Kili Fish Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Species : किली : शोभिवंत माशाची प्रजात

Kili Fish : किली मासे हे लहान, आकर्षक, रंगीबेरंगी मासे आहेत. निर्यातीसाठी या माशांना मागणी असते. हे मासे टाक्यांमध्ये अगदी सहजपणे इतर माशांच्या प्रजातींसोबत पाळले जाऊ शकतात.

Team Agrowon

महेश शेटकार, डॉ. स्वप्नजा मोहिते

Ornamental Fish Farming : शोभिवंत मासे पालन व संवर्धन याकडे आता स्वयंरोजगाराचे साधन म्हणून पहिले जाते. आज बाजारात शोभेच्या माशांच्या १८०० पेक्षा जास्त प्रजाती उपलब्ध आहेत. त्यातील १००० पेक्षा जास्त जाती गोड्या पाण्यातील आहेत. शोभिवंत माशांच्या खाऱ्या पाण्यातील किंवा निमखाऱ्या पाण्यातील काही मत्स्य प्रजाती मत्स्यालयात ठेवल्या जातात. पण त्यातील खर्चिक बाबी लक्षात घेता, गोड्या पाण्यातील प्रजातींना जास्त प्राधान्य दिले जाते. या व्यवसायात भारताचा वाटा एकूण १ टक्का आहे.

तमिळनाडू, केरळ आणि पश्‍चिम बंगाल राज्यात शोभिवंत मत्स्यशेती केली जाते. स्थानिक जागी उपलब्ध असणाऱ्या शोभिवंत माशांचे संवर्धन, निर्यात तसेच मत्स्यालयासाठी लागणारी विविध उपकरणे पुरवणे यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच हॉटेल, वॉटर पार्क, उद्याने व इतर सार्वजनिक जागी असणारी मत्स्यालयाच्या देखभालीची सेवा पुरवून आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. शोभिवंत माशांची निर्यात हा एक चांगला व्यवसाय सुरु करता येऊ शकतो.

या व्यवसायाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे हा व्यवसाय कमीत कमी भांडवलापासून सुरु करू शकतो. विविध सरकारी संस्थांकडून यासाठी अनेक प्रोत्साहनात्मक योजना उपलब्ध आहेत. लोचेस, बार्ब्स, डॅनियो, गोड्या पाण्यातील शार्क, गौरामी, ग्लास फिश, मोली, गोल्ड फिश, प्लॅटी, स्वॉर्ड टेल, ऑस्कर, डिस्कस, फायटर फिश, एंजेलफिश, टेट्रा इत्यादी प्रमुख शोभिवंत मासे आहेत, जे भारतातून निर्यात केले जातात. यासाठी वेगवेगळ्या मत्स्य प्रजातींचा अभ्यास आणि विचार करणे गरजेचे आहे.

आजार नियंत्रण :

किली मासे हे कणखर मासे आहेत, त्यामुळे सुस्थितीत असलेल्या टाक्यांमध्ये रोगाची समस्या होत नाही. टाकीच्या पाण्याची गुणवत्ता राखली नाही तर1 मखमली आणि इतर जिवाणूजन्य आजार होऊ शकतात. सजावटीच्या वनस्पती, टाकीतील वाळूदेखील आजारास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे टाकीमध्ये मासे सोडण्यापूर्वी व्यवस्थित स्वच्छ आणि निर्जंतुक केले पाहिजेत. नवीन मासे टाकीत सोडण्यापूर्वी त्यांना नेहमी वेगळे ठेवणे आवश्यक असते. पाण्याच्या गुणवत्तेच्या मापदंडांची योग्य देखभाल, टाकीतील वाळू, दगड, मत्स्यालयातील झाडे आणि मासे यांचे योग्य निर्जंतुकीकरण करून आजारास कारणीभूत जिवांचे आक्रमण रोखता येते.

किली माशांचे संगोपन :

शोभेच्या माशांच्या अनेक जाती उपलब्ध असल्या तरी निर्यात क्षमता असलेल्या आकर्षक दिसणाऱ्या प्रजाती निवडल्या पाहिजेत. यामध्ये किली माशांचा उल्लेख करावा लागेल. किली मासे हे लहान, आकर्षक, रंगीबेरंगी मासे आहेत ज्यांचे निर्यात मूल्य चांगले आहे. ते टाक्यांमध्ये अगदी सहजपणे इतर माशांच्या प्रजातींसोबत पाळले जाऊ शकतात. या माशांना चांगली किंमत मिळते. स्थानिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील शोभिवंत मत्स्यपालनासाठी ते योग्य आहेत.

