
Akola News : खरिपासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्यासाठी दर, साठा आदी सर्व बाबींचे सुस्पष्ट फलक, उन्हाळा लक्षात घेऊन विक्री केंद्रांवर सावली, पाणी आदी सुविधा असाव्यात. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले.
जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची आढावा बैठक गुरुवारी (ता.२४) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी महेंद्र साल्के यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कृषी निविष्ठा विक्रेते आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले, की कृषी निविष्ठांची सार्वत्रिक मुबलक उपलब्धता असावी. त्याचप्रमाणे, कुठेही चढ्या दराने विक्री, साठेबाजी होता कामा नये. दुकानांवर निविष्ठांचे दर, उपलब्ध साठा माहितीचे सुस्पष्ट फलक असणे आवश्यक आहे. सावलीची व्यवस्था, पाणी, सीसीटीव्ही आदी सुविधा असाव्यात. विक्री केंद्रांनी फलक व इतर सुविधा उपलब्ध ठेवल्या किंवा कसे, याबाबत कृषी सहायकांच्या माध्यमातून तपासणी करून सात दिवसांत अहवाल देण्याचे निर्देशही दिले.
‘खते, बियाणे विक्रीत लिंकिंग करू नये’
हंगामासाठी भरारी पथकांनी सुरुवातीपासूनच सजग राहून कार्यवाही करावी. कपाशीच्या बियाण्यात जिल्ह्यात अजित सीड्स वाणाच्या मागणीनुसार साडेतीन लाख पाकिटांची उपलब्धता ठेवावी. खते, बियाणे विक्रीत इतर उत्पादन लिंकिंग करू नये. एका उत्पादनाबरोबर दुसरे उत्पादन घेण्याची बळजबरी करू नये. नियमभंग करणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सव्वा लाख हेक्टरवर असेल कपाशी
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. किरवे यांनी खरिपासाठी कृषी निविष्ठांचे नियोजन सांगितले. त्यानुसार जिल्ह्यात २०२५ मध्ये खरिपाचे ४ लाख ४२ हजार ८०० हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित आहे. यात कापशीचे संभाव्य क्षेत्रफळ १ लाख २७ हजार ३०० हेक्टर राहू शकते.
यासाठी सहा लाख ३६ हजार ५०० पाकिटांची मागणी आहे. मूग. उडीद, सोयाबीन, कपाशी अशी सर्व पिके मिळून ७० हजार ४३४ क्विंटल बियाणे लागणार आहे. सोयाबीनच्या विविध वाणांच्या ९८ हजार ५०० क्विंटल बियाण्याचे नियोजन केले आहे. खतांची मागणी ९३ हजार १०० टन असून ९३ हजार ७९६ टनाचे आवंटन मंजूर केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.