ॲग्रो विशेष

Farmer Awareness: दक्ष राहूया, फसवणूक अन् नुकसान टाळूया !

Agri Input Fraud: बाजारपेठेत कृषी निविष्ठांची प्रचंड मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे. सल्लागारांची संख्याही कमी नाही. अशावेळी फसवणूक झाल्यास शेतीसह मोठ्या आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.

मंदार मुंडले 

मंदार मुंडले

Agricultural Advisory: बाजारपेठेत कृषी निविष्ठांची प्रचंड मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे. सल्लागारांची संख्याही कमी नाही. अशावेळी फसवणूक झाल्यास शेतीसह मोठ्या आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उत्पादनांचा शास्त्रीय, कायदेशीर व एकूणच सर्वांगीण अभ्यास करूनच त्यांची निवड व वापर याबाबत कायम सतर्क असणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे झाले आहे.

सध्या बाजारपेठेत कीडनाशके, खते, वाढ नियंत्रके, जैव उत्तेजके, संजीवके आदी उत्पादनांचे प्रचंड पेव फुटले आहे. भरमसाठ दावे होतात. कोणी म्हणते आमचे उत्पादन कायदेशीर कक्षेत येत नाही. जैविक, सेंद्रिय आहे. कोणी म्हणते आमचे उत्पादन वनस्पतींचा अर्क आहे. पिकाला, मातीला नुकसान होत नाही. त्याचे अवशेष मालात राहत नाहीत. कोणी सांगते आमच्या उत्पादनामुळे फळाला चकाकी येते. आकार वाढतो. फुलगळ थांबते. खतांचा अपव्यय थांबतो. व्हायरस, लाल कोळी कंट्रोल होतो. कोणी उत्पादनाला भारतीय प्रमाणीकरण संस्थेचे, कोणी आंतररराष्ट्रीय किंवा आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा करतो.

सल्लागारांचे उदंड पीक

सल्लागारांचे (कन्सल्टंट) तर उदंड पीक आले आहे. काहीजण आपल्याकडे विविध पिकांचे ‘रेडिमेड शेड्यूल’ असून, मोफत किंवा नाममात्र शुल्कात उपलब्ध असल्याचे सांगतात. व्हॉट्‍सॲप ग्रुप, फेसबुकवर शेतकरी समस्या मांडतो. त्याला दहा सल्लागार दहा उत्तरे देतात. प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असते. शेतकऱ्यांच्या व्हॉट्‍सॲप ग्रुपवर कंपन्यांचे प्रतिनिधी असतात. शेतकऱ्याने समस्या मांडली रे मांडली, की आपल्या कंपनीकडे ही समस्या दूर करणारी कशी प्रभावी उत्पादने आहेत याबाबत ते मार्गदर्शन सुरू करतात.

परराज्यांतील काही कंपन्या ऑनलाइन पद्धतीने उत्पादनांची जाहिरात व महाराष्ट्रात विक्री करीत आहेत. महाराष्ट्रात कोणी वितरक नसल्याचे ते सांगतात. काही तज्ज्ञ- सल्लागारांना कोणते उत्पादन कोणत्या पिकात बॅन झाले आहे याचीही माहिती नसते. एखाद्या उत्पादनाची शिफारस करतेवेळी त्या पिकात त्याचे लेबल क्लेम आहे का याचा विचारही ते करीत नाहीत. फवारल्यानंतर त्याचे संबंधित पिकात किती दिवस अवशेष राहणार हे त्यांना माहीत नसते. काही सल्लागार रसायनांची वेगवेगळी ‘कॉम्बिनेशन्स’ सांगतात.

काही वेळा शेतकरी पान, फूल, फळ यापैकी नुकसानीचे लक्षण दाखवणारे छायाचित्र शेअर करतो. काही तज्ज्ञ त्याचे निदान करून आपलेच निदान कसे योग्य आहे ते सांगून उपायही सुचवतात. अनेक वेळा असे निदान चुकल्याचे व पर्यायाने त्यावरील उपाय व्यर्थ ठरल्याचे आढळले आहे. अनेकांना किडी-रोगांची लक्षणे, मित्रकीटक व शत्रूकीटक, त्यांच्या अवस्था यातील फरक ओळखता येत नाही. मात्र अपुऱ्या ज्ञानाधारे चुकीचे सल्ले दिल्याने शेतकऱ्याची दिशाभूल होते. संपूर्ण पीक जळून जाणे, स्कॉर्चिंग येणे, फळगळ होणे, विषबाधा होऊन जिवावर बेतणे अशा घटना घडल्या आहेत.

ज्या पिकावर ज्या तणनाशकाची शिफारस नाही त्याची शिफारस व चुकीचा डोस सांगितल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण पीक गमवावे लागले आहे. अर्थात बाजारात विश्‍वासपात्र, गुणवत्ताप्राप्त कंपन्या, उत्पादने, अनुभवी, तज्ज्ञ- सल्लागारही कार्यरत आहेत. नावीन्यपूर्ण उपयुक्त तंत्रज्ञान, संशोधनही सादर होत आहे. मात्र या मायाजालात या सर्वांचा ठाव लागणे व त्यांची निवड करणे सोपी बाब नसते.

गैरप्रकारांची राज्यातील निवडक उदाहरणे

सोलापूर जिल्ह्यात नामांकित कंपनीच्या म्युरेट ऑफ पोटॅश खतामध्ये सोडिअम क्लोराइडची (मीठ) २६ टक्क्यांपर्यंत भेसळ. शेताच्या नुकसानीबरोबर मोठा आर्थिक फटकाही बसला.

विद्राव्य खतांमध्ये विविध रंगांचे मिश्रण. काही सेंद्रिय खतांमध्ये माती मिसळण्यात आली होती.

विना परवाना, अप्रमाणित ग्रेड्‍स. सिलिकॉनयुक्त तसेच मिश्रखतात भेसळ. तीन कोटींहून अधिक किमतीच्या मालाची जप्ती. बोगस विक्रेत्यांचे रॅकेट उघडकीस.

प्रसिद्ध कंपनीचे पोटॅश खत असल्याचे भासवून नांदेड जिल्ह्यात बोगस खताच्या हजार बॅग्जची विक्री. प्रयोगशाळा अहवालात त्या खतात पोटॅशचे प्रमाण आढळले शून्य टक्का.

सोलापूर भागात ७६ लाखांच्या बोगस मुद्देमालाची जप्ती. यात झिंक, बोरॅान, पोटॅशिअम हयुमेट, कॉपर सल्फेट अशी लेबल असलेल्या उत्पादनांचा समावेश.

चंद्रपूर जिल्ह्यात काही मिरची उत्पादकांनी कृषी सेवा केंद्रातून नामांकित कंपनीची १८- ४६- ०, १०:२६:२६ ही खते घेतली. त्यात रासायनिक घटकांचे प्रमाण संमत पातळीपेक्षा अत्यंत कमी आढळले.

१८- ४६- ० असे लिहिलेल्या खतात आढळले सिंगल सुपर फॉस्फेट. उसाच्या मळीवर आधारित घटकांचा त्यात होता समावेश.

युरोपला भेंडी, कारल्याची निर्यात करणाऱ्या महाराष्ट्रातील एका कंपनीने आठ शेतीमाल नमुने प्रयोगशाळेतून तपासून घेतले. त्यात न फवारलेल्या अबामेक्‍टीन व इमामेक्‍टीन बेंझोएट या रासायनिक कीटकनाशकांचे अवशेष आढळले. कंपनीने वापरलेल्या जैविक कीडनाशकांमध्ये या दोन रासायनिक कीडनाशकांची भेसळ झाल्याचे त्यातून सिद्ध झाले.

‘आयसीएआर’चे ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी यांनी आंध्र प्रदेश, हरियाना व महाराष्ट्रातील कृषी सेवा केंद्रांमधून २० जैविक कीडनाशकांचे मान्यताप्राप्त प्रयोगाशाळेतून पृथक्करण करून घेतले. पैकी १९ उत्पादनांची नोंदणी किंवा प्रक्रिया ‘सीआयबीआरसी’कडे झाली नसल्याचे आढळले. जैविक असा दावा केलेल्या या उत्पादनांमध्ये एक किंवा एकाहून अधिक रासायनिक बुरशीनाशके, कीटकनाशके, कोळीनाशकांची भेसळ आढळली.

डोळ्यात तेल घालून उत्पादन तपासा

बाजारपेठेत ज्या निविष्ठा उपलब्ध आहेत त्या मुख्यत्वे पुढील चार मुख्य प्रकारांमध्ये येतात. हे चारही प्रकार कायदेशीर कक्षेत येतात. त्यांना लेबल क्लेम असणे बंधनकारक असते. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी उत्पादनांचे प्रकार, त्यांचा सर्वांगीण अभ्यास महत्त्वाचा आहे.

कायद्याच्या कक्षेतील निविष्ठांचे मुख्य प्रकार

मुख्य प्रकार १- कीडनाशके

(कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके)

कायदेशीर नियंत्रण- केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड ॲण्ड रजिस्ट्रेशन कमिटी (सीआयबीआरसी) यांच्या अंतर्गत.

कीडनाशकांचे नोंदणीकरण करणे कंपन्यांना बंधनकारक.

एकच सक्रिय घटक असलेली (सोलो) दोन सक्रिय घटकांचे मिश्रण असलेली कीटकनाशके (कॉम्बिनेशन) कीटकनाशक व बुरशीनाशक यांचे संयुक्त मिश्रण अशी ही विस्तृत श्रेणी.

मुख्य प्रकार २- खते- अन्नद्रव्ये

केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर (एफसीओ) या कायद्याच्या कक्षेत खते येतात.

त्यांचे पुढील विविध शेड्यूलमध्ये वर्गीकरण केले आहे.

शेड्यूल एक अंतर्गत खते

मुख्य अन्नद्रव्ये- एनपीके- नत्र- स्फुरद- पालाश युक्त. सरळ व संयुक्त.

सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये

चिलेटेड, स्पेशालिटी ग्रेड

शेड्यूल दोन अंतर्गत खते

जैविक खते (Bio Fertilisers)- सूक्ष्मजीवांवर आधारित. (जिवाणू संवर्धके) उदा. ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, मायकोऱ्हायझा, लिक्विड कॉन्सॉर्शिया (एकाहून अधिक सूक्ष्मजीवांचा समावेश.)

शेड्यूल चार अंतर्गत खते

सेंद्रिय खते (Organic Fertilisers) उदा. सिटी कंपोस्ट, गांडूळ खत, फॉस्फेटयुक्त सेंद्रिय खत (प्रोम)

शेड्यूल पाच अंतर्गत खते

अखाद्य पेंडी. उदा. एरंड, निंबोळी पेंड

शेड्यूल सहा अंतर्गत नॅनो खते

उदा. नॅनो युरिया, नॅनो झिंक

मुख्य प्रकार ३ - पीजीआर

(Plants Growth Regulators)

कायदेशीर नियंत्रण- सीआयबीआरसी

सध्या २६ पीजीआर नोंदणीकृत.

उदा. क्लोरमेक्वाट क्लोराइड, इथेफॉन, ट्रायकॉन्टॅनॉल, पॅक्लोब्युट्राझोल, हायड्रोजन सायनामाइड,

नायट्रोबेंझीन, जिबरेलिक ॲसिड

मुख्य प्रकार ४- जैव उत्तेजके (बायो स्टिम्युलंट्‍स)

फर्टिलायझर्स कंट्रोल ऑर्डर (एफसीओ) अंतर्गत शेड्यूल सहा या कायद्याच्या कक्षेत ही उत्पादने आली आहेत.

सध्या तात्पुरत्या (Provisional) स्वरूपातील परवाना प्रक्रिया.

जैव उत्तेजकांचे पुढील नऊ प्रकारांत वर्गीकरण केले आहे.

१) वनस्पतिजन्य अर्क, सागरी तण, शेवाळ अर्क- सी वीड एक्सट्रॅक्ट

२) जैवरसायने- (बायोकेमिकल्स) (सूक्ष्मजीवांच्या चयापचय क्रियेतून तयार झालेली)

३) प्रोटीन हायड्रॉलायसेटस आणि अमायनो ॲसिड्‍स

४) जीवनसत्वे- व्हिटॅमिन्स

५) सेल फ्री मायक्रोबियल उत्पादने- रोग नियंत्रक सूक्ष्मजीवांव्यतिरिक्त अन्य सूक्ष्मजीवांवर आधारित अर्क. (ज्यात जिवंत पेशींचा समावेश नाही)

६) बाष्पीभवन टाळणारे घटक- अँटी ट्रान्स्पिरंट्‍स

यात कार्य करण्याच्या पद्धतीनुसार दोन प्रकार.

उदाहरणे- ॲबसिसिक ॲसिड, कायटोसॅन, कॅल्शिअम कार्बोनेट, कॅल्शिअम ऑक्साइड, पोटॅशिअम सल्फेट

७) अँटी ऑक्सिडंट्‍स- उदा. फिनॉलिक ॲसिड्‍स, फ्लॅव्होनॉइड्‍स, अँथोसायनिन्स

८) ह्युमिक ॲसिड, फल्व्हिक ॲसिड.

९) नववा प्रकार अलीकडेच समाविष्ट. जैविक खत किंवा जैविक नियंत्रक असलेल्या सूक्ष्मजीवांव्यतिरिक्त अन्य सजीव सूक्ष्मजीव.

मुख्य प्रकार ५ : अन्य सर्व

चार मुख्य प्रकारांमध्ये ज्या घटकांचा समावेश अद्याप झालेला नाही त्यांना सोयीसाठी पाचवा प्रकार असे संबोधूया. उदा. मित्रसूत्रकृमींवर आधारित कीटकनाशक (ईपीएन) हा जैविक घटक काही कंपन्यांनी बाजारात आणला आहे. सध्या तरी तो कायद्याच्या कक्षेत नाही. हुमणीचे नियंत्रण करण्यासाठी हा सूत्रकृमी उपयोगी मानला जातो.

सीआयबीआरसी अंतर्गत नोंदणीकृत एकूण उत्पादनांची संख्या- ९४६ (३१ मार्च २०२४ नुसार)

उत्पादन घेण्यापूर्वी काय तपासावे?

(कंपनीला कोणत्या गोष्टी विचाराव्यात?)

उत्पादन जैविक, सेंद्रिय आहे तर त्यातील सक्रिय घटक किती व कोणते आहेत? त्यांचे प्रमाण १०० टक्क्यांमध्ये किती आहे?

सक्रिय घटक कोणत्या स्त्रोतांमधून मिळवला आहे? उदा. वनस्पती अर्क, सूक्ष्मजीव, खनिज

तुमचे उत्पादन कोणत्या कायदेशीर प्रकारांमध्ये येते? (वर उल्लेखलेल्या चार प्रकारांपैकी) संबंधित केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या विभागाकडे त्याची नोंदणी केली आहे का? उत्पादनावर तसा नोंदणी क्रमांक आहे का?

राज्य कृषी विभागाचा विक्री परवाना आहे का?

आपल्या उत्पादनांना कोणकोणत्या पिकांमध्ये लेबल क्लेम आहे? ज्या पिकासाठी उत्पादन घेऊन आला आहात त्यासाठी त्याचे लेबल क्लेम आहे का?

आपले उत्पादन पिकात किंवा मातीत कसे कार्य करते? कसा परिणाम दाखवते. थोडक्यात त्याची मोड ऑफ ॲक्शन काय आहे?

उत्पादनाला पीएचआय (काढणीपूर्व प्रतीक्षा काळ) आहे का? असल्यास किती दिवसांचा व नसल्यास का नाही?

आपल्या उत्पादनाच्या चाचण्यांचे निष्कर्ष, संशोधन याविषयी शास्त्रीय पुरावे, अहवाल (सायंटिफिक डॉक्युमेंट्‍स) देऊ शकता का?

या गोष्टी जरूर तपासाव्यात

उत्पादनात सूक्ष्मजीवांचा समावेश असल्यास त्यांची प्रजात, स्ट्रेन. स्रोत. (कोठून आणला आहे?) त्यांचा सीएफयू काउंट (कॉलनी फॉर्मिंग युनिट) तपासावा.

नामांकित कंपन्यांचीच उत्पादने घ्यावीत. केवळ स्वस्त दरांमागे जाऊ नये.

पॅकिंगवरील निर्मितीची तसेच अंतिम तारीख, निर्मिती करणारी कंपनी, पत्ता, मार्केटिंग करणारी कंपनी वेगळी असल्यास नाव- पत्ता, उत्पादनाचा बॅच क्रमांक तपासावा.

क्यूआर कोड स्कॅनिंगद्वारेही उत्पादनाची विश्‍वासार्हता तपासता येते.

पक्के बिल घ्यावे. मोबाइलद्वारे स्कॅनिंग करूनही ते संग्रहित ठेवता येईल.

उत्पादनाला पेटंट असल्याचा दावा केल्यास त्याची केवळ नोंदणी केली आहे की ते मिळण्याच्या प्रक्रिया अवस्थेत आहे हे पाहावे. पेटंटचे प्रमाणपत्र, पेटंट देणारी संस्था केंद्र सरकारची आहे की अन्य कोणती याचीही पडताळणी करावी.

फसवणूक झाल्याचे आढळल्यास नजीकचे कृषी विभाग कार्यालय, जिल्हा परिषद कृषी विभाग, शासनाच्या कृषी विभाग- गुणवत्ता नियंत्रण यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल करावी. तसेच ‘ॲग्रोवन’सारख्या प्रसारमाध्यमांशाही त्वरित संपर्क साधू शकता.

सेंद्रिय व रेसिड्यू फ्री शेतीतील समस्या, आव्हाने

सेंद्रिय शेतीत किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने प्रतिबंधक (प्रिव्हेंटिव्ह) उपाय उपलब्ध. ‘क्युरेटिव्ह’ (निवारणात्मक) कीडनाशकांचा अभाव. किडी- रोगांचा ‘हेवी ॲटॅक’ किंवा उद्रेक झाल्यास प्रभावी उपाय करणे अवघड होते. उदा. डाऊनी, पावडरी मिल्ड्यू, रसशोषक किडी, व्हायरस, स्पोडोप्टेरा लिट्युरा, स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा.

हवामानातील सातत्याने बदल, अवकाळी पाऊस आदी नैसर्गिक आपत्तींमुळे किडी-रोगांचे ‘प्रेशर’ वाढले आहे. भाजीपाल्यासारखी पिके बिगरहंगामी किंवा वर्षभरही शेतात दिसत आहेत. त्यामुळे किडींना वर्षभर खाद्य उपलब्ध होत आहे. त्यामुळे फवारण्याही वाढल्या आहेत. दुसरीकडे बाजारपेठेत नव्या तंत्रज्ञानाची कीडनाशके सादर होत आहेत. ‘मोड ऑफ ॲक्शन पद्धतीने किंवा अचूक वापर न झाल्यास किडींमध्ये प्रतिकारक्षमता विकसित होऊन चांगली कीडनाशकेही प्रभावहीन होतात.

सेंद्रिय शेतीत तणनाशके उपलब्ध नाहीत. क्षेत्र १० एकरांपेक्षा अधिक आहे त्या ठिकाणी तसेच मोठा पाऊस होऊन गेल्यानंतर वाढलेले तण मजुरांकरवी नियंत्रित करणे अवघड असते. मजूर उपलब्धही होत नाहीत. अशावेळी तणनाशक हाच पर्याय असतो.