शरीर रचना :

किली मासे हे ॲप्लोचिलीडे कुटुंबातील आहेत. ही प्रजात ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका वगळता जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आढळते. ते प्रामुख्याने उथळ उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय जलीय वातावरणात आढळतात.

हे मासे वेगवेगळ्या आकारांचे आणि सुंदर तेजस्वी असतात. सहा इंच लांबीपर्यंत वाढतात. डोके शीर्षस्थानी सपाट असते. तोंड पृष्ठभागाच्या बाजूला वळलेले असते. यांचे खवले गोलाकार असतात. शरीर निमुळते असल्याकारणामुळे ते जलद पोहू शकतात. नर मोठे, अधिक रंगीबेरंगी, उजळ असतात आणि त्यांचे पंख मादीपेक्षा जास्त टोकदार असतात.

या माशांच्या विविध रंगांच्या जाती आता जगभरात पाहायला मिळतात. मात्र भारतीय जातींचा रंग पिवळसर असतो आणि काही प्रजातींच्या शरीरावर लहान लाल ठिपके असतात.

पाण्याची गुणवत्ता :

माशांची प्रजनन क्षमता, वाढ, आकर्षक रंग आणि आरोग्य हे सर्व पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. यासाठी दर आठवड्याला टाकीतील १० टक्के पाणी बदलण्याची शिफारस केली जाते. पाण्याची गुणवत्ता खराब असल्यास, १०० टक्के बदलणे आवश्यक ठरते.

मखमली आजार :

ओडीनीम प्रजातीच्या जिवाणूंमुळे होतो. यामुळे प्रभावित झालेल्या माशांच्या शरीरावर एक बारीक सोनेरी ते राखाडी आवरण तयार होते. तापमान ३१ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढवून आजारावर उपचार केला जाऊ शकतो. आजारावर उपचार करण्यासाठी ०.२ पीपीएम प्रतिजैविक ऍक्रिफ्लाव्हिन (०.२ टक्का) १ मिलि प्रति लिटर आणि सामान्य मीठ यासारखी रसायने वापरली जाऊ शकतात.

ड्रॉप्सी :

एरोमोनास हायड्रोफिला या जिवाणूमुळे शरीरात अतिरिक्त द्रव साचून शरीर फुगते. हा मूत्रपिंडाचा जिवाणू संसर्ग आहे, ज्यामुळे द्रव साठतो किंवा मूत्रपिंड निकामी होतो.

क्लोरोमायसेटिन (क्लोरॅम्फेनिकॉल) आणि टेट्रासाइक्लिनसारख्या प्रतिजैविकांनी १० मिलीग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या दराने त्यावर उपचार केले जाऊ शकतात.

पर कुजणे :

एरोमोनास हायड्रोफिला आणि स्यूडोमोनास फ्लूरोसेन्स या जिवाणूंमुळे शेपटी किंवा पर कुजतात. त्याच्या लक्षणांमध्ये विखुरलेले पर, उघडलेले पर, परांच्या कडांवर रक्त, परांच्या खाली लाल झालेली जागा, पांढरट झालेले डोळे यांचा समावेश होतो.

क्लोरोमायसेटिन (क्लोरॅम्फेनिकॉल) आणि टेट्रासाइक्लिन वापरून १० मिलिग्रॅम/लिटर पाणी या दराने उपचार केले जाऊ शकतात.

डॉ. स्वप्नजा मोहिते, ९५४५०३०६४२

(मत्स्य जीवशास्त्र विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Factory : वेळेत परवाने दिल्याने ३८ कारखान्यांची धुराडी पेटली

Farmer Producer Organizations : ‘एफपीओं’ना बीजोत्पादनात आणा; केंद्राच्या सूचना

Late Kharif Onion : लेट खरीप कांदा लागवडी १.८२ लाख हेक्टरवर

Onion Crop Damage : शेतकऱ्याने कांद्यावर फिरविला रोटावेटर

Cotton Import : पाकिस्तान ठरला अमेरिकन कापसाचा सर्वांत मोठा आयातदार

SCROLL FOR NEXT