Bhigwan Fish Market : भिगवणच्या बाजारपेठेत मिळतात दर्जेदार मासे

Fish Production : पुणे जिल्ह्यात भिगवण (ता. इंदापूर) येथील माशांची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. उजनी जलाशयाच्या परिसरात मासेमारी व्यवसायाला चांगली चालना मिळाली असल्याने या बाजारपेठेत दररोज विविध प्रकारच्या माशांची मोठी आवक पाहण्यास मिळते.
Fish Market
Fish Market Agrowon
Published on
Updated on

Bhigwan Fish Success Story : पुणे जिल्ह्यात भिगवण (ता. इंदापूर) येथील माशांची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. उजनी जलाशयाच्या परिसरात मासेमारी व्यवसायाला चांगली चालना मिळाली असल्याने या बाजारपेठेत दररोज विविध प्रकारच्या माशांची मोठी आवक पाहण्यास मिळते. येथील ताज्या व दर्जेदार माशांना राज्यासह परराज्यांतील ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. दरवर्षी काही कोटींची उलाढाल या बाजारपेठेद्वारे होत आहे.

पुणे- सोलापूर महामार्गावर दोन्ही जिल्ह्यांच्या हद्दीवर उजनी जलाशय आहे. साहजिकच भिगवण (ता. इंदापूर. जि. पुणे) परिसरात मासेमारी व्यवसाय चांगल्या प्रकारे विकसित झाला आहे. मासे उत्पादकांचा विचार करून भिगवण बाजार समितीने बंदिस्त व सुरक्षित सुविधा असलेली खुली मत्स्य बाजारपेठ संकल्पना १५ एकरांवर राबविली आहे. व्यापाऱ्यांसाठी गाळे आणि माल साठवणूक केंद्रे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे माशांची मोठ्या प्रमाणात आवक होण्यास मदत मिळाली आहे. त्यासाठी बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, आमदार यशवंत माने, उपसभापती मनोहर ढुके यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. बाजाराच्या माध्यमातून मासळी अडते, व्यापारी म्हणून सुशिक्षित बेरोजगार तरुणांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.

मत्स्यबाजाराचे स्वरूप

उजनी जलाशयाच्या परिसरात जवळपास १०० ते २०० मत्स्य व्यावसायिक आहेत. ते मासेमारी करून मासे गोळा करण्याचे काम करतात. या माशांची बाजार समितीत सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात होते. याशिवाय माढा, करमाळा, दौड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, सोलापूर, हैदराबाद, सांगोला, म्हसवड या भागांतील मासेदेखील येथे विक्रीसाठी येतात. परराज्यांतील आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतील अलमट्टी धरणातील मासेही येथे पाहण्यास मिळतात. पावसाळ्यात धरणाला अधिक पाणी असते. पाण्याची पातळी जशीजशी कमी होत जाते तसतशी माशांची उपलब्ध वाढत जाते. बाजारात अडत्यांची संख्या ४० पर्यंत असून, खरेदीदार २०० ते ४०० आहेत. येथील मासे पुढे पुणे, मुंबई, नगर, रत्नागिरी, कर्नाटक, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, गोवा, उत्तर प्रदेश, धुळे, नांदेड, पाटणा आदी ठिकाणी पाठविले जातात. त्यामुळे सर्व सुविधांनी युक्त असलेला ही बाजारपेठ परराज्यांतही प्रसिद्ध झाली आहे.

Fish Market
Fish Farming : शेततळ्यातील मत्स्यपालनास संधी

स्वच्छतेवर अधिक भर

मत्स्य मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या वातावरणात विक्री करता यावी यासाठी दररोज नियमितपणे स्वच्छता केली जाते. त्यासाठी बाजार समितीने काही व्यक्तींची नियुक्ती केली आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारची दुर्गंधी येत नाही. विशेष म्हणजे व्यापारीदेखील स्वच्छतेवर अधिक भर देतात. त्यामुळे खरेदीदारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

दिवसेंदिवस वाढतेय उलाढाल

येथील मार्केटमध्ये सुमारे ४० ते ४२ प्रकारचे मासे विक्रीसाठी येतात यात तिलापिया, राहू, कटला, मृगल, गुगळी, शिंगटा, सायप्रिनस, काणस, मगरी, कोळंबी, सिल्व्हर, बोधवा, सीलन, रूपचंद (हैदराबाद), वाम, सुरमई, पापलेट, बोंबील आदींचा समावेश आहे. प्रति किलो २० रुपयांपासून ते ८०० रुपये किलोपर्यंत त्यांचे दर असतात. साधारणपणे श्रावण महिन्यात मागणी कमी असली तरी दिवाळीनंतर मागणी वाढत जाते. सध्या मार्केटचा विस्तार होत असून वार्षिक उलाढाल काही कोटींच्या घरात आहे.

मासे विक्रीमध्ये आमची दुसरी पिढी कार्यरत आहे. आमच्याकडे सुमारे दहा ते पंधरा प्रकारच्या माशांची दररोज आवक होते. दररोज चार ते पाच टन माशांची विक्री होते. चांगला दर मिळत असल्याने उलाढालही आश्‍वासक होते.
रोहित मांडगे, मत्स्य व्यापारी
Fish Market
Fish Conservation : तलाव, मत्स्य संवर्धनासाठी महिला गटांचा पुढाकार
सध्या आवक कमी असून दररोज एक ते दोन टन मालाची आवक आहे. स्थानिक विक्री होऊन शिल्लक माल परराज्यांत पाठवितो. आमच्याकडे विक्री करणाऱ्या मत्स्यपालकांनाही चांगले उत्पन्न मिळत आहे.
ज्ञानदेव नगरे, मत्स्य व्यापारी
भिगवण येथील बाजारातून मत्स्यपालकांनाकडून लिलावात मासे खरेदी करतो. आमची मच्छी खानावळ असून, सुमारे १२ वर्षांपासून या व्यवसायात आहे. त्यातून चांगल्या प्रकारे आर्थिक प्राप्तीचा स्रोत तयार झाला आहे.
विशाल धुमाळ, भिगवण
मत्स्य व्यवसायाचे मार्केट म्हणून भिगवण बाजार समितीची राज्यभर ओळख आहे. आगामी काळात माशांवर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने प्रकल्प उद्योग उभारता येईल का याचा विचार सुरू आहे. त्यादृष्टीने बाजार समितीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहेत.
तुषार जाधव, सभापती, बाजार समिती, इंदापूर

बाजारातील सुविधा

इंदापूर बाजार समिती अंतर्गत भिगवण येथे उपबाजाराचे कार्य चालते. राष्ट्रीय मत्स्यिकी विकास व महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ यांच्या सहकार्याने मत्स्य विभाग अनुदान योजनेतून सुमारे एक कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम मत्स्य बाजारपेठेसाठी मिळाली आहे. त्यातून घाऊक, किरकोळ, विक्रीच्या दृष्टीने सुसज्ज गाळे, फ्लॅटफार्म, ईटीपी प्लांट’, वीज, पाणी, रस्ते, कुंपण, ‘बर्फ निर्मिती व पॅकिंग युनिट व खराब मासे विल्हेवाट प्रक्रिया युनिट अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांची मुख्य बाजारपेठ असलेले हे सहा ते सात जिल्ह्यांचे मुख्य केंद्र आहे. येथे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था आहे.

संतोष देवकर ९४२३१८८०६४, सचिव, बाजार समिती (इंदापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com