मित्रकिटक, मधमाश्‍यांची संख्या कमी होत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. अशावेळी मित्रकीटकांचे प्रसारण केल्यानंतर ते त्यांच्या शेतातून शेजारील शेतकऱ्याच्या शेतात स्थलांतर करतात. त्यामुळे अपेक्षित रिझल्ट येत नाही. त्यासाठी स्पेनमधील अल्मेरिया प्रांताप्रमाणे मॉडेल राबविण्याची संकल्पना राबवणे उपयुक्त ठरू शकते.

निर्यातक्षम द्राक्षात ॲनेक्शर पाच व अनेक्शर नऊ प्रमाणे लेबल क्लेम, पीएचआय व एमआरएल नुसार दरवर्षी कामकाज होते. अशी प्रणाली व ट्रेसेबिलिटी यंत्रणा भारतीय ग्राहकांसाठीही (देशांतर्गत) फळे, भाजीपाला व एकूणच शेतीमालासाठी विकसित होण्याची गरज आहे

विविध पिकांमध्ये विविध कीडनाशकांचे लेबल क्लेम कमी आहेत. त्यामुळे कीडनाशक फवारणीची वेळ, मात्रा व त्यांचे अंश किती काळ पिकात राहणार त्याची कल्पना येत नाही.

दशपर्णी अर्क, जिवामृत किंवा तत्सम र्सेद्रिय निविष्ठांचे कृषी विद्यापीठे, संशोधन संस्थांकडून सायंटिफिक व्हॅलिडेशन होणे गरजेचे आहे. त्यांच्या वापराबाबत कृषी विद्यापीठांच्या अद्याप शिफारशी नाहीत. त्यामुळे कोणत्या पिकांवर काय रिझल्ट येतात, फायदे, साइड इफेक्ट्स याबाबतचे शास्त्रीय निष्कर्ष समजत नाहीत.

रेसिड्यू फ्री शेतीमाल मार्केट समस्या

सेंद्रिय मालाच्या बाजारपेठा शहरांमधून फार विकसित झालेल्या नाहीत. सेंद्रिय किंवा रेसिड्यू फ्री माल नियमित बाजारपेठांमध्येच व अन्य शेतमालांच्या दरांप्रमाणेच शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. थोडक्यात त्याला अपेक्षित उच्च दर मिळत नाही.

सेंद्रिय मालाविषयी ग्राहकांच्या मनात अनेक शंका असतात. अशावेळी सेंद्रिय, रेसिड्यू फ्री शेतीच्या संकल्पना, त्यांच्यातील फरक, पीएचआय, आपल्या मालाची गुणवत्ता आदी विविध बाबींविषयी ग्राहकांचे प्रबोधन करणारी ‘फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स’ (एफएक्यूज) प्रश्‍नावली तयार करून ग्राहकांना सादर केल्यास आपल्या मालाविषयी विश्वासार्हता वाढण्यास व ग्राहक कायमचा आपला होण्यास मदत होईल.

सेंद्रिय फळे- भाजीपाला आदी नाशवंत माल दररोज पुरवू शकू अशी शेतकरी- ग्राहक थेट विक्री साखळी यंत्रणा फार विकसित नाही. अशा यंत्रणेत उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्यांना परवडतील असे दर निश्‍चित करणे आव्हानात्मक असते.

मोठ्या शहरांमध्ये ऑरगॅनिक स्टोअर्स- मॉल पाहण्यास तरी मिळतात. मात्र रेसिड्यू फ्री मालासाठी अशी स्टोअर्स किंवा स्वतंत्र बाजारपेठा दिसून येत नाहीत.

रेसिड्यू फ्री मालाचे स्वतंत्र प्रमाणीकरण करणारी यंत्रणा, संस्था दिसत नाही. प्रमाणीकरण करणे, दरवर्षी त्याचे नूतनीकरण हेही शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही.

- मंदार मुंडले ९८८१३०७२९४

(लेखक ‘ॲग्रोवन’चे उपमुख्य उपसंपादक असून रेसिड्यू फ्री शेतीचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT