World Mental Health Day  Agrowon
ॲग्रो विशेष

World Mental Health Day : मानसिक आरोग्यही जपूया

Health Problems : शेतकरी, युवक, महिला, वयोवृद्ध अशा सर्वांच्याच मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प करूया.

Team Agrowon

Also Take Care of Mental Health : १० ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबद्दल समाजामध्ये जनजागृती व्हावी व मानसिक आरोग्य संदर्भात असणारी कलंकाची भावना कमी होऊन लोकांनी मदत घ्यावी, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ग्रामीण भागामध्ये जिथे आरोग्याच्या सुविधा मिळविण्यासाठी सुद्धा धडपड करावी लागते, तिथं मानसिक आरोग्याच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले जाते. एकूणच आरोग्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा फक्त शारीरिक आरोग्यावर भर दिला जातो. मानसिक आरोग्य हे नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे.

कोरोनानंतर मानसिक आरोग्याचे प्रश्‍न हे दिवसेंदिवस वाढायला लागले आहेत. कृषिप्रधान भारत देशातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्गाचे बिघडलेले चक्र यामुळे शेतीमध्ये कोणत्याच गोष्टीची शाश्‍वती देता येत नाही. त्याचबरोबर पिकाला हमीभाव मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे शेतकरी नेहमी चिंतेच्या सावटाखाली असतात. चिंता, नैराश्य यामुळे आत्महत्या, व्यसन यांसारखे प्रश्‍न वाढायला लागले आहेत. शेतकरी कुटुंबातील मुलांचे सुद्धा मानसिक आरोग्याचे काही प्रश्‍न निर्माण व्हायला लागले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये असणारी शिक्षणासाठीची  संसाधने फार कमी प्रमाणात आहेत. पुढील उच्च शिक्षण घ्यायचा असेल, करिअर करायचे असेल, स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर यासाठी ग्रामीण भागातील मुला-मुलींना पुणे- मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागते. आयुष्यात काहीतरी बनण्याचे ध्येय घेऊन ही मुले शहरात येतात. यासाठी कुटुंबापासून दूर राहून स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत असतात. कुटुंबातील व्यक्ती सुद्धा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करतात. आपल्याला शिकता आले नाही पण आपल्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून मुलांना घराबाहेर ठेवण्यासाठी तयार होतात. 

मुले शहरांमध्ये येऊन शिक्षण घेत असताना करिअर, पालकांच्या अपेक्षा, आर्थिक ताण, नवीन ठिकाणी जुळवून घेणे यासारखे प्रश्‍न मुलांना भेडसावतात. हे झाले शिक्षणासाठी बाहेर असणाऱ्या मुलांचे, परंतु जे शेती व्यवसायात आहेत त्यांचे तर वेगळेच प्रश्‍न आहेत. ज्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात यायला लागले आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे लग्न! सध्या आपण कोणत्याही गावात गेलो, तर ३० ते ४० वर्षे वयोगटातील बरीचशी मुलं लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत असे दिसते. लग्नाचा प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे या युवकांना वेगवेगळ्या मानसिक आरोग्याच्या प्रश्‍नांना तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक अडचणी, वेळोवेळी मिळणारा नकार यामुळे नैराश्याचे प्रमाण वाढत आहे आणि त्यातूनच पुढे जाऊन या युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळते.

महिला या नेहमीच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. कुटुंबातील इतर व्यक्तींच्या आरोग्याला जास्त प्राधान्य दिले जाते. या सगळ्यांमध्ये स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या काही गरजा आहेत, हे लक्षातच घेतले जात नाही. ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांच्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवते. घरामध्ये असणारे आर्थिक ताण, कुटुंबात असणारे तीव्र व्यसनाचे प्रमाण यामुळे मानसिक समाधान मिळत नाही. या सगळ्यांचा परिणाम म्हणून मिश्रीसारख्या व्यसनाचे प्रमाण महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते.

अशा स्वरूपाचे अनेक प्रश्‍न असल्यामुळे मानसिक आरोग्याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. मेंदूमधील पेशींमार्फत मनाचे कार्य चालते.  मनाचा व्यवहार हा मेंदूच्या पेशींमधून चालतो. दोन पेशींमध्ये सूक्ष्म फट असते. त्यातून विविध प्रकारची रसायने प्रसवत असतात. त्यामध्ये नैसर्गिक समतोल असतो. कोणत्याही कारणामुळे मेंदूमधील रसायनांमध्ये असमतोल झाला तर मानसिक आजार होतात. उदा. शेतामधील पिकाला जास्त पाणी दिले तर पिके कुजून जातात व कमी पाणी दिले तर वाळतात. पिकांना योग्य प्रमाणात पाणी देणे गरजेचे असते तरच पीक चांगले येते. त्याचप्रमाणे आपले मानसिक आरोग्य चांगले राहायचे असेल तर मेंदूमधील रसायनांचा समतोल राखायला हवा. काही मानसिक व सामाजिक घटक असतात जसे की स्वभाव, नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती यामुळे मानसिक आरोग्य बिघडू शकते.

दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीला तोंड देत असताना ताण येणे स्वाभाविक आहे. पण हे ताण ओळखायला व हाताळायला शिकायला हवे तरच पुढे जाऊन त्यांचे आजारांमध्ये रूपांतर होण्यापासून वाचवू शकतो. हृदयविकार, मधुमेह यांसारखे आजार हे अतिरिक्त ताण घेण्यामुळे सुरू होतात. त्यामुळे आपले शारीरिक आरोग्य चांगले राहायचे असेल तर आपल्या मनाची ही आपण तेवढीच काळजी घेतली पाहिजे. 

मनाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी...

मनाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर काही गोष्टी करायला हव्यात. कुटुंबामध्ये संवाद ठेवायला हवा. संवादामुळे मनामध्ये कोणतेच विचार साठून राहणार नाहीत व वेळच्यावेळी त्यावर मार्ग काढता येऊ शकतो. बोलण्यामुळे मनामध्ये साठलेले विचार, भावना यांना व्यक्त होण्याची वाट मिळते. त्यामुळे मनावरचा ताण हलका होतो. मनमोकळा संवाद केल्यामुळे मनामध्ये निर्माण झालेला विचारांचा गुंता सोडविण्यासाठी मदत होते. बोलण्यामुळे समस्या सोडविण्यासाठी मार्ग मिळतात. आपले कोणीतरी ऐकून घेत आहे, आपल्याला समजून घेत आहे, यामुळे आत्मविश्‍वास वाढतो. न बोलल्यामुळे होणारे गैरसमज, वाद टाळता येतात. नातेसंबंध सुधारण्यासाठी बोलण्याचा उपयोग होतो.

कुटुंबातील नातेसंबंध चांगले असणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर व्यायाम करायला हवा व पुरेशी झोप घेतली पाहिजे. शेतकरी कुटुंबांमध्ये फळे, पालेभाज्या, दूध याची कमतरता नसते. परंतु बरेच वेळा त्यातून आर्थिक उत्पन्न मिळावे हा एकच उद्देश असतो. शेतकरी कुटुंबातील लहान मुले व पुरुष मंडळींच्या आहारामध्येच दूध, फळे, पालेभाज्या याचा समावेश असतो. महिला शक्यतो स्वतः हे खात नाहीत. कधी तरी उरले तरच यांचा समावेश महिलांच्या आहारात होतो. याचा महिलांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे कुटुंबातील सर्वांनीच योग्य पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. व्यसनाचा परिणाम हा शारीरिक व मानसिक दोन्ही आरोग्यावर होत असतो. त्यामुळे दारू, तंबाखू, मिश्री यांसारख्या व्यसनांपासून लांब राहायला हवे. या सगळ्यांची आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर जर मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी औषध उपचार घेणे गरजेचे असेल तर ते न लाजता घ्यायला हवेत.

(लेखिका परिवर्तन संस्था सातारा येथे प्रकल्प समन्वयक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT