Soil Health : क्षारपड जमीन सुधारण्याचे तंत्र

Technique Improved of Agriculture :पाणथळ, क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा तंत्रज्ञानाच्या तुलनेमध्ये मोल निचरा पद्धत स्वस्त ठरते. या तंत्रासह योग्य भूसुधारके आणि व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये सुधारणा होते.
Agriculture Technique
Agriculture TechniqueAgrowon
Published on
Updated on

डॉ. श्रीमंत राठोड, डॉ. संग्राम काळे

Agriculture Saline Land : चोपण व क्षारयुक्त-चोपण जमिनीसाठी भूसुधारकांचा वापर

भूसुधारकाची आवश्यकता जाणून घेण्यासाठी प्रयोगशाळेत माती परीक्षण करून घ्यावे. जमिनीमध्ये असलेल्या विविध घटकांनुसार उदा. चुनखडीच्या प्रमाणानुसार कोणत्या भूसुधारकाचा वापर करायचा हे जाणून घ्यावे.

अ) चुनखडीचे प्रमाण कमी असणाऱ्या चोपण व क्षारयुक्त-चोपण जमिनीत विद्राव्य कॅल्शिअमयुक्त जिप्सम आणि कॅल्शिअम क्लोराइड जिप्सम या रासायनिक भूसुधारकांचा वापर करावा.

ब) चुनखडीचे प्रमाण जास्त असणाऱ्या चोपण व क्षारयुक्त - चोपण जमिनीत आम्लयुक्त व आम्ल तयार करणाऱ्या गंधक, विद्राव्य सल्फ्युरिक आम्ल, फेरस सल्फेट, आयर्न पायराइट इ. रासायनिक भूसुधारकांचा वापर करावा.

माती परीक्षण करून जिप्समची गरज ठरविल्यानंतर आवश्यकतेच्या अर्धा भाग जिप्सम पहिल्या वर्षी आणि उरलेला अर्धा भाग जिप्सम २ वर्षांनंतर वापरावा. जिप्सममध्ये १ टक्क्यापेक्षा जास्त सोडिअम ऑक्साइडचे प्रमाण असू नये. जिप्सम पावडर जमिनीच्या पृष्ठभागावरच्या २० सें.मी. थरात चांगली मिसळून घ्यावी. जिप्सममधील कॅल्शिअमची मातीची चिकण कणांना चिकटलेल्या सोडिअमशी प्रक्रिया होऊन तयार झालेले सोडिअम सल्फेट विद्राव्य असल्यामुळे त्याचा जमिनीतून निचरा पद्धतीने निचरा होतो. जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक कमी होतो. जमिनीची भौतिक जडण-घडण सुधारते.

(तक्ता १) चोपण व क्षारयुक्त-चोपण जमिनीसाठी विविध भूसुधारके

भूसुधारके एक टन जिप्समच्या सममूल्य दुसरे भूसुधारक

जिप्सम १.०

गंधक ०.१८

चुना गंधक ०.७५

सल्फ्युरिक आम्ल ०.५७

फेरस सल्फेट १.६२

सेंद्रिय भूसुधारकामध्ये प्रामुख्याने शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इ. सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा.

हिरवळीच्या खतामध्ये धैंचा, ताग व शेवरी इ. चा वापर करावा.

रासायनिक भूसुधारके आणि सेंद्रिय भूसुधारके यांचा संयुक्तपणे वापर केल्यास जमिनीतील सोडिअम पाण्यावाटे निचरा होण्यास मदत होते.

Agriculture Technique
Function of Agriculture Land : जमिनीचे कार्य समजून घेऊ या

क) पिकांची फेरपालट व निवड

जमिनीची समस्या कमी करण्याची दृष्टीने एकच पीक वारंवार न घेता पिकांची फेरपालट करणे आवश्यक असते. (तक्ता २) कायम आडसाली ऊस लावण्यापेक्षा खरीप हंगामात सोयाबीन, भुईमूग यांसारखी पिके घ्यावीत. शिवाय धैंचा, ताग व शेवरी या सारखी हिरवळीची खते देणारी पिके घेतल्यास समस्या कमी होऊ शकते. तसेच जमिनीत सतत काहीतरी पीक घ्यावे. जमीन पडीक ठेवू नये. ज्या वेळी पीक घेणे शक्य नसेल, त्यावेळी बरसिम, लुसर्ण, पॅराग्रास, कर्नाल गवत लावावे. शिवाय क्षार प्रतिकारक्षमता असलेल्या पिकांची निवड करणे फायदेशीर ठरते.

अन्य व्यवस्थापकीय उपाय

ज्या जमिनी उंच सखल आहेत किंवा अति चढ-उताराचे आहेत अशा जमिनीसाठी सपाटीकरण करणे आवश्यक आहे. सिंचनासाठी वापरले जाणारे पाणी मचूळ अथवा खारवट असल्यास ते पारंपारिक सिंचन पद्धतीद्वारे न देता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. पाण्यातील विद्राव्य क्षार २००० मिलिग्रॅम प्रति लिटरपर्यंत असल्यास ते पाणी ठिबक सिंचनासाठी वापरता येते. संचामुळे ओलित होणारे क्षेत्र हे एकमेकांवर २० टक्के झाकले जाणे गरजेचे आहे. तोटीजवळ सतत ओलावा टिकून राहिल्यामुळे खारवट पाण्यातील क्षारांची तीव्रता कमी होते. त्याकरिता ठिबकच्या तोटीजवळ पिकाची लागवड करणे फायदेशीर ठरते.

जमिनीची मशागत खोलवर करावी. त्यामुळे हवा खेळती राहून पाणी मुरण्याची क्षमता वाढते. पृष्ठभागावरील क्षार खोलवर जाण्यास मदत होते. त्यासाठी मोल नांगर/सबसॉयलर सारखे अवजार वापरावे. क्षार व चिबड जमिनीत नत्राचा बऱ्याच प्रमाणात ऱ्हास होत असल्यामुळे नत्र खताची मात्रा शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त देणे फायद्याचे ठरते. त्याशिवाय अशा जमिनीत स्फुरद, लोह व जस्ताची कमतरता सुद्धा आढळते. त्यासाठी कंपोस्ट खतासोबत रासायनिक खते वापरणे गरजेचे आहे.

क्षारपड जमिनी शक्यतो मोकळ्या ठेवू नयेत. कारण जमिनीच्या खालच्या थरातील क्षार बाष्पीभवनामुळे पृष्ठभागावर येतात. हे टाळण्यासाठी उसाचे पाचट, गव्हाचा भुस्सा, पालापाचोळा इ. चे आच्छादन करावे.

मोल निचरा पद्धत

पाणथळ व क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र त्यासाठी एकरी रु. ६० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. अल्प आणि अत्यल्प भूधारकांना इतका खर्च झेपणारा नसल्यामुळे या पद्धतीचा वापर केला जात नाही. यावर उपाय म्हणून २०११-१२ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मोल निचरा प्रणालीची शिफारस केली आहे. या तंत्रासाठी एकरी रु. २५०० खर्च येतो. हे तंत्र मध्यम ते भारी काळ्या कमी निचऱ्यांच्या पाणथळ व क्षारयुक्त जमिनीमध्ये वापरता येते. मोल नांगराद्वारे ट्रॅक्टरच्या अश्‍वशक्तीनुसार पृष्ठभागापासून ४० ते ७५ सें.मी. खोलीवर पाइपसारखे पोकळ आडवे छिद्र पाडले जाते. यालाच ‘मोल’ असे म्हणतात.

Agriculture Technique
Agriculture Land : शेतजमीन हस्तांतरण प्रक्रिया होणार सुलभ

मोल निचरा कार्य प्रणाली

सततच्या नांगरटीमुळे निर्माण झालेल्या कठीण थराच्या आणि कमी निचरा क्षमता असणाऱ्या मध्यम ते भारी काळ्या (चिकण मातीचे प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा जास्त) जमिनीमध्ये मोल निचरा पद्धत उपयुक्त ठरते.

नैसर्गिक उताराच्या (०.२ टक्का ते १.५ टक्का) जमिनीमध्ये उताराच्या दिशेने मोल नांगर वापरावा.

दोन मोलमध्ये १२ फूट आणि खोली १.५ ते २.५ फूट ठेवावी.

मोल करताना १.५ ते २.५ फूट खोलीवरील मातीमध्ये ओलाव्याचे प्रमाण २५ ते २८ टक्के असावे. (नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये मोल पाडणे.)

मोल नांगर तीन वर्षांतून एकदा वापरावा.

मोल नांगर वापरल्यानंतर ८ ते १५ दिवसांनी मशागत करावी. त्यामुळे मोल नांगराने झालेले छिद्र वाळण्यास पुरेसा अवधी मिळून ते टणक बनतील.

मोठा पाऊस पडल्यानंतर जमिनीतील मोल नांगराने जमिनीमध्ये पडलेल्या फटीतून व दोन मोलमधील भागात पडलेल्या भेगांमुळे (Cracks) पाझरून मोलमध्ये जमा होते. ते जमिनीच्या उताराच्या दिशेने जमिनीबाहेर वाहून जाते. त्यामुळे जमिनीला वाफसा लवकर येतो.

(तक्ता २) क्षार व चोपण जमिनीसाठी पिकांची संवेदनशीलता

पिकाचा प्रकार क्षार संवेदनशील मध्यम संवेदनशील जास्त सहनशील

अन्नधान्ये पिके उडीद, तूर, हरभरा, मूग, वाटाणा, तीळ गहू, बाजरी, मका, भात, मोहरी, करडई, सोयाबीन, एरंडी, सूर्यफूल, जवस ऊस, कापूस, भात व ज्वारी.

भाजीपाला पिके चवळी, मुळा, श्रावण घेवडा कांदा, बटाटा, कोबी, टोमॅटो, गाजर पालक, शुगरबीट

फळबागा पिके आंबा, लिंबूवर्गीय फळझाडे चिकू, पेरू, डाळिंब, अंजीर, द्राक्षे नारळ, बोर, खजूर, आवळा

वन पिके साग, सिरस, चिंच लिंबू, बाभूळ विलायती बाभूळ, सुरू, सिसम, निलगिरी

चारा पिके ब्ल्यू पॅनिक, पांढरे व तांबडे क्लोव्हर पॅरागवत, जायंट गवत, सुदान गवत लसूणघास, बरसिम ऱ्होडस गवत, बरमुडा गवत, करनाल गवत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com