Soil Fertility Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Fertility : सुपीक करूयात आपली जमीन

प्रताप चिपळूणकर

World Soil Day : आपल्यावर मृदा दिन साजरा करण्याची वेळ का आली? यावर प्रथम थोडासा विचार करूयात. हरितक्रांतीनंतर सुधारित बियाणे, खते, कीडनाशक, अवजारे, सिंचन पद्धतीचा अवलंब करत शेतकरी फक्त पीक उत्पादनाच्या मागे लागला. शेतकऱ्यांनी उत्पादनाचे अनेक विक्रम केले. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही.

पंधरा-वीस वर्षांनंतर उत्पादन पातळी घटू लागली. याच्या कारणाचा शोध घेता भरपूर उत्पादन घेण्याच्या नादात आपण ज्या माध्यमातून हे उत्पादन घेतो आहोत त्या जमिनीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घट येत आहे हे लक्षात आले.

निसर्गाने जमिनीला जी सुपीकता दिली आहे यावर पंधरा-वीस वर्षे उत्पादन चांगले मिळेल, मात्र त्यानंतर उत्पादन पातळी घटू लागेल असे डॉ. स्टीव्हन्स यांनी आपल्या ‘ह्यूमस केमिस्ट्री’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगात ज्या ठिकाणी बागायतीच्या सोयी झाल्या त्या ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु या मागील कारणांचा तळापर्यंत जाऊन शोध न घेतल्याने जमिनीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परिणामी, यावर जागतिक मृदा दिनाची संकल्पना मांडली गेली आणि संयुक्त राष्ट्र संघाने त्याला मान्यता दिली.

संशोधनाची दिशा महत्त्वाची

कृषी शिक्षण आणि संशोधन विषयवार चालते. यात दोन विषयांमध्ये समन्वय फारसा होत नाही अशी तक्रार अल्बर्ट हॉवर्ड यांनी ‘ॲग्रिकल्चरल टेस्टमेंट’ या ग्रंथात मांडली आहे. त्याला आता ८५ वर्षे होऊन गेली.

या त्यांच्या विचाराची दखल फारशी घेतली गेली नाही असे वाटते. जमिनीची सुपीकता हा विषय कृषी विद्याशास्त्र, कृषी रसायनशास्त्र आणि कृषी वनस्पतिशास्त्र या विद्याशाखांकडून हाताळला जातो.

मी एक पूर्णवेळ शेतकरी आहे. कृषी पदवीधर होऊन शेती करू लागल्यानंतर वरील प्रमाणे माझीही आर्थिक दुर्दशा झाली. कारणांचा शोध घेत असता अपघाताने माझी भू-सूक्ष्मजीवशास्त्र या विद्याशाखेशी ओळख झाली आणि या विद्याशाखेने माझे पुढील शंकांचे निरसन केले आणि पुढील वाटचालीची दिशा दाखवली. त्याप्रमाणे मी माझ्या शेती करण्याच्या पद्धतीत बदल करीत गेलो.

या शास्त्रशाखेने मला सर्व संकटांतून सोडवून शेतीत स्थिरस्थावर केले. शेतीचे पायाभूत विज्ञान या शास्त्रशाखेने शिकविले. यावर चिंतन करीत मी उपयोजित विज्ञान तंत्र विकसित करीत गेलो. माझ्या भात व ऊस शेतीत विकसित झालेले तंत्र इतर सर्व पिकात नेले. २००५ पासून या तंत्राचा यशस्वी वापर होऊ लागला.

परंतु तंत्र विकास एकाच ठिकाणी थांबत नाही. पुढील १८ वर्षांच्या कालावधीत सतत त्यात सुधारणा करीत गेलो. संशोधन ही सतत चालणारी संकल्पना आहे. यापेक्षा आणखी काय चांगले आहे याचा शोध सतत चालू आहे.

साधारण विना नांगरणी शेतीमध्ये मागील पिकाचे अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत म्हणून वापरले जाते. तसेच तणनाशकाने तण नियंत्रण या सुरुवातीच्या काळातील गोष्टी आहेत. आता यामध्ये देखील अधिक संशोधन होत आहे.

जमिनीची सुपीकता जपण्यासाठी...

सेंद्रिय कर्ब अगर सेंद्रिय खत म्हणजे सर्वसारखे असे नाही. मूळ कुजणारा पदार्थ जितका कुजायला जड तितके त्यापासून तयार झालेले खत उच्च दर्जाचे असते. कुजायला हलके पदार्थ लवकर संपून जाणारे खत देतात. आपण दोन्ही प्रकारचे खत वापरात कसा ठेवता येईल यावर चिंतन करावे.

द्विदल कडधान्य वर्गीय कच्च्या मालापेक्षा एकदम गवत वर्गीय वनस्पतीपासून तयार केलेले खत जास्त चांगले असते. माणसाने खाण्यायोग्य पदार्थांपासून शक्यतो खतासाठीचा कच्चामाल नको. अखाद्यपदार्थ निसर्गात भरपूर आहेत. यादृष्टीने तणापासून खत तयार करा. तणे वाढवा आणि तणनाशकाने मारून टाका हे तंत्र आता जुने झाले.

पिकाबरोबर रानात काही प्रमाणात तणे जिवंत असली पाहिजेत. तणे योग्य प्रमाणात वाढवून तणनाशकाने नियंत्रित करण्याऐवजी ब्रश कटरने कापून टाकावीत. तणांची वाढ रोखा, त्यांना मारू नका. हे कौशल्याचे काम आहे.

उपलब्ध अन्नद्रव्ये हा नाशवंत पदार्थ आहे. यासाठी जमिनीत पिकाने मागणी केलेला भाग फक्त उपलब्ध अवस्थेत असतो. बाकी भाग पिकाला न उपलब्ध अवस्थेत साठवला जातो. त्यानुसार चांगले कुजलेले खत हा नाशवंत पदार्थ आहे. उष्ण कटिबंधात कुजलेले सेंद्रिय खत न देता कुजणारा पदार्थ देणे जास्त चांगले. दररोज थोडे थोडे खत निर्माण व्हावे आणि ते वापरले जावे.

जागेला कुजण्याऱ्या घटकाचा जमीन आणि वाढणाऱ्या पिकाला खूप फायदा होतो. कुजण्याची क्रिया ही शेतीतील एक अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे. यावर शेतकऱ्यांनी चिंतन करावे.

तण मारण्याऐवजी जिवंत ठेवण्याचा काय फायदा हे लक्षात घ्यावा. रानात पिकाच्या मागणीप्रमाणे खताचे अंश स्थिर साठ्यातून उपलब्ध साठ्यात येतात. नत्र या नियमाला अपवाद आहे. नत्र पिकाच्या गरजेनुसार उपलब्ध होतोच, याव्यतिरिक्त गरजेपेक्षा जास्त काही प्रमाणात उपलब्ध होतो.

रानात फक्त पीक असल्यास सर्व नत्र पिकाला खावा लागतो. यामुळे पानात नत्राची टक्केवारी वाढते. यातून कीड, रोगाला अनुकूलता निर्माण होते. शेतकरी मला असे सांगतात, की योग्य पद्धतीने तण व्यवस्थापन केल्याने कीड, रोग कमी झाले तसेच कीडनाशकाच्या फवारण्या खूप कमी झाल्या. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे.

पिकाला दिलेल्या खतापैकी फक्त १८ ते २० टक्के खत पीक वापरते. बाकीपैकी काही भाग तणांनी खाल्ल्यास आणि पुढे ही तणे रानातच कुजून गेल्यास खतांची कार्यक्षमता वाढते.

शून्य मशागतीच्या रानातील ओलावा टिकून राहतो. इथे फक्त पृष्ठभागावरील पाण्याचे बाष्पीभवन होते. जमिनीचे आतील पाण्याचा साठा सुरक्षित राहतो. यंदाच्या दुष्काळात पाऊस लांबला तरी शून्य मशागतीची पिके सुकली नाहीत. कोरडवाहू शेतीसाठी हा धडा अत्यंत महत्त्वाचा आहे.

शून्य मशागतीमुळे निचरा शक्ती सुधारते. त्यामुळे जलसंवर्धन होते. पाणी आडवे वाहत नाही, मूलस्थानी जलसंवर्धन होते. जमिनीची धूप अजिबात होत नाही. भूजल पातळी वाढते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे सर्व काम फुकटात करून मिळते, याला सर्वांत जास्त महत्त्व आहे.

जमिनीत मुरलेल्या पाण्याचे बाष्पीभवनाने नुकसान होत नाही. जमिनीवर असलेल्या पाण्याचे अंदाजे चाळीस टक्के बाष्पीभवन होते.

जागेला अवशेष कुजवलेल्या रानातील पिकाचा उत्पादनाचा दर्जा अतिशय उच्च पातळीचा असतो. आजही दर्जाबाबत फारशी चर्चा होत नाही. फक्त सेंद्रिय शेती करा अगर काही खर्चिक मार्ग सुचवले जातात.

भावी काळात मनुष्यबळ टंचाई हा शेती पुढील सर्वांत ज्वलंत प्रश्‍न असणार आहे. इथे शून्य मशागत तंत्र आपल्याला मदत करू शकते.

जमिनीची काळजी जास्तीत जास्त घ्या. जमिनीला माणसाप्रमाणे विश्रांतीची गरज असते. यासाठी तीन हंगामापैकी एक हंगाम जमिनीत पीक न घेता जमिनीला विश्रांती द्या. एकूण जमिनीची तीन-चार भागात विभागणी करावी. प्रत्येक हंगामात एक भाग पड टाकावा.

जवळच्या अंतरावरील पिकासाठी एक पट्टा पिकाचा आणि एक पट्टा तणाचा असे नियोजन करा. पुढील वर्षी पिकाच्या पट्ट्यात तण आणि तणाच्या पट्ट्यात पीक असा फेरपालट करा. ५० टक्के रानात १०० टक्के रानाइतके पीक मिळेल.

पीक उत्पादनाबरोबर समांतर जागेलाच सेंद्रिय खत कसे करता येईल यावर सतत चिंतन करावे. यापुढे विकत आणून जमिनीत सेंद्रिय खत मिसळणे परवडणार नाही.

मोठे क्षेत्र असणाऱ्यांनी २५ टक्के, ३३ टक्के, ५० टक्के क्षेत्र फेराफेराने पड टाकावे. जमीन फुकटात सुपीक करावी. व्यवस्थापनाचे काम सोपे करावे.

शेती युक्तीने करायला शिका. त्यातून आनंद मिळाला पाहिजे. यासाठी उपलब्ध साहित्याचा अभ्यास सतत करा. नवीन संशोधनाच्या संपर्कात सतत राहा. पिकाची परीक्षा कित्येक पटीने जास्त अवघड आहे. इथे शेतीच्या मशागतीपेक्षा मेंदूच्या मशागतीची जास्त गरज आहे.

प्रत्येक खर्चाला कमी खर्चाच्या पर्यायाचा मार्ग सतत शोधत राहा. यातून यंदाच्या दुष्काळासारख्या संकटाला तोंड देण्याची शक्ती प्राप्त होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT