचे सौदे निघतात. यात सोयाबीन, तूर, हरभरा असतो. सध्या सोयाबीनची आवक वाढत आहे. म्हणजेच बाजारात आलेल्या सर्वच सोयाबीनचे भाव सौद्यातून ठरत नाहीत. बाजार समिती प्रशासनाच्या म्हणण्यानुसार बाजार समितीत येणाऱ्या सोयाबीनपैकी ५० टक्के लिलाव होतात. तर ५० टक्के सोयाबीनचे भाव पोटलीतून काढले जातात. पण शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आवक झालेल्या केवळ १० टक्के सोयाबीनचेच लिलाव होतात. ९० टक्के सोयाबीन पोटलीतून विकले जाते.
आता पोटलीचे भाव कसे काढतात ते पाहू… ज्या मालाचे सौदे झाले नाही त्या मालाचे नमुने काही ठराविक मोठ्या खरेदीदारांच्या दुकानात नेतात. या नमुन्यांची म्हणजेच सॅम्पलची पाहणी करून खरेदीदार त्याचा भाव काढतात. याला पोटलीचा भाव म्हणतात. पण काही आता पोटलीचे भावही परस्पर जाहीर केले जातात, असे शेतकरी सांगतात. सॅम्पल न पाहताच सौद्यात मिळालेल्या भावापेक्षा कमी भाव ठरवला जातो. पोटलीचा भाव आणि सौद्यातील भाव यात १०० ते ३०० रुपयांचा फरक येतो, असे शेतकरी सांगतात.
पोटलीत सौद्यापेक्षा भाव कमी निघतात, ही लूट इथच थांबत नाही. तर पोटलीचा भाव निघाल्यानंतरही त्यात पुन्हा सोयाबीनच्या दर्जाप्रमाणे कपात केली जाते. म्हणजे निघालेला पोटलीचा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही. पोटलीत निघालेल्या भावातही ओलावा, काडी कचरा, डागीच्या नावाखाली किमान १०० ते १५० रुपये कमी केले जातात, असे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यातही पायली, मातेर आलचं. म्हणजेच काय एकतर पोटलीमध्ये सौद्यापेक्षा आधीच कमी भाव काढला जातो. त्यातही मालाच्या गुणवत्तेच्या नावाखाली भाव कमी केले जातात. बाजारात माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की सौद्यापेक्षा पोटलीत मिळालेला भाव किमान ३०० रुपयांनी कमी असतो.
बाजार समितीने पोटली व्यवहार बंद करून सर्वच मालाचे सौदे काढावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने लावून धरली. याबाबत नुकतेच जिल्हा उपनिबंधकांना निवेदनही देण्यात आले. याबाबत आम्ही बाजार समिती प्रशासनाचीही भुमिका जाणून घेतली. प्रशासनाचे म्हणणे आहे की. सकाळी लिलाव पार पडल्यानंतरही सोयाबीनची आवक सुरु असते. या सर्व सोयाबीनचे सौदे करणे शक्य नाही. तसेच बाजार आवार छोटा आहे. हंगामात तर खूपच गर्दी होत असते. त्यामुळे पोटलीतून भाव काढले जातात. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली जाते, असं सुत्रांचं म्हणणं आहे.
पण लातूर सारख्या बाजारात की ज्या बाजाराची ख्याती राज्यातच नाही तर देशभरात आहे. या बाजारात पोटली व्यवहार आजही सुरु असतील तर चिंतेची बाब आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार नेहमी छाती ठोकून सांगत असते की शेतकऱ्यांची लूट सहन करणार नाही. पण राज्याच्या सर्वात मोठ्या सोयाबीन बाजारात पोटलीतून भाव काढले जातात, या लातूरच्या बाजार लीलेवर अनेकांचा विश्वासच बसणार नाही. आपण एकीकडे बाजार सुधारणा, ई-एक्सचेंज, ई-नामच्या गप्पा करतो आणि दुसरीकडे बाजार समित्यांमधील लिलाव पध्दती जुनाटच आहेत. यात तातडीने सुधारणा करून शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची गरज आहे.
आम्ही मागील काही वर्षांपासून पोटली व्यवहार बंद व्हावे यासाठी आंदोलन करीत आहोत.पण व्यापाऱ्यांच्या दबावामुळे बाजार समिती प्रशासन शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही.व्यापारी, संचालक मंडळ आणि बाजार समिती प्रशासन यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची लूट चालू आहे.- रुपेश शंके, युवा जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, लातूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.