Water Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Water Pollution : शेतीतील रसायनांच्या वापराने पाणी प्रदूषणात वाढ

Article by Satish Khade : संकरित बियाण्यांसारख्या विविध तंत्रज्ञानाबरोबरच रासायनिक खते व कीडनाशकांच्या रासायनिक घटकांचा वापर वाढतच गेला. त्यांच्या बेसुमार वापराचे दुष्परिणाम भारतातही दिसू लागले. त्यातील दोन अभ्यासातील निरीक्षणे व अनुमान आपल्या वाचकांसाठी या लेखाद्वारे देत आहे.

Team Agrowon

सतीश खाडे

Side Effect of Agriculture Chemicals : अमेरिकेतील जीवशास्त्रज्ञ आणि लेखिका राचेल कार्सन यांनी शेतीतील कीडनाशकाच्या वापरामुळे होणाऱ्या विपरीत परिणामांसंदर्भात व्यापक निरीक्षण व शोध पत्रकारिता केली. त्यावर आधारित लिहिलेल्या त्यांच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकामुळे अमेरिकेत व नंतर जगभर खळबळ माजली. शेतातील रासायनिक खते, विशेषतः कीड व कीटकनाशके यांच्या भयानक दुष्परिणामांची चर्चा अमेरिकेत १९६२ मध्ये सुरू झाली.

पुस्तकामुळे अनेक बुद्धिवाद्यांचे डोळे उघडले आणि त्यातून जगातील पहिली पर्यावरणाची चळवळ जन्मली. या पुस्तकाचा अनुवाद व त्यातील माहितीवर आधारित लेखमाला अंजली जोशी यांनी ‘ॲग्रोवन’मध्ये लिहिली होती. त्याचेही पुस्तक झाले आहे. अमेरिकेत सायलेंट व्हॅलीवरून चर्चा सुरू असण्याच्या काळातच भारतात हरितक्रांतीची चळवळ सुरू झाली.

त्यात संकरित बियाण्यांसारख्या विविध तंत्रज्ञानाबरोबरच रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर भारतात सुरू झाला. सुरुवातीला पिकांचे उत्पादनही वाढत असल्याचे जाणवल्यानंतर रासायनिक घटकांचा वापर वाढतच गेला. त्यांच्या बेसुमार वापराचे दुष्परिणाम भारतातही दिसू लागले. त्यासंदर्भात आपल्या येथेही अभ्यास, संशोधने आणि शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यातील दोन अभ्यासातील निरीक्षणे व अनुमान आपल्या वाचकांसाठी या लेखाद्वारे देत आहे.

प्रा. डॉ. भास्कर गटकूळ यांच्या अभ्यासातील निरीक्षणे व अनुमान

इंदापूर येथील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल विभागात प्रा. डॉ. गटकूळ कार्यरत आहे. त्यांनी इंदापूर तालुक्यातील २९ गावांतील शेती, उत्पादन, खते व कीटकनाशकांचा वापर यावर आठ वर्षे अभ्यास केला.

या गावातील विहिरी, विंधन विहिरी, ओढे, नद्या यांचे पाणी प्रदूषण तपासले. पाणी प्रदूषणाचे प्रमाण आणि त्या मागील कारणे तपासताना अनेक धक्कादायक निष्कर्ष हाती आले. २९ गावांतील एकूण क्षेत्रापैकी बारा हजार हेक्टर शेती ही ऊस पिकाखाली आहे. उसासाठी हेक्टरी सरासरी २ ते ३ क्विंटल प्रति वर्ष खत देणे अपेक्षित असताना त्याच्या कितीतरी पट अधिक खते दिली जातात.

अधिकृत खतविक्रेत्याकडील खतविक्रीची आकडेवारी पाहता त्या वर्षी या एकोणतीस गावांमध्ये २५ हजार टन खते खरेदी केल्याचे दिसले. त्यातील ७० टक्के खते ही पावसाच्या व सिंचनाच्या पाण्याद्वारे ओढ्यात, ओढ्यातून नदीत व नदीतून उजनी धरणात येत असल्याचेही स्पष्ट झाले.

या २९ गावांत ४१ हजार लिटर कीडनाशके व २१ हजार लिटर तणनाशके खरेदी करून फवारणी केली गेली. ही आकडेवारी पंचायत टवसमिती, इंदापूर कडून त्यांना उपलब्ध झालेली होती. (या व्यतिरिक्त खते व कीडनाशकांचा अनधिकृत विक्री व वापर यांची प्रत्यक्ष आकडेवारी उपलब्ध झालेली नाही.)

पिकांचे एकूण क्षेत्र, त्यांचे प्रकार लक्षात घेता या सर्व रसायनांचा जास्तीत जास्त ३० टक्केच वापर होणे अपेक्षित होते. मात्र अतिरिक्त वापरलेली गेलेली ७० टक्के रसायने मातीत पडून शेतातील पाटपाणी व पावसाचे पाणी यात मिसळून गेली. त्यातील काही भाग भूजलात गेला, तर बहुतांश भाग वाहत्या पाण्यासोबत उजनी धरणात पोहोचली.

बऱ्याच शेतकऱ्यांनी खते टाकण्यापूर्वी मातीची तपासणी करण्याचीही तसदी घेतलेली नव्हती. त्यामुळे मातीमध्ये पूर्वीच्या खतांचे अंश शिल्लक असतानाही, ती मुबलक प्रमाणात असतानाही तीच खते दिली गेली. म्हणजेच पिकांच्या वाढीच्या अवस्थांनुसार कोणत्या खतांची नेमकी गरज किती आणि त्यासाठी कोणती ग्रेड वापरायची, याचा कोणताही विचार न करता रासायनिक घटकांचा वापर केला गेला.

तीच बाब कीडनाशकांबाबतही घडल्याचे निरीक्षण आहे. ही फक्त २९ गावांची ही आकडेवारी आहे. उजनी धरण भीमा नदीवर आहे. पुणे जिल्ह्यात उगम पावणाऱ्या १९ नद्यांपैकी तेरा नद्या भीमेच्या उपनद्या आहेत. म्हणजेच भीमा नदीच्या पूर्ण खोऱ्यातून नदीत आणि धरणामध्ये येणाऱ्या एकूण रासायनिक घटकांच्या प्रमाणाचा अंदाज आपल्याला येऊ शकेल.

धरणाचे हे पाणी कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यात शेतीसाठी व पिण्यासाठी जाते. उपसा सिंचनाद्वारे पुणे व नगर जिल्ह्यांतील शेतीलाही जाते. डॉ. गटकूळ यांनी या प्रबंधासाठी अभ्यास व निरीक्षणे नोंदवतानाच इंदापूर तालुक्यातील डॉक्टरांच्या संघटनेतील अनेक सदस्यांशी संवाद साधला. नेमक्या कोणत्या आजार आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे जाणून घेतले. त्यात या पंचक्रोशीत मूतखडा, कर्करोग या ज्ञात रोगांसह काही अनाकलनीय व्याधींचे प्रमाण वाढले असल्याची माहिती आहे.

ऊस उत्पादनाबाबत माहिती घेतली असता वीस वर्षांपूर्वी असलेले उसाचे एकरी उत्पादन हे जास्त खते वापरूनही वर्षागणिक घटत गेलेले दिसले. म्हणजे जास्त खते वापरून उत्पादन खर्च तर वाढलाच, पण माती, पाणी, जीवसृष्टी, माणसाच्या आरोग्याचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. या सर्व गावांतील विंधन विहिरींच्या पाण्याचाही अभ्यास केला असता यातही कीटकनाशके, खते यातील रसायनांचे अंश मोठ्या प्रमाणात सापडले. या पाण्यातील क्षारांचे प्रमाण (टीडीएस) पंधराशे पीपीएम इतके मिळाले.

तक्ता : ऊस उत्पादनामध्ये खतांच्या वापरानंतरही होत गेलेली घट (२००१ ते २०१७)

वर्ष --- क्षेत्र (हेक्टर) --- उत्पादन (मे.टन) उत्पादन (मे. टन प्रति हेक्टर)

२००१-०२ --- ९२०६ --- ८०८५१७ --- ८८

२००५-०६ --- १०३०९ --- ८७६९०८ --- ८५

२०१२-१३ --- ११६८० --- ९२९२६९ --- ८०

२०१६-१७ --- ४९१० --- ३४२७६८ --- ७०

इंदापूर भागातील अभ्यास क्षेत्रामधील रासायनिक खतांचा वापर (वर्ष २०१०-११) (स्रोत ः गट विकास अधिकारी, पंचायत समिती, इंदापूर) युरिया, एसएसपी, डिएपी, एमओपी इ.

जलबिरादरी (महाराष्ट्र) यांचा मीना नदीचा अभ्यास

जलबिरादरीच्या नरेंद्र चुग व डाॅ. सुमंत पांडे यांच्या पुढाकारातून पुण्यातील शैलेजा देशपांडे यांनी पुणे जिल्ह्यातील मीना नदीबाबत अशाच प्रकारचा माती व पाण्याचा मर्यादित प्रमाणात अभ्यास केला. त्यांनी नारायणगाव परिसरातील शेतातील मातीचे नमुने आणि मीना नदीतील तीन ठिकाणांवरून पाण्याचे नमुने गोळा केले.

त्यांची अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करून पाण्यात असलेल्या विविध प्रदूषके व त्यांचे प्रमाण मिळवले. एन.सी.एल.चे शास्त्रज्ञ डाॅ. प्रमोद मोघे व पुण्यातील प्रसिद्ध डाॅ. सुजित निलेगावकर (दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटल) या अशा तज्ज्ञांबरोबर चर्चा करून त्याविषयी अधिक माहिती घेतली. पाणी व मातीच्या या नमुन्यात त्यांना ॲल्युमिनिअम, आर्सेनिक, पारा, शिसे, क्रोमियम, तांबे यांसारखी अनेक रसायने व त्यांची संयुगे सापडली.

आपल्या देशातच नव्हे तर जगभरात केव्हाच बंदी घातलेल्या डी.डी.टी. या कीटकनाशकांचे अंशही मोठ्या प्रमाणात आढळले. आरोग्याच्या कारणासाठी परदेशात बंदी असलेली पण आपल्या देशात सध्यातरी परवानगी असलेली काही रसायने सापडली. आणि त्यांचे प्रमाणही धोक्याच्या पातळीपेक्षा कितीतरी जास्त होते.

केवळ नदीचेच पाणी नाही तर भूजलात सुद्धा मोठ्या प्रमाणात ही घातक रसायने मिसळली आहेत. मग वरील सर्वांनी नारायणगाव परिसरातील काही वाड्या वस्त्यांवर, नारायणगावातील काही भागांत घरोघर जाऊन लोकांशी आरोग्याबाबत चर्चा केली. परिसरातील डॉक्टरांशीही संवाद साधला. त्यातून त्या भागात कॅन्सर, मूत्रपिंड व यकृताच्या आजार असलेल्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची नोंद झाली.

आपल्या अभ्यासाच्या निष्कर्षाबाबत त्यांनी समाजातील विविध घटकांसमोर सातत्याने मांडणी केली. त्यात विविध महिला गट, गणपती मंडळे, गृह संकुलाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता. त्यातून लोकांना आपण नेमक्या कोणत्या संकटाला सामोरे जात आहोत, हे कळावे असा उद्देश होता.

तक्ता : मान्य पातळीपेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या जड धातू, कीडनाशके आणि प्रदूषकांचे आरोग्यावरील परिणाम

अ. क्र. --- जड धातू --- आरोग्यावरील परिणाम

१ --- क्रोमियम --- मज्जासंस्थेला इजा, वैताग आणि चिडचिडपणामध्ये वाढ.

२. --- शिसे --- मेंदूची गतिमंदता, बालकांच्या विकासामध्ये उशीर होणे, किडनी आणि मज्जासंस्थेला तीव्र इजा.

३. --- पारा --- मज्जासंस्था, पचनसंस्था, फुफ्फुसे, किडनी आणि एकूणच प्रतिकारशक्ती यावर तीव्र विपरीत परिणाम; किडनीच्या समस्यांमध्ये वाढ.

४. --- तांबे --- रक्तक्षय, लिव्हर, किडनी यांनी इजा; पोट आणि आतड्यांमध्ये दाह.

५. --- कॅडमियम --- फुफ्फुसाचा कर्करोग व अन्य आजार, हाडांमध्ये विकृती, रक्तदाब, किडनीला इजा, बोनमॅरो कर्करोग.

६. --- लोह --- लिव्हर, किडनीला इजा.

७. --- कीडनाशके (यातील डीडीटीवर सरकारी पातळीवर बंदी, पण वापर सुरूच.) --- कर्करोग.

पाणी प्रदूषण रोखणे गरजेचे

उजनी धरणाच्या पाण्यात पुणे महानगर व पुणे जिल्ह्यातील गावागावांचे सांडपाणी, औद्योगिक वसाहतींचे सांडपाणी आणि शेतीतून येणारी रासायनिक खते व कीडनाशकयुक्त पाणी अशा सर्वांचा समावेश होत आहे.

म्हणजेच धरणाच्या पाण्यात किती प्रदूषण होत असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी! यामुळे भीमा नदीत पूर्वी ज्ञात असलेल्या ४० पेक्षा अधिक माशांच्या प्रजाती वीस वर्षांपूर्वीच अस्तंगत झाल्या आहेत. माशांचे प्रमाणही कमी झाल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या ४० हजार मच्छीमार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली.

या पाण्यावर अवलंबून असलेल्या असंख्य नागरिकांना विविध व्याधींनी ग्रासलेले दिसते. आपण आपले पाणी वेगाने विषारी बनवत चाललो आहोत. ही बाब सर्वच समाज घटकांनी जाणून घेऊन त्या विरुद्ध सर्वव्यापी कृती करायला हवी, नव्हे युद्धच पुकारायला हवे, यात शंका नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT