Pink Bollworm Agrowon
ॲग्रो विशेष

Pink Bollworm Management : गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. प्रमोद मगर, डॉ. सुरेश नेमाडे

Pink bollworm Infestation Management : सद्यःस्थितीमध्ये कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक फूल अवस्थेमध्ये असताना प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या किंवा अर्धवट उमललेली फुले आढळून येत आहेत.

त्यासाठी गुलाबी बोंड अळी प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या किंवा अर्धवट उमललेली फुले वेळीच ओळखून नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. नियंत्रणासाठी गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून योग्य उपाययोजना त्वरीत करणे शक्य होते.

नुकसानीचा प्रकार व लक्षणे

अंड्यातून निघालेली अली रंगाने पांढरी, तर पूर्ण वाढलेली अळी गुलाबी रंगाची असते.

अळी फुले व हिरव्या बोंडाचे नुकसान करते. अळीचा प्रादुर्भाव ज्या फुलांमध्ये होतो, ती फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. म्हणून त्यांना ‘डोमअळी’ असे म्हणतात.

अळीचा प्रादुर्भाव कोवळ्या बोंडामध्ये जास्त आढळून येतो.

अंड्यामधून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर छिद्र बंद करून टाकते. त्यामुळे बोंडाचे वरील बाजूने निरीक्षण करूनदेखील अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही. अळी अवस्था बोंडामध्येच पूर्ण होते. पुढे कोषावस्थेत जाण्यासाठी अळी बोंडाला छिद्र पाडून बाहेर पडते.

प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच फुटतात, त्यामुळे कापसाची पोत बिघडते. गुलाबी बोंडअळी बोंडात राहून सरकीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान करते. त्यामुळे बियाण्याची उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होऊन तेलाच्या प्रमाणात घट येते.

एकात्मिक नियंत्रण

माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करणे टाळावे.

शेतामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी किमान दहा पक्षिथांबे उभारावेत.

बोंडअळीग्रस्त फुले किंवा डोमकळ्या तोडून अळीसह नष्ट कराव्यात.

सर्वेक्षणासाठी हेक्टरी ४ ते ५ फेरोमोन (कामगंध) सापळे लावावेत. सापळे पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दीड फूट उंचीवर लावावेत. दोन सापळ्यांमधील अंतर ५० मीटर ठेवावे.

बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ५० मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

सापळ्यात अडकलेले पतंग वेळच्या वेळी नष्ट करावेत.

कापूस पीक पाते व फुलधारणा अवस्थेत असताना किंवा प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या पिकावर दिसू लागताच,

ट्रायकोग्रॅमाटाँयडीया बॅक्ट्री या परोपजीवी मित्र कीटकाची १ लक्ष अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात ४ ते ५ वेळा दर सात दिवसांच्या अंतराने प्रसारण करावेत.

बिव्हेरिया बेसियाना (१.१५ टक्के डब्ल्यूपी) या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाची ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शेतात मुबलक प्रमाणात सापेक्ष आर्द्रता असताना फवारणी करावी)

रासायनिक कीटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणून करावा. फवारणीसाठी पाण्याचा सामू ६ ते ७ दरम्यान असावा.

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिंन्थेटिक पायरेथ्रोइड गटातील कीटकनाशकांचा वापर टाळावा.

रासायनिक व्यवस्थापन

आर्थिक नुकसान पातळी

५ ते १० टक्के कीडग्रस्त पात्या, फुले, बोंडे किंवा

कामगंध सापळ्यात सरासरी ७ ते ८ नर पतंगांचा सलग दोन ते तीन दिवस आढळ.

(फवारणी : प्रति १० लिटर पाणी)

क्विनॉलफॉस (२० टक्के एएफ) २५ मिलि

स्पीनेटोरम (११.७० टक्के एससी) ४.५ ते ९ मिलि

इमामेक्टीन बेन्झोएट* (५ एसजी) ३.८ ते ४.४ ग्रॅम

इंडोक्झाकार्ब* १५.८ टक्के ईसी) ५ ते १० मिली

इंडोक्झाकार्ब* (१४.५ टक्के एससी) ५ मिलि

प्रोफेनोफॉस (५० टक्के) अधिक फेन्प्रोपाथ्रीन (५ टक्के) ईसी ३० मिलि (संयुक्त)

इमामेक्टीन बेन्झोएट (१.५ टक्के) अधिक प्रोफेनोफॉस (३५ टक्के) डब्ल्यूडीजी १४ ग्रॅम (संयुक्त)

इमामेक्टीन बेन्झोएट (१.१ टक्के) अधिक डायफेन्थ्युरॉन (३० टक्के) एससी २० मिलि (संयुक्त)

सायॲन्ट्रानिलीप्रोल (७.३ टक्के) अधिक डायफेन्थ्युरॉन (३६.४ टक्के) एससी १२.५ मिलि (संयुक्त)

फिप्रोनिल (१० टक्के) अधिक डायफेन्थ्युरॉन (३० टक्के) डब्ल्यूडीजी १५ ग्रॅम (संयुक्त)

फिप्रोनिल (१५ टक्के) अधिक इमिडाक्लोप्रिड (५ टक्के) एससी १२ मिलि (संयुक्त)

क्लोरॲन्ट्रानीलिप्रोल* (९.३ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.६ टक्के) झेडसी ५ मिलि (संयुक्त)

सायपरमेथ्रीन* (१० टक्के) अधिक इंडोक्झाकार्ब (१० टक्के) एससी ५ ते १२.५ मिलि (संयुक्त)

क्लोरपायरिफॉस (५० टक्के) अधिक सायपरमेथ्रीन (५ टक्के ईसी) १० ते २० मिलि

इंडोक्झाकार्ब* (१४.५० टक्के) अधिक ॲसिटामीप्रीड (७.७० टक्के) एससी ८ ते १० मिलि (संयुक्त)

फेनप्रोपाथ्रीन (१० ईसी) १० मिलि

फेनप्रोपाथ्रीन (३० ईसी) ३ ते ३.४ मिलि

सायपरमेथ्रीन (१० ई.सी.) ७.५ मिलि

(लेबलक्लेम शिफारशी आहेत.)

(टीप ः*कीटकनाशके हिरवी, ठिपक्याची व गुलाबी या बोंडअळ्यांसाठी शिफारशीत.

(वरीलपैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची आवश्यकतेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिन्थेटिक पायरेथ्रोइड गटातील कीटकनाशकांचा वापर ऑक्टोबर महिन्यापूर्वी करणे टाळावे.)

डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५ (लेखक कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT