Environmental Crisis: जागतिक तापमानवाढ आणि वातावरणातील बदल यांची मोठी झळ शेतकऱ्यांना बसत असल्याने शेती करणे मुश्किल झाले आहे. परंतु शेतकरीसुद्धा या समस्येला काही प्रमाणात जबाबदार आहेत. तापमानवाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या सहा हरितगृह वायूंमध्ये दुसरा क्रमांक लागतो मिथेनचा. या मिथेन निर्मितीमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा संस्थेच्या अहवालानुसार भारतात उत्सर्जित होत असलेल्या एकूण मिथेनपैकी ४८ टक्के मिथेन पशुपालनामधून निर्माण होतो.
जागतिक तापमानवाढ आणि वातावरणातील बदल यांचा फटका सगळ्या जगाला बसतो आहे. त्यातही शेतकऱ्यांना त्याची मोठी झळ बसत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या पशुपालनातील एक घटकही या समस्येसाठी कारणीभूत आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? त्या अर्थाने पशुपालक शेतकरी या समस्येला काही प्रमाणात जबाबदार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सभोवतालच्या वातावरणात पूर्वीपासून असलेले, पण आता मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाढत असलेले सहा मुख्य हरितगृह वायू तापमानवाढीसाठी कारणीभूत आहेत. त्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे तो मिथेन वायू. सध्या वातावरण बदलाची जी समस्या भेडसावत आहे, त्यात या मिथेनचा वाटा कळीचा आहे.
काय आहे हे मिथेन? आणि तो दुसऱ्या क्रमांकावरच का? याचे उत्तरही सोपे आहे. मिथेन हा प्राणवायूअभावी (ऑक्सिजन) ओला कचरा कुजून तयार होणारा विषारी वायू आहे. दरवर्षी महानगरात पावसाळ्यापूर्वी जी नालेसफाई होते त्यामध्ये कितीतरी कामगार या विषारी वायूमुळे गुदमरून मरण पावतात. मिथेन निर्मिती ही जशी जैविक क्रिया आहे तशीच ती एक रासायनिक क्रिया सुद्धा आहे. म्हणूनच औद्योगिक क्षेत्रात या वायूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मिथेन हा सहा हरितगृह वायूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असण्याचे मुख्य कारण म्हणजे वातावरणात कर्ब वायूप्रमाणे तो कायम स्थिर राहत नाही. वास्तविक कर्बवायूपेक्षा हा ८० टक्के जास्त घातक आहे. म्हणूनच त्याचे उत्सर्जन रोखणे हे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे खरे उत्तर आहे.
भारत तिसऱ्या क्रमांकावर
मिथेन निर्मितीमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा संस्थेच्या अहवालानुसार भारतात उत्सर्जित होत असलेल्या एकूण मिथेनपैकी ४८ टक्के मिथेन पशुपालनामधून निर्माण होतो. केंद्र सरकारच्या २०१९ मध्ये झालेल्या २० व्या पशुगणनेनुसार देशात आज ५३६.७६ दशलक्ष पशुधन आहे. त्यामधील ९६ टक्के पशुधन ग्रामीण भागात आणि उरलेले ४ टक्के शहरी भागात आहे. यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गाई, म्हशींचीच संख्या तब्बल ३०३ दशलक्ष आहे. १९ व्या पशूगणनेच्या तुलनेत सध्याचा आकडा १.३ टक्का वाढलेला आहे.
या सर्व पाळीव प्राण्यांचे पालन कसे होते, हा सुद्धा येथे पुन्हा कळीचा मुद्दा आहे. अजून एक अहवाल सांगतो की गाई आणि म्हशी यांनाच आपण मुख्य पशुधन म्हणून गृहीत धरले तर त्यामधील जेमतेम एक टक्काच पशुधन मोकळ्या जागेत चरावयास जाते आणि उरलेले ९९ टक्के बंदिस्त आहे. म्हणजेच त्यांना बांधून उभ्या अवस्थेत चारा, प्रथिनयुक्त, तेलयुक्त आहार दिला जातो. गाय असो अथवा म्हैस किंवा कुठलाही चारा खाणारा पाळीव प्राणी असो तो रवंथ करत असताना त्याच्या पोटात मिथेन वायूची निर्मिती (मिथेनोजेनेसिस) जैविक प्रक्रियेत होते;
ज्यामध्ये मिथॅनोजेन्स जिवाणू प्राणवायू विरहित अवस्थेत हायड्रोजन आणि कर्ब वायू वापरून मिथेन वायूची निर्मिती करतात. ताजे गवत अथवा कुठलाही वाळलेला चारा जेव्हा जनावराच्या पोटात घेतला जातो तेव्हा त्यामध्ये रुमेन मिसळले जाते. हे रुमेन या जिवाणूंनी श्रीमंत असते. रुमेन आणि चारा एकत्र आले की किण्वन क्रिया सुरू होते ज्यामधून मिथेन वायू बाहेर पडतो. हा वायू वातावरणात प्रवेश करताच जमिनीपासून उत्सर्जित होणारी उष्णता वेगाने अडविण्यास सुरवात करतो.
बंदिस्त पशुधन ही समस्या
पाळीव पशुधनाने मिथेन तयार करणे हा नैसर्गिक भाग आहे. यावर नियंत्रण ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे या पाळीव पशुधनास मोकळ्या हवेत, गायरानामध्ये चरण्यास पाठवणे. अन्न ग्रहण करताना आणि अन्नासाठी भटकंती करताना मिथेन तयार करण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण येते. दुसरा पर्याय म्हणजे हे पशुधन बंदिस्त असेल तर त्यांच्या चाऱ्यामध्ये बदल करून कमीत कमी मिथेन कसा तयार होईल हे पाहणे. संशोधन असे सांगते की गायरानात चरणाऱ्या पशुधनापेक्षा गोठ्यात बंदिस्त असलेले पशुधन जास्त मिथेन तयार करते
कल्पक उपाययोजना
गाई, म्हशींपासून मिथेन उत्सर्जन शून्य करणे केवळ अशक्य आहे. या पाळीव प्राण्यांमधून बाहेर पडणारा मिथेन सर्वांत जास्त त्यांच्या ढेकरामधून बाहेर पडतो. नव-उद्दमी संशोधन (Startup) असे सांगते, की पशुधनाच्या मुखास मास्क लावून हा मिथेन त्यांच्या ढेकरातून पकडावयाचा आणि मास्कमध्येच मिथेनचे विघटन करणारे विकर टाकून मिथेन बाहेर पडताच त्याचे रूपांतर कर्ब वायू आणि पाण्यामध्ये करावयाचे. वास्तविक मिथेन वातावरणात प्रवेश करताच काही वेळातच त्याचे ऑक्सिडीकरण होऊन त्यातून सुक्ष्म प्रमाणात कर्ब वायू आणि पाणी तयार होते. हीच क्रिया त्या मास्कमध्ये विकरांच्या साह्याने करावयाची आणि मिथेनचा वातावरण प्रवेश थांबविण्यापेक्षा कमी करावयाचा एवढी साधी ही गोष्ट आहे. ही पद्धती मोठ्या प्रमाणावर राबवली गेली तर वाढत्या उष्णतामानाच्या राक्षसास आपण पुढील १० वर्षे सहज थांबवू शकतो.
दुसऱ्या एका पद्धतीमध्ये लहान सूक्ष्म नळी गाय अथवा म्हैस यांच्या मुखातून पोटात जेथे मोठ्या प्रमाणात मिथेन साचला आहे तेथपर्यंत पोहोचवून तो काढून घेणे आणि तो साठवून ज्वलनासाठी उपयोगात आणणे. अजून एका पद्धतीमध्ये पशुधनाच्या मानेवर एका विशिष्ट ठिकाणी दाब देऊन पोटामधील मिथेन बाहेर काढून गोळा करता येतो. पण यावर सर्वांत प्रभावी उपाय म्हणजे पशुधनाच्या पोटात तयार होणारे मिथेन थांबविण्यासाठी करावे लागणारे लसीकरण; ज्यातून त्यांच्या लाळेत विशिष्ट ॲन्टिबॉडीज तयार होतील. गाय सतत चरत असते आणि घास गिळत असते. अशा प्रत्येक घासाबरोबर लाळेमधील या विशिष्ट ॲन्टिबॉडीज पोटात जातील आणि रुमेनच्या संपर्कात येतील; जेणेकरून तेथील जिवाणूंना मिथेन तयार करण्यापासून रोखले जाईल. यावर अमेरिका आणि हॉलंडमध्ये यशस्वी प्रयोग सुरू आहेत आणि या शतकाच्या अखेरीपर्यंत ही लस सर्वत्र उपलब्ध होईल, अशी शास्त्रज्ञांना खात्री आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.