
सूर्यकांत नेटके
Sanjay Vakchaure : डोंगरगाव (ता. अकोले, जि. नगर) येथील संजय वाकचौरे यांनी घरच्या घरी सेंद्रिय खतांची निर्मिती आणि वापर यातून आपल्या ११ एकर रासायनिक अवशेषमुक्त सेंद्रिय शेतीला चालना दिली आहे. मातीची सुपीकता जपताना डाळिंब, लिंबू, ऊस आदी पिकांचे दर्जेदार उत्पादनही घेतले आहे.
नगर जिल्ह्यातील अकोले हा आदीवासी बहुल व निसर्गसंपन्न तालुका आहे. मूळ पिंपळगाव निपानी येथील संजय देविदास वाकचौरे कुटुंबाची डोंगरगाव येथे ११ एकर शेती आहे. देविदास शेती सांभाळून ट्रॅक्टर चालवतात. पंधरा वर्षांपासून संजय यांनी शेती पाहण्यास सुरुवात केली. वडिलांसह आजी जनाबाई, आई सिंधूबाई, पत्नी भारती अशा कुटुंबातील सर्वांचे त्यांना सहकार्य मिळते. सर्व जण शेतीत राबतातही. त्यामुळे बाहेरील मजूर ठेवण्याची गरज भासलेली नाही.
अवशेषमुक्त शेतीचे प्रयत्न
संजय यांनी २०१५- १६ पासून रासायनिक पद्धतीचा वापर पूर्णपणे बंद करून सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. उत्पादन खर्च कमी करणे, आरोग्यदायी अन्न तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यादृष्टीने घरच्या घरी सेंद्रिय खतांची निर्मिती व वापर सुरू केला आहे. अकरा एकरांपैकी काही क्षेत्रात लिंबू व डाळिंब मिश्रफळबाग, दोन एकर लिंबू, पाच एकर डाळिंब, एक एकर सफरचंद व एक एकर ऊस आहे. सन १९८५ मध्ये अकोले तालुक्यात माझ्या वडिलांनी सर्वप्रथम डाळिंबाची दीड एकरांत लागवड केली असे संजय सांगतात. तेव्हापासून डाळिंब शेती सुरू आहे. गांडूळ खताचा वापरही तेव्हापासून सुरू आहे. डाळिंबाची बारा बाय दहा फूट अंतरावर पूर्वी लागवड होती. अलीकडे ती १३ बाय ५ फूट अंतरावर केली आहे. मृग बहर व आंबे बहर प्रत्येकी दोन एकर व उर्वरित हस्त बहर असतो. त्याचा फायदा म्हणजे बाजारातील दरांच्या चढ-उतारात फायदा होतो. आर्थिक नुकसान टाळता येते.
सेंद्रिय खतनिर्मिती व व्यवस्थापन
-सुमारे सहा छोट्या व सहा मोट्या युनिटद्वारे वर्षाला ५ ते ६ टन गांडूळ खताची निर्मिती.
-ते बनविताना शेणखतासोबत कडुनिंब, गुळवेल, केळीखुंट, सीताफळ, निरगुडी, कोरफड, गोरतूर आदींच्या पाल्याचा वापर.
-महिन्याला सुमारे दोन हजार लिटर व्हर्मिवॉशची उपलब्धता. एकरी पंचवीस लिटर ठिबकद्वारे महिन्यातून एकदा फळबागेला त्याचा वापर. फवारणीतूनही वापर.
-गांडूळ खताची निर्मिती खुल्या जागी डेपोतही.
-महिन्याला ५० किलो गांडूळ कल्चर उपलब्ध होते. तीनशे रुपये प्रति किलो दराने महिन्याला ३० किलोपर्यंत विक्री.
-डाळिंब, लिंबाच्या प्रत्येक झाडाला दरवर्षी ८ ते १० किलो गांडूळ खताचा तर २५० ग्रॅम कोंबडीखताचा वापर.
-पाचशे लिटरची टाकी. ती जमिनीत निम्मी गाडली आहे. त्यात जिवामृत तयार केले जाते.
-स्लरी निर्मितीच्या प्रत्येकी २५० लिटरच्या सात टाक्या. शेण, बेसन पीठ, गूळ, ताक, दही, आदींपासून स्लरी ४५ दिवसांनी तयार होते. झाडाच्या बुंध्यात दोन्ही बाजूंना वापर.
-खुरपणी करून मिळणाऱ्या तणांचा वा गवतापासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
गोपालन
वाकचौरे कुटुंब पूर्वी एक- दोन गायींचे पालन करायचे. मात्र सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊ लागल्यानंतर शेणखत, गोमूत्र व पूरक दुग्ध
व्यवसायासाठी गायींच्या संख्येत वाढ केली. चार गुंठ्यांत मुक्त संचार पद्धतीचा गोठा असून आजमितीला ११ गायी आहेत.
शेतीला झाले फायदे ः
-रासायनिक खतांवरील खर्च व एकूणच शेतीतील खर्चात मोठी बचत झाली.
-भगवा डाळिंबाचे प्रति झाड ३० किलो ते त्यापुढे तर साई सरबती लिंबाचेही तेवढे उत्पादन मिळते.
-डाळिंबाला किलोला ७५ रुपयांपासून १२५ ते १५० रुपये तर लिंबाला उन्हाळ्यात कमाल २०० ते २५० रुपये प्रति किलो दर मिळतो.
-सेंद्रिय पद्धतीमुळे तेलकट डाग रोगाचा कोणत्याही डाळिंब झाडाला प्रादुर्भाव नाही. झाडाचे आयुष्यमान व फळांची टिकवणक्षमता वाढली.
-दिल्ली, नाशिक बाजारांत डाळिंब, तर अकोले व गुजरातेत लिंबाची विक्री. डाळिंबाची चकाकी, आकार, रंग चांगला असल्याने व्यापाऱ्यांकडून नेहमीच पसंती.
अन्य प्रयोग
-हिमाचल प्रदेशातून सफरचंदाची रोपे आणून एक एकरात लागवड. झाडांना फळे चांगल्या प्रकारे लगडली असून, येत्या ऑगस्टमध्ये काढणीचे नियोजन.
-उसाचे एकरी ८० टनांपर्यंत उत्पादन. यंदा निडवा ठेवला आहे.
-शेणखपासून बायोगॅस निर्मिती. त्यातून सिलिंडरच्या वापरात व खर्चात बचत.
-बांधावर नारळ लागवड. वर्षाला पन्नास हजारांचे उत्पन्न.
-ॲपल बेरचे काही वर्षे उत्पादन घेत चांगले उत्पन्न मिळवले. मोहरी, बडीशेप, ओवा यांचे फळबागेत आंतरपीक घेतले.
- ‘आत्मा’चे तालुका समन्वयक बाळनाथ सोनवणे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांचे मार्गदर्शन. कृषी आयुक्त धीरजकुमार, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोऱाळे, तत्कालीन कृषी उपसंचालक रवींद्र माने, पद्मश्री राहीबाई पोपेरे, आमदार किरण लहामटे, माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांकडून शेतीला भेटी.
--------
संपर्क ः संजय वाकचौरे, ९८६०९३२७७४
---------
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.