Woman Health : मनाला कसे ओळखावे?

समाजामध्ये महिलांचे स्थान हे दुय्यम आहे. प्रत्येक ठिकाणी महिलांना आपले हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जिथं शारीरिक आरोग्यासाठीच्या सुविधा महिलांना उपलब्ध होत नाहीत तिथं त्यांच्या मानसिक आरोग्याची परिस्थिती अजूनच बिकट आहे.
Women Health
Women HealthAgrowon

रुपाली भोसले

Women Health Issue समाजामध्ये महिलांचे स्थान हे दुय्यम आहे. प्रत्येक ठिकाणी महिलांना आपले हक्क (Women Rights) मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जिथं शारीरिक आरोग्यासाठीच्या सुविधा महिलांना उपलब्ध होत नाहीत तिथं त्यांच्या मानसिक आरोग्याची (Women Mental Health) परिस्थिती अजूनच बिकट आहे.

त्यातल्यात्यात महिला शिकलेली असेल व तिच्या पायावर उभी असेल, तर थोड्याफार प्रमाणात ती याकडे लक्ष देते. परंतु शेतकरी, कष्टकरी महिलांच्या बाबतीत तर मानसिक आरोग्य याविषयी खूपच उदासीनता दिसते. इतर गरजा भागवत असताना मानसिक आरोग्याला नगण्य महत्त्व दिलं जातं.

‘‘काय सांगू बाई लय टेन्शन हाय मला’’ यातील ‘टेन्शन’ हा शब्द अगदी सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अगदी तो या महिलांच्या सुद्धा परिचयाचा. पण हे टेन्शन येतं तरी कुठं असं विचारलं तर बहुतेक वेळा ते सांगता येत नाही.

त्यामुळे मन आजारी पडते व त्याला पण उपचाराची गरज असते याबद्दल माहीत नसते. याविषयी महिलांमध्ये जागृती असणे खूप गरजेचे आहे.

कारण महिलांमध्ये आढळणाऱ्या बऱ्‍याच आजारांचे हे मूळ असू शकते. त्यामुळे मनाविषयी या शेतकरी महिलांना माहिती असणे गरजेचे आहे. मन हे मेंदूमध्ये असते, मेंदूमधील पेशींमार्फत मनाचं कार्य चालते.

मनाचा व्यवहार हा मेंदूच्या पेशींमधून चालतो. दोन पेशींमध्ये सूक्ष्म फट असते त्यातून विविध प्रकारची रसायने प्रसवत असतात. त्यामध्ये नैसर्गिक समतोल असतो. कोणत्याही कारणामुळे मेंदूमधील रसायनांमध्ये असमतोल झाला तर मानसिक आजार होतात.

उदा. शेतामधील पिकाला जास्त पाणी दिले तर पिकं कुजून जातात व कमी पाणी दिले तर वाळतात. पिकांना योग्य प्रमाणात पाणी देणे गरजेचे असते तरच पीक चांगले येते. त्याचप्रमाणे आपले मानसिक आरोग्य चांगले राहायचे असेल तर मेंदूमधील रसायनांचा समतोल राखायला हवा.

Women Health
Women Empowerment : महिलांचे दारिद्र्य दूर करणारे ‘उमेद’

शेतकऱ्‍यांचा बाबतीत तर कशाची हमी देता येत नाही. त्यामुळे रोज काहींना काही घडत असतं. अशा परिस्थितीत ताणविरहित व्यक्ती सापडणे अवघड आहे. ताण येणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे.

आजकाल महिला ह्या दोन्ही पातळीवर काम करत असतात. घरातील सर्व गोष्टी बघणे व त्याचबरोबर शेतामध्ये जाऊन तेथील कामामध्ये हातभार लावणे, हे करत असताना शारीरिक व मानसिक पातळीवर तिची ओढाताण होत असते.

यामधून बरेच वेळा निराशा येऊ शकते. त्यासाठी असे येणारे ताणतणाव ओळखायला व हाताळायला शिकले तर पुढे जाऊन त्यांचे आजारांमध्ये रूपांतर होण्यापासून वाचवू शकतो.

हृदयविकार, मधुमेह यासारखे आजार हे अतिरिक्त ताण घेण्यामुळे सुरू होतात. त्यामुळे आपले शारीरिक आरोग्य चांगले राहायचे असेल तर आपल्या मनाची ही आपण तेवढीच काळजी घेतली पाहिजे.

Women Health
Women Empowerment : महिलांचे दारिद्र्य दूर करणारे ‘उमेद’

मनाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर महिलांनी स्वतःच्या पातळीवर काही गोष्टी करायला हव्यात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबामध्ये संवाद ठेवायला हवा.

संवादामुळे मनामध्ये कोणतेच विचार साठून राहणार नाहीत व वेळच्यावेळी त्यावर मार्ग काढता येऊ शकतो. कुटुंबातील नातेसंबंध चांगले असणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

शेतामध्ये काम करणाऱ्‍या महिलांना सुद्धा थोड्या व्यायामाची गरज असते. त्यामुळे रोज चालण्यासारखा सोप्पा व्यायाम वीस मिनिटे तरी करायला हवा. त्याचबरोबर रोज आपल्या शरीराला साधारणतः सात ते आठ तास झोपेची आवश्यकता असते तेवढी झोप घेतली पाहिजे.

शेतकरी कुटुंबांमध्ये पालेभाज्या, दूध याची कमतरता नसते. परंतु बरेच वेळा त्यातून आर्थिक उत्पन्न मिळावे हा एकच उद्देश असतो. घरातील लहान मुलं व पुरुष मंडळींच्या आहारामध्ये याचा समावेश असतो. महिला शक्यतो स्वतः हे खात नाहीत. खाल्लं तरी कधी उरलं तरच खातात. त्यामुळे याचा त्यांच्या शारीरिक

आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य पौष्टिक आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. या महिलांमध्ये बरेच वेळा तंबाखू व मिश्रीचे प्रमाण जास्त असते. ते सोडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

शेतकरी कुटुंबातील महिलांना याविषयीची माहिती असेल तर कुटुंबामध्ये इतर व्यक्तींना येणारे ताण त्या ओळखू शकतील, त्याचा उपयोग स्वतःचे, कुटुंबाचे मानसिक आरोग्य चांगले ठेवायला व आत्महत्या रोखायला होऊ शकतो.

(लेखिका परिवर्तन संस्था सातारा येथे प्रकल्प समन्वयक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